मालाड (पूर्व), आंबेडकर नगर आणि पिंपरी पाडा येथील मालाड जलाशयाची भिंत कोसळून झालेल्या दुघर्टनेतील काही कुटुंबांचे अद्याप पुनर्वसन झालेले नसून यासंदर्भात भाजपचे महापालिकेतील माजी पक्षनेते विनोद मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली येथील रहिवाशांनी महापालिका व प्रशासक इक्बालसिंह चहल यांची भेट घेतली. यावेळी चहल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढील चार दिवसांमध्ये येथील रहिवाशांच्या पर्यायी निवासाची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
पर्यायी निवासाची व्यवस्था
मालाडमधील आंबेडकर नगर, पिंपरी पाडा येथे मालाड हिल जलाशयाची आर.सी.सी. भिंत दिनांक २ जुलै २०१९ मध्ये कोसळली आणि यामध्ये ३२ नागरिकांना प्राण गमावावे लागले होते, तर काही जण जखमी झाले होते. यावेळेला महापालिकेच्यावतीने मृतांच्या नातेवाईकांना तसेच जखमींना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. त्यावेळी प्रशासनाने येथील १५५ झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याचे ठरवले होते. परंतु त्यापैंकी ८२ झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले होते आणि उर्वरीत ७३ झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचे काम रखडले होते. मुसळधार पावसामुळे लोकांच्या घरामध्ये डोंगरावरून वाहून येणाऱ्या पाण्या सोबत कचरा व माती गेल्यामुळे भांडी-कुंडी, कपडे, कागदपत्रे सारे काही वाहून गेले होते. वारंवारच्या मुसळधार पावसामुळे लोकांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोकांचा जिवितास धोका होण्याची दाट शक्यता आहे. या अनुषंगाने भाजपाच्या शिष्ठ मंडळाने महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांची भेट घेतली.
( हेही वाचा : अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी)
भारतीय जनता पक्षाच्या शिष्ठमंडळाने महापालिकेतील माजी पक्षनेते विनोद मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांसोबत महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले व सविस्तर चर्चा केली. याबाबत महापालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवत येत्या चार दिवसांत या नागरिकांना पर्यायी घरे देण्याचे आश्वासन दिले. याबाबत स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत भाजपा पक्षनेते विनोद मिश्रा व भाजपा शिष्ठ मंडळाचे आभार मानले. या शिष्ठमंडळात भाजपाचे महापालिकेचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे, माजी आमदार तृप्ती सावंत, माजी नगरसेवक कमलेश यादव, राजेश्री शिरवडकर, रिटा मकवाना, बाळा आदी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community