सेवा विकास बॅंकेचे माजी चेअरमन अमर मूलचंदानी यांच्या घरातील ईडीच्या तपासात व्यत्यय आणल्याने आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी ईडीने पिंपरी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, पोलिसांनी कारवाई केली आहे.
सेवा विकास बॅंकेचे माजी चेअरमन अमर मूलचंदानी यांची चौकशी करण्यासाठी ईडीचे अधिकारी आले होते. तेव्हा त्यांच्या तपासात अमर मूलचंदानीच्या दोन्ही भावांनी आणि मुलाने सहकार्य केले नाही, उलट तपासात अडथळे आणून पुरावे नष्ट केले. याच कारणाचा ठपका ठेवत रात्री पिंपरी पोलिसांनी अमर मूलचंदानींच्या दोन्ही भावांना आणि त्यांच्या मुलाला अटक केली आहे.
( हेही वाचा: पाकिस्तानात प्रवासी बस दरीत कोसळून ३९ जणांचा मृत्यू )
काय आहे प्रकरण?
अमर मूलचंदानी सेवा विकास बॅंकेचे माजी चेअरमन आहेत. पिंपरीत येथील मिस्त्री पॅलेस या ठिकाणी ते सध्या वास्तव्यास आहेत. या इमारतीच्या दुस-या मजल्यावर त्यांचा फ्लॅट आहे. याच ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. मूलचंदानी यांच्यासह इतर संचालकांवर बनावट कागदपत्रांच्याआधारे 124 कर्जांचे वाटप केल्याचे आणि त्यातून 400 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणी अमर मूलचंदानी यांच्यासह पाच जणांना अटकही केली होती. काही महिन्यांपूर्वी मूलचंदानी जामिनावर बाहेर आले होते आणि रविवारी ईडीने छापा टाकला होता. रिझर्व्ह बॅंकेने प्रशासक नेमलेल्या या बॅंकेत हजारो ठेवीदारांचा कोट्यवधींचा पैसा अडकून पडला आहे.
Join Our WhatsApp Community