आगामी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर लश्कर-ए-तोयबाशी संबंधीत ‘द रेजिस्टेंस फ्रंट’ (टीआरएफ) या जिहादी दहशतवादी संघटनेने धमकीचे पत्र जारी केले आहे. यामध्ये टीआरएफने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्याचे पाहायला मिळत आहे.
काय म्हटले आहे पत्रात
या पत्रात टीआरएफने म्हटले की, आम्ही अमरनाथ यात्रेच्याविरोधात नाही. काश्मीरमध्ये येणाऱ्या भाविकांच्याही विरोधात नाही. मात्र, अमरनाथ यात्रेचा वापर हा केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या राजकारणासाठी करणार असल्याचे आमच्या लक्षात आले आहे. अमरनाथ यात्रेसाठी 15 हजार ते 8 लाख यात्रेकरूंची नोंदणी ही 15 दिवसांपासून ते 80 दिवसांपर्यंत करण्यात येत आहे. याद्वारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या स्वयंसेवकांना काश्मीरमधील परिस्थिती चिघळवण्यासाठी पाठवत असल्याचा दावा या दहशतवादी संघटनेने केला आहे.
(हेही वाचा – अमरनाथ यात्रा 30 जूनपासून होणार सुरू, यात्रेला जायचंय? असं करा रजिस्ट्रेशन)
आम्ही कोणत्याही धार्मिक यात्रेच्या विरोधात नाही. मात्र, धार्मिक यात्रांचा वापर काश्मीरमधील संघर्षाविरोधात होत असेल तर आम्ही त्याच्या विरोधात आहोत, असे टीआरएफने धमकावले आहे. अमरनाथ यात्रेसाठी येणारे भाविक सुरक्षित राहतील. मात्र, त्यांनी संघाच्या लोकांना मदत, आश्रय देऊ नये. अन्यथा गंभीर परिणाम होतील अशीही धमकी दहशतवाद्यांनी दिली आहे.
यात्रा या दोन मार्गांपासून सुरू होणार
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी अमरनाथ यात्रेशी संबंधित सर्व कामे पूर्ण करण्यासाठी 15 जूनपर्यंत मुदत दिली आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सुविधा आणि योग्य तयारी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. यंदाच्या वर्षी अमरनाथ यात्रा 30 जूनपासून पहलगाम आणि बालटाल या दोन मार्गांपासून सुरू होणार आहे.
Join Our WhatsApp Community