ई-वाणिज्य मंचावर अनिवार्य केलेल्या मानकांचे उल्लंघन करून घरगुती प्रेशर कुकरच्या विक्रीला परवानगी देऊन ग्राहक हक्कांचे उल्लंघन केले. त्याबद्दल ॲमेझॉन या ई-वाणिज्य मंचाच्या विरोधात मुख्य आयुक्त निधी खरे यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने अलीकडेच आदेश पारित केला आहे.
यासंदर्भात सीसीपीएनने एक नोटीस काढून ॲमेझॉनला निर्देश जारी केले आहेत. त्या आदेशात म्हटले आहे की, आपल्या मंचावरून विकल्या गेलेल्या 2 हजार 265 प्रेशर कुकर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना याबाबत माहिती द्यावी. त्याचबरोबर असे प्रेशर कुकर गोळा करावेत आणि त्यांची किंमत ग्राहकांना परत करावी, तसेच यासंबंधीचा आपला कार्यवाहीचा अहवाल येत्या 45 दिवसांमध्ये दाखल करावा. आपल्या मंचावरून अशा प्रकारच्या प्रेशर कुकरच्या विक्रीला परवानगी दिल्याबद्दल, तसेच क्यू सी ओ नियमांचे उल्लंघन आणि ग्राहकांच्या हक्कांचं उल्लंघन केल्याबद्दल कंपनीने दंड म्हणून 1,00,000 रुपये भरावेत असेही निर्देश देण्यात आले.
ई- वाणिज्य मंचावर अनिवार्य मानकांचे उल्लंघन करून घरगुती प्रेशर कुकरची विक्री केल्याबद्दल केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ई-वाणिज्य मंचांच्या विरोधात स्वतःहून कारवाई सुरु केली होती. प्राधिकरणाने अॅमेझॉन, फ्लिपकार्ट ,पेटीएम मॉल, शॉपक्लुज आणि स्नॅपडील या प्रमुख ई-वाणिज्य मंचांना तसेच या मंचावर नोंदणी केलेल्या विक्रेत्यांना नोटिसा बजावल्या होत्या. कंपनीने दिलेल्या प्रतिसादानंतर केलेल्या परीक्षणात असे निरीक्षणास आले की, क्यू सी ओ (QCO)च्या सूचनेनंतर ॲमेझॉनच्या माध्यमातून आपली अनिवार्य मानके पूर्ण न करणाऱ्या 2 हजार 265 प्रेशर कुकरची विक्री केली गेली आहे . ॲमेझॉनने आपल्या मंचावरून अशा प्रकारचे प्रेशर कुकर विकून एकूण 6,14,825.41 रुपये एवढी रक्कम मिळवली आहे.
( हेही वाचा: नॅशनल हेराल्ड प्रकरण; आता पुन्हा लोकतंत्र धोक्यात येईल )
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण हे देशातील ग्राहक संरक्षण स्थितीवर सतत देखरेख ठेवून आहे. अलीकडेच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने सर्व ई-वाणिज्य मंचांना, औषधे आणि सौंदर्य प्रसाधने नियमांच्या अनुसूची ई(1) मध्ये सूचीबद्ध केलेल्या घटकांसह आयुर्वेदिक, सिद्ध आणि युनानी औषधांची विक्री करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केवळ नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाचे वैध प्रिस्क्रिप्शन वापरकर्त्याने ई – वाणिज्य मंचावर अपलोड केल्यानंतरच, अशा औषधांची विक्री किंवा विक्री सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी हे या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community