अंबानी प्रकरण : ‘त्या’ गाडीच्या मागे वाझेंची होती इनोव्हा, आणखी पोलीस अधिकारी रडारवर! 

ती इनोव्हा गुन्हे अन्वेषण विभागाची होती आणि ती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडे होती.

रिलायन्स ग्रुपचे प्रमुख, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अंटालिया या इमारतीसमोरून ताब्यात घेतलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पियोच्या मागे एक इनोव्हा गाडीही दिसली होती. ती इनोव्हा गुन्हे अन्वेषण विभागाची होती आणि ती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडे होती. ती इनोव्हा एनआयएने मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतली, तसेच वाझे यांनाही अटक केली आहे. आता एनआयएने सर्व सूत्रे हाती घेतली असून एनआयए आणखी काही पोलिसांची चौकशी करणार आहे, त्यासाठी एनआयएची तीन पथके ठाण्यात रवाना झाली आहेत.

इनोव्हाचा गुन्ह्यासाठी वापर? 

शनिवारी, १३ मार्च रोजी १२ तास एनआयएने वाझे यांची चौकशी केली. त्यानंतर त्यांना एनआयएने अटक केली. तसेच ती इनोव्हा देखील ताब्यात घेतली आहे. ही इनोव्हा गाडी गुन्हे अन्वेषण विभाग वापरत होते, मुंबई पोलिसांतील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला आहे. पांढऱ्या रंगाची ती गाडी पोलीस मुख्यालयातच होती. वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयएने पोलीस मुख्यालयात फोन करून ती गाडी ताब्यात घेतली. ही कार गेल्या अनेक दिवसांपासून आयुक्तालय परिसरातच उभी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गाडीच्या मागे ‘मुंबई पोलीस’ असे लिहिले आहे. ही कार अंबानी स्फोटक प्रकरणात वापरण्यात आली होती, असा संशय एनआयएला आहे.

(हेही वाचा : “आता जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ आली आहे…” काय आहे वाझेंचं व्हॉट्सअप स्टेटस?)

भीमा-कोरेगाव प्रकरणातील एनआयए अधिकारी करणार तपास ! 

अंबानी प्रकरणाची चौकशी एनआयएचे पोलीस अधीक्षक विक्रम खलाटे हे करणार आहेत. ते बारामती तालुक्यातील लाटे या गावाचे आहेत. २ वर्षांपूर्वी भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणाचा तपासही खलाटे यांनीच केला होता. त्याआधी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणाचा संबंध हिंदुत्ववाद्यांशी जोडून त्यांचे अटकसत्र सुरु केले होते, मात्र त्यानंतर जेव्हा या प्रकरणाचा तपास एनआयएने हाती घेतला तेव्हा खळबळजनक खुलासा झाला. त्याचे थेट पुरावे एल्गार परिषदेतून मिळाले आणि शहरी नक्षलवादी यात सापडले. पुढे खलाटे यांनी राज्यासह कर्नाटकातून अनेक मोठ्या पदावरील शहरी नक्षलवाद्यांना गजाआड केले. विक्रम खलाटे हे 2008-09 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. गेल्या 13 वर्षांपासून ते पोलीस सेवेत कार्यरत असून त्यांना आतापर्यंत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दोन वेळा गौरवण्यात आले आहे. सध्या ते एनआयएचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.

काय आहे हे प्रकरण? 

 • २५ फेब्रुवारी रोजी मुकेश अंबानी त्यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेले स्कॉर्पियो सापडली.
 • त्यात मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांना ठार करण्याचे धमकीचे पत्र होते.
 • जैश उल हिंद या दहशतवादी संघटनेने याची घेतली जबाबदारी.
 • पोलिसांनी गाडीची माहिती काढताच ती ठाण्यातील मनसुख हिरेन यांची असल्याचे उघड.
 • पोलिसांनी हिरेन यांची ३ दिवस चौकशी केली, त्यांनतर हिरेन यांनी आपल्याला या प्रकरणात दोषी ठरवले जात असल्याचे पत्र लिहिले.
 • पुढे २ दिवस हिरेन बेपत्ता होतात, त्याचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडला.
 • हिरेन यांच्या पत्नीचे सचिन वाझेंवर आरोप, ते हिरेन यांच्या संपर्कात होते, त्यांनीच तक्रार अर्ज लिहून घेतला.
 • अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांचा वाझेंना निलंबित करण्यासाठी दबाव.
 • वाझेंचे या प्रकरणात संबंध असल्याचे पुरावे अधिवेशनात मांडले.
 • सरकारने हे प्रकरण एटीएसकडे सुपूर्द केले, मात्र एनआयएदेखील तपास करत होती.
 • ‘त्या’ धमकीचे कनेक्शन तिहार जेलपर्यंत निघाले.
 • तेथील इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी याचा मोबाईल फोन ताब्यात.
 • अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओच्या मागे इनोव्हा आढळून आली, ती गुन्हे अन्वेषण विभागाची असल्याचे उघड.
 • ती इनोव्हा सचिन वाझे वापरत असल्याचे समोर आले, त्यामुळे वाझे यांना एनआयएने केली अटक.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here