ऋजुता लुकतुके
रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी २०२२-२१ या आर्थिक वर्षापासून स्वत: कंपनीकडून पगार घेणं बंद केलं आहे. वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून आता आकाश, ईशा आणि अनंत अंबानी यांनीही नवीन आर्थिक वर्षापासून पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिघांनाही फक्त संचालक मंडळाच्या बैठकांना उपस्थित राहण्याचा भत्ता मिळेल. रिलायन्स समुहाने तिघांच्या संचालक मंडळातील समावेशासाठी भागधारकांची परवानगी मागितली आहे.
आकाश आणि ईशा अंबानी ही मुकेश आणि नीता अंबानी यांची जुळी मुलं ३१ वर्षांची आहेत. तर अनंत अंबानी २८ वर्षांचा आहे. तिघांचा समावेश आता रिलायन्स समुहाच्या संचालक मंडळात होणार आहे. २०१४ साली मुकेश यांची पत्नी नीता अंबानी यांचाही समावेश संचालक मंडळात झाला. आणि नीता यांनीही त्यावेळी पगार घ्यायला नकार दिला होता. आकाश, ईशा आणि अनंत यांनाही नीता यांच्या प्रमाणेच बैठकांसाठी ६ लाख रुपये तर वार्षिक २ कोटी रुपये भत्ता म्हणून मिळतील. पण, तिघांना नियमित पगार (Ambani Kids Salary) मिळणार नाही.
काही वर्षांपूर्वी मुकेश अंबानी यांनी रिलायन्स समुहाची धुरा पुढच्या पिढीकडे सोपवण्याविषयी सुतोवाच केलं होतं. दूरसंचार आणि पारंपरिक पेट्रोकेमिकल व्यवसाय आकाश अंबानीकडे, रिटेल आणि नवीन वित्तविषयक सेवा ईशा अंबानीकडे तर अपारंपरिक ऊर्जा आणि इंधन व्यवसाय अनंत अंबानीकडे सोपवण्याचा निर्णयही मुकेश यांनी जाहीर केला होता.
(हेही वाचा-Asian Games 2023 : २७ सप्टेंबरचं भारतीय संघाचं वेळापत्रक जाणून घ्या )
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात तिघांचा समावेश हा वारसा धोरणाचा पुढचा टप्पा असल्याचं बोललं जातंय. ईशा अंबानीचं पदवीपर्यंतचं शिक्षण येल विद्यापीठातून झालं आहे. आणि त्यानंतर तिने व्यवस्थापन शास्त्रात स्नातकोत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. रिलायन्स रिटेलची धुरा सांभाळणाऱ्या ईशाकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचे ०.१२ टक्के समभाग आहेत.
आकाश आणि अनंत यांनी अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. आता तिघंही संचालक मंडळात काम करतील. यापूर्वी तिघेही जण रिलायन्स जिओ, रिलायन्स रिटेल्स आणि रिलायन्स रिन्युएबल एनर्जी या कंपन्यांच्या बोर्डांवर आहेत. आणि कंपन्यांचा कारभारही त्या पाहतात.
मुकेश अंबानी १९७७ साली रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात सामील झाले. तेव्हा अर्थातच त्यांचे वडील धीरुभाई अंबानी कंपनीचे अध्यक्ष होते. पुढे वडिलांच्या निधनानंतर मुकेश अंबानी कंपनीच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. सध्या त्यांच्याकडे कंपनीचे ४१ टक्के समभाग आहेत. २००९ ते २०२१ या अकरा वर्षांमध्ये त्यांचा मोबदला १५ कोटी रुपये इतका निर्धारित केला होता. आणि त्यानंतर २०२१ मध्ये कोव्हिडचा उद्रेक झाल्यानंतर त्यांनी कंपनीकडून कसलाही मोबदला घेतलेला नाही. कंपनीचे इतर संचालक मंडळ सदस्य मात्र पगार आणि नैमित्तिक भत्ता (Ambani Kids Salary) नियमितपणे घेत आहेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community