अंबरनाथ गोळीबार प्रकरण : फडके पितापुत्र, कृणाल पाटीलसह टोळीतील ३३ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई

99

निवडणुकीच्या वादातून अंबरनाथ येथे अंधाधुंद गोळीबार करणाऱ्या गुरुनाथ फडके, पंढरीनाथ फडके यांच्यासह त्यांच्या टोळीतील ३३ जणांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गोळीबार प्रकरणात १० जणांना अटक करण्यात आलेली असून इतर २३ जण फरार असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. १३ नोव्हेंबर रोजी अंबरनाथ एमआयडीसी परिसरात भरदिवसा गुरुनाथ व पंढरीनाथ फडके या पितापुत्रांसह त्यांच्या टोळीने कल्याण पूर्वेत राहणाऱ्या राहुल पाटील यांच्या वाहनाच्या ताफ्यावर अंधाधुंद गोळीबार केला होता, या गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण ठाणे जिल्हा हादरला होता. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नव्हते.

( हेही वाचा : जे.जे. रुग्णालयात साजरा झाला ‘नवजात शिशू सप्ताह’)

कल्याण पूर्वे येथील आडवली गावात राहणारे बांधकाम व्यवसायिक तसेच जमीनदार राहुल पाटील यांनी आगामी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीत उभे राहू नये म्हणून स्थानिक पुढारी कुणाल पाटील यांच्याकडून पंढरीनाथ फडके आणि गुरुनाथ फडके टोळीच्या मार्फत दबाव आणला जात होता. राहुल पाटील यांना धमकी देणे हा प्रकार मागील काही महिन्यापासून फडके टोळीच्या मार्फत सुरु होता. दरम्यान १३ नोव्हेंबर रोजी फडके टोळीने बैल गाडा शर्यतीची बैठक आयोजित करण्यात आल्याच्या निमित्ताने राहुल पाटील यांना अंबरनाथ एमआयडीसी येथे बोलावून घेतले होते. दुपारच्या सुमारास राहुल पाटील हे आपल्या कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी आले असता पंढरीनाथ फडके , गुरुनाथ फडके या पितापुत्रांनी या राहुल पाटील यांच्यावर रिव्हॉल्वर रोखून निवडणुकीत उभे राहू नको म्हणून धमकावले, व कृणाल पाटील हे आता इकडे येतील त्याच्यासमोर निवडणुक लढविणार नाही असे कबूल करण्यास सांगितले. मात्र राहुल पाटील यांनी फडके टोळीला न जुमानता आपल्या मोटारीचा दरवाजा लावून तेथून न निघून जात असताना फडके टोळीने पिस्तूल, रिव्हॉलवर आणि डबल बोरच्या बंदुकीतून राहुल पाटील आणि त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर अंधाधुंद गोळीबार सुरु केला.

राहुल पाटील आणि त्यांचे सहकारी तेथून पळून गेल्यामुळे सुदैवाने गोळीबार कुठलीही जीवितहानी घडली नाही, मात्र या अंधाधुंद गोळीबाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊन संपूर्ण ठाणे जिल्हा हादरला होता. ठाणे पोलिसांनी या गोळीबाराची दखल घेऊन पंढरीनाथ फडके, गुरुनाथ फडकेंसह ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून १० जणांना अंबरनाथ पोलिसांनी अटक केली. गुरुनाथ फडके हा टोळी प्रमुख असून त्याच्या टोळवर राजकीय व गुन्हेगारी वर्चस्व निर्माण करण्याकरिता रायगड , ठाणे आणि नवीमुंबई जिल्ह्यात गोळीबार, हत्येचा प्रयत्न , धमकावणे इत्यादी गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का ) अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश ठाणे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी दिले आहे. या गुन्ह्याचा तपास करणारे सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी पंढरीनाथ फडके, गुरुनाथ फडके, कृणाल दिनकर पाटील, दर्शन पाटील, मयूर दिनकर पाटील यांच्यासह ३३ जणांविरुद्ध मोक्का कायदा अंर्तगत कारवाई सुरु करण्यात आली आहे. पंढरीनाथ फडके सह १० जणांना या प्रकरणात अटक करण्यात आलेली असून गुरुनाथ फडके, कृणाल पाटील, दर्शन पाटील, मयूर पाटील यांच्यासह २३ जण फरार असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.