अमेरिकेनेही केला हिंदू संस्कृतीचा ‘उदो उदो’! ‘या’ राज्यांत होणार हिंदू वारसा महिना साजरा

हिंदुंचे सण जसे भारतात मोठ्या हर्षोल्हासात साजरे केले जातात, तसेच ते इतर देशांमध्ये राहणारे भारतीयही मोठ्या दिमाखात ते साजरे करत असतात. गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा, गणेशोत्सव मिरवणुका, नवरात्रात गरबा असे सण परदेशात साजरे करतानाचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर हिंदू संस्कृतीचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन, आता अमेरिकेतील काही राज्यांनी ऑक्टोबर महिन्याला हिंदू वारसा महिना म्हणून घोषित केले आहे.

हिंदू धर्माने अमेरिकेला अद्वितीय इतिहास आणि वारशाद्वारे मोठे योगदान दिले आहे, असे सांगत या राज्यांनी हा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील विविध हिंदू संघटनांनी ऑक्टोबरमध्ये हिंदू वारसा म्हणून संपूर्ण महिना साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अमेरिकेतील काही राज्यांनी हा निर्णय घेतला आहे. अमेरिकेसह जगभरातील भारतीयांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

या राज्यांमध्ये होणार हिंदू वारसा महिना साजरा

टेक्सास, फ्लोरिडा, न्यू जर्सी, ओहायो, मिनेसोटा, जॉर्जिया, मिसिसिपी आणि मॅसॅच्युसेट्स, तर शिकागोजवळील इलिनॉईन्समधील काही शहरे यांचा या राज्यांमध्ये समावेश आहे.

हिंदू धर्माचे अमेरिकेला खूप मोठे योगदान 

ही घोषणा नुकतीच या राज्यांच्या राज्यपालांच्या कार्यालयातून जारी करण्यात आली. हिंदू धर्मातील श्रद्धेने जगभरातील हजारो अनुयायांचे जीवन सुधारले आहे आणि त्यांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे. या श्रद्धेनेच समाजाला कायम आशावादी राहण्याचा संदेश दिला आहे. हिंदू धर्माने आपल्या अनोख्या इतिहास आणि वारशाद्वारे आमच्या राज्याला आणि राष्ट्राला मोठे योगदान दिले आहे, असे अमेरिकेतील राजकीय नेत्यांचे म्हणणे आहे.

संपूर्ण अमेरिकेत साजरा करण्याची मागणी

जगाला आपल्या तत्वज्ञान आणि नीतीमत्तेवर शिक्षित करण्याची वेळ आली आहे, असे विश्व हिंदू परिषद ऑफ अमेरिका (VHPA) चे अध्यक्ष अजय शहा म्हणाले. त्यासाठी आता अमेरिकेतील विविध हिंदू संघटनांकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याकडे संपूर्ण अमेरिकेत ऑक्टोबर हा हिंदू वारसा महिना म्हणून घोषित करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

विविध कार्यक्रमांचे आयोजन

या हिंदू वारसा महिन्याचे औचित्य साधून संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेतील या राज्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, फॅशन शो, वेबिनार, मल्टी-डे कॉन्फरन्स, वॉकथॉन यांचा समावेश असेल.

पुढच्या पिढीला भारतीय संस्कृतीचा अभिमान वाटेल

हिंदू वारसा आणि संस्कृती हजारो वर्षे जुनी आहे, हे जगाला दाखवणे आणि ते आमच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. जेणेकरुन त्यांचा जन्म जरी भारतात झाला नसेल तरी त्यांना आपल्या मूळ भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान असेल, असे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वर्ल्ड हिंदू कौन्सिल ऑफ अमेरिकेचे उपाध्यक्ष संजय कौल यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here