अमोल पालेकर यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९४४ रोजी झाला. अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये ललित कलांचे शिक्षण घेतले आणि चित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. अभिनेता होण्यापूर्वी अमोल पालेकर यांनी दिग्दर्शक म्हणून नाट्यविश्वात ठसा उमटवला होता. ख्यातनाम दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांच्यासोबत त्यांनी मराठी रंगभूमीवर अनेक नवे प्रयोग केले. पुढे १९७२ मध्ये त्यांनी स्वतःचा अनिकेत थिएटर ग्रुप सुरू केला.
चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यावर त्यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले. त्यांच्या गोलमाल या चित्रपटाची चर्चा आजही केली जाते. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. २२ एप्रिल १९७९ रोजी गोलमाल थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट ७० च्या दशकात १ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये आणि ५ भाषांमध्ये तयार करण्यात आला होता. चित्रपटाने जगभरात ७.२ कोटींची कमाई केली.
चित्रपटाचे जादूगार हृषिकेश मुखर्जी यांची या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट अवघ्या ४० दिवसांत तयार झाला होता. या कॉमेडी चित्रपटासाठी कोणताही सेट तयार करण्यात आलेला नव्हता. तर या चित्रपटाचे चित्रीकरण हृषिकेश मुखर्जी यांच्या घरी, उत्पल दत्त यांच्या घरी आणि कार्यालयात झाले होते. तसेच अमोल पालेकर यांचे घर आणि बाग यांचाही वापर करण्यात आला होता.
(हेही वाचा-Chhagan Bhujbal : …म्हणून मुंबई सत्र न्यायालयाने मंत्री छगन भुजबळांवर ओढले ताशेरे)
आणखी एक गंमत म्हणजे शूटिंगदरम्यान कोणतेही कॉस्च्युम वापरण्यात आले नव्हते तर कलाकार स्वतःच्या घरच्या कपड्यातच वावरत होते. देवेन वर्मा यांनी आपली स्वतःची कार वापरली होती. कांचा मीठा या बंगाली चित्रपटावर हा आधारित होता. कांचा मीठा मध्ये नायक असाच खोटं बोलतो. त्यामुळे स्वतःच्या चुका लपवण्यासाठी खोटं बोलणं ही थीम घेऊन गोलमाल चित्रपट तयार झाला.
गोलमालचे अनेक रिमेक बनवण्यात आले आहेत. १९८१ मध्ये थिल्लू मुल्लू हा तामिळ चित्रपट आला. १९८८ मध्ये सिन्हाला भाषेत रासा रहासक आला. १९९० मध्ये आसेगोव्वा मीसेगोव्वा हा कन्नड चित्रपट प्रदर्शित झाला तर १९९५ मध्ये सिम्हावन मेनन हा मल्याळम भाषेतील चित्रपट प्रदर्शित झाला.
१९७१ मध्ये अमोल पालेकर यांनी सत्यदेव दुबे यांच्या शांतता कोर्ट चालू आहे या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. १९७४ मध्ये बासू चटर्जी यांच्या रजनीगंधा या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट यशस्वी झाला आणि मग त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरुच्र राहिला. अभिनेता म्हणून त्यांनी चितचोर, घरौंदा, मेरी बीवी की शादी, बातों-बातों में, गोलमाल, नरम-गरम, श्रीमान-श्रीमती असे अनेक जबरदस्त चित्रपट केले आहेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community