राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठणाचा आग्रह धरल्यानंतर अटक करण्यात आलेले खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने आज सोमवारपर्यंत राणा दामप्त्याचा निकाल राखून ठेवल्याने त्यांना दिलासा मिळालेला नव्हता. त्यामुळे याप्रकरणी राणा दाम्पत्याचा फैसला सोमवारी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आज सोमवारी देखील त्यांना दिलासा मिळाला नसल्याचे वृत्त समोर आले आहे.
या कारणामुळे कोठडीतील मुक्काम वाढला
दरम्यान, बुधवारी युक्तीवादाच्या निकालाचे वाचन पूर्ण होऊ न शकल्याने आणि उद्या ईदची सुट्टी असल्याने राणा दाम्पत्याच्या जामिनावर आता बुधवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम आणखी दोन दिवस वाढला आहे.
काय आहे प्रकरण?
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील जाहीर सभेत मशिदींवरील भोंगे उतरविण्यासंदर्भात विधान केल्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली. मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. यानंतर २३ एप्रिल रोजी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याची घोषणा केली. यामुळे राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्याचे तीव्र पडसाद मुंबईत उमटले.
(हेही वाचा – मनसेतर्फे अक्षय्य तृतीयेला होणारी महाआरती रद्द!)
त्यानतंर शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या आंदोलन केले. तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता. अखेर मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी जाणार नसल्याचं राणा दाम्पत्यानं व्हिडीओ जारी करत आपली घोषणा मागे घेतली. त्यानंतर पोलिसांनी राणा दाम्पत्यास अटक केली आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या खासदार नवनीत राणा भायखळा कारागृहात आहेत, तर आमदार रवी राणा तळोजा कारागृहात आहेत.
Join Our WhatsApp Community