औरंगाबाद येथील कन्नड चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गावरील औट्रम घाटात एका ट्रकने कारला पाठीमागून जोरात धडक दिल्याने समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रकला कार धडकली. त्यामुळे दोन्ही ट्रकच्यामध्ये कारचा चक्काचूर झाला. या अपघातात कारमधील चिंचोली लिंबाजी (ता. कन्नड) येथील माजी जिल्हा परिषद सदस्या यमुनाबाई रामचंद्र पवार (६८ वर्षे) यांचा मृत्यू झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले. तर जखमींत एका गर्भवती महिलेचा समावेश असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गावरील औट्रम घाटातील सरदार पॉईंटजवळ समोर एक ट्रक (जीजे 36 व्ही 7852) अचानक थांबला. त्याच्या मागून मारूती बलेनो क्रमांक एमएच 20 ईई 5470 ही गाडी येऊन उभी राहिली. दरम्यान त्याचवेळी चारचाकीच्या मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने (टीएन 36 एब्ल्यू 3999) कारला जोरात धडक दिली. ज्यामुळे कार दोन्ही ट्रकमध्ये चेपली गेली. या अपघातात यमुनाबाई पवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. लहान मुलगी गौरी गव्हाणे (९) सुखरूप असून जखमी अश्विनी गव्हाणे (३०) व कृष्णा गव्हाणे चालक (६६) हे जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींना कुठल्याही प्रकारची मदत न करता ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केले.
( हेही वाचा: व्हीडिओकाॅनचे मालक वेणूगोपाल धूत यांना CBI कडून अटक; ICICI बॅंक कर्ज घोटाळा प्रकरणी कारवाई )
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्रावरील पोलीस अधिकारी रुपाली पाटील, पोलीस हवालदार योगेश बेलदार आणि अन्य सहकारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन गाडीत अडकलेल्या जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.
Join Our WhatsApp Community