वाढदिवसाच्या पार्टीत एकाची हत्या, सांताक्रूझमधील घटना

विमानतळ प्राधिकरण कर्मचारी संघटनेच्या कार्यालयात सुरू असलेल्या वाढदिवस पार्टीत दोन कर्मचाऱ्यांमध्ये सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी मध्यरात्री सांताक्रूझ पश्चिम येथे घडली.  याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे.
अब्दुल शेख (५०) असे हत्या करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
सांताक्रूझ पश्चिम येथील विमानतळ प्राधिकरण कर्मचारी वसाहत या ठिकाणी असलेल्या कर्मचारी संघटनेच्या कार्यालयात रात्री एका कर्मचाऱ्याच्या वाढदिवसाची पार्टी सुरू होती. या पार्टीदरम्यान सोहेल खुर्शीद अन्वर आणि अटक आरोपी निखिल शर्मा उर्फ कपाली यांच्यात क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. निखिल शर्मा हा सोहेलला मारहाण करत असताना, अब्दुल शेख (५०) हा भांडण सोडवण्यासाठी गेला.
अब्दुल हा दोघांच्या भांडणात पडला म्हणून निखिल शर्मा याने सोहेलला सोडले व अब्दुल यालाच मारहाण करू लागला. अब्दूलच्या छातीत, पोटात लाथा बुक्यांनी मारहाण केल्यामुळे अब्दुल हा गंभीर जखमी झाला. त्याला नजीकच्या रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून निखिल उर्फ कपाली याला अटक केली आहे,  अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब तांबे यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here