अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला असून लटके यांना जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी शिवसैनिकांनी बाहेर पडावे असे आवाहन ठाकरे गटाकडून केले जात आहे. मात्र, लटके यांना अधिकाधिक मतदान करण्याचे आवाहन असले तरी प्रत्यक्षात लटके यांच्या पारड्यात अधिक मतदान व्हावे म्हणून हा प्रयत्न नसून शिवसेनेच्या मतदारांना धनुष्यबाणाऐवजी मशाल चिन्हावर बटन दाबण्याची सवय व्हावी याचा सराव म्हणून हे मतदान करण्यासाठी शिवसैनिकांना जास्तीत जास्त बाहेर काढण्याचे पक्षाच्या नेत्यांकडून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
( हेही वाचा : मोदी सरकारची दिवाळी भेट! देशातील 75 हजार तरुणांना नोकरीची नियुक्ती पत्रे)
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्यासह एकूण ९ उमेदवार निवडणूक रिंगणात असून भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे लटके यांचा विजय दृष्टीक्षेपात आहे. ही लढत एकतर्फी होणार असल्याने सर्वांचे डिपॉझिट जप्त करुन अधिक मताधिक्याने लटके यांचा विजय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लटके यांच्यासमोर तेवढे आव्हानच नसले तरी शिवसैनिकांना शाखा-शाखांमधून मतदान करण्याचे आवाहन करत जास्तीत जास्त शिवसेना ठाकरे गटाच्या मतदारांना मतदानासाठी बाहेर उतरवण्याची रणनिती ठाकरे गटाकडून आखली जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही पोटनिवडणूक प्रथम धनुष्यबाणाशिवाय लढली जात असून पक्षाचे दोन गट झाल्यानंतर मशाल चिन्हावर लढवली जाणारी पहिली निवडणूक आहे. त्यामुळे लटके यांना पडणारी मते ही मशाल चिन्हासाठी पुरक ठरणार आहे. हे चिन्ह पोटनिवडणुकीपुरती असले तरी भविष्यात धनुष्यबाण चिन्ह कायमस्वरुपी गोठवल्यास मशाल या चिन्हाचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मशाल चिन्हावर मिळणारी मते ही भविष्यात कायमस्वरुपी चिन्हासाठी महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे लटके यांचा विजय सहज असला तरी शिवसेनेला भविष्यातील मशाल चिन्हावर अधिक दावा करण्यासाठी लटके यांच्या मशाल चिन्हावर पडणारी मते तेवढीच महत्वाची ठरली जाणार आहे. त्यामुळे लटके यांना अधिकाधिक मतदान होणे आवश्यक असून हे लटकेंऐवजी मशाल चिन्हासाठी आवश्यक असेल.
यामागील दुसरे कारण म्हणजे आजवर धनुष्यबाण चिन्हावर बटण दाबण्याची सवय शिवसैनिकांना असून या मशाल चिन्हावर बटन दाबण्याची सवय लागावी, हे चिन्ह परिचित व्हावे यासाठी शिवसैनिकांना अधिकाधिक मतदानासाठी घराबाहेर काढण्याचा प्रयत्न शिवसेना उध्दव ठाकरे गटाचा असल्याची माहिती मिळत आहे. लटके यांचा विजय होणार असला तरी ही निवडणूक लटकेंसाठी नाही तर मशाल चिन्हाची ओळख व्हावी, मशाल चिन्ह कायमस्वरुपी मिळण्यासाठी मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीकोनातून शिवसेना ठाकरे गटाचा प्रयत्न असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीत स्वर्गीय आमदार रमेश लटके यांना युतीचे उमेदवार म्हणून मिळालेल्या मतदानापेक्षा महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून अधिक मते मिळवण्याचा प्रयत्न शिवसेनेचा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही या मतदानात मशाल चिन्हापुढे बटन दाबण्याचे आवाहन केले जात असल्याचीही माहिती मिळत आहे.
Join Our WhatsApp Community