रिक्षात विसरलेली बॅग २४ तासांच्या आता शोधून त्यातील मौल्यवान वस्तूंसह संबंधितांना परत देण्याची कामगिरी अंधेरी पोलिसांनी केली आहे. भारतीय नौदलाच्या ताफ्यात 17 मे, मंगळवारी सुरत आणि उदयगिरी या दोन युद्धनौकांचे जलावतरण करण्यात आले. या कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्यकारिणी सदस्य विज्ञानेश मासावकर उपस्थित होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी वैदेही मासावकर आणि त्यांच्या काकू वंदना मासावकर उपस्थित होत्या. या कार्यक्रमावरुन घरी परतताना, मासावकर कुटुंबिय रिक्षात दागिन्यांची बॅग विसरले. त्यानंतर संबंधित रिक्षाचालकाचा शोध घेत, अंधेरी पोलिसांनी 24 तासांच्या आत मासावकर कुटुंबियांकडे 6 लाख किमतीचे दागिने सुपुर्द केले.
अशी घडली घटना
माझगाव डॉक येथील कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्यकारिणी सदस्य विज्ञानेश मासावकर गेले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी वैदेही मासावकर आणि त्यांच्या काकू वंदना मासावकर उपस्थित होत्या. या कार्यक्रमावरुन घरी परतताना, मासावकर कुटुंबीयाने अंधेरीवरुन रिक्षा पकडली. हातात बरेच सामान असल्याने, काही पिशव्या रिक्षाच्या मागच्या बाजूला ठेवल्या होत्या. रिक्षातून खाली उतरताना, ज्या पिशवीत दागिने होते ती पिशवी गडबडीत रिक्षातच विसरले. या पिशवीमध्ये सोन्याची 2 मंगळसूत्र, 4 सोन्याच्या साखळ्या आणि अंगठी असा एकूण 5 ते 6 लाखांचा ऐवज होता. तसेच, काही रोकड आणि मोबाईलही त्यात होते. पिशवी रिक्षात विसरल्याचे लक्षात येताच, मासावकर कुटुंबियांनी मंगळवारी 5:30 वाजता डी.एन. नगर पोलीस ठाणे अंधेरी पश्चिम येथे तक्रार केली. मासावकर कुंटुंबियांच्या तक्रारीनंतर, पोलीस उपनिरीक्षक संतोष मासाळ यांनी प्रकरणाची दखल घेत 24 तासांच्या आत दागिन्यांची पिशवी मासावकर कुटुंबियांना शोधून दिली.
दागिने कुटुंबियांकडे सुपुर्द
तक्रारीनंतर, डी.एन.नगर पोलिसांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून संबंधित रिक्षाचा नंबर मिळवून, शोध घेण्याचा प्रयत्न केला. रिक्षाचालकाचा फोन नंबर लागत नसल्याने, डी.एन.नगर पोलीस चौकीतील पोलीस शिपाई स्वप्निल निकम, अमित लाडे, सुमित पोळ आणि राजू शिंदे यांनी रात्री तीनपर्यंत रिक्षाचा शोध घेतला आणि संबंधित रिक्षा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी मासावकर कुटुंबियांना बोलावून रिक्षाचालकाकडून जप्त केलेला ऐवज मासावकर कुटुंबियांकडे सुपुर्द केला.
पोलिसांनी 24 तासांत शोधून दिला विसरलेल्या बॅगमधील 6 लाखांचा ऐवज @DGPMaharashtra @MumbaiPolice @Andherinews
@CMOMaharashtra@CPMumbaiPolice
#mumbaipolice #MahrashtraPolice #Andheri pic.twitter.com/c7C4rhOMVO— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) May 18, 2022
- वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलींद करडे
- पोलिस निरीक्षक वहिद पठाण
- पोलिस निरीक्षक अनिल मुळे
- पोलिस निरीक्षक गणेश अंधे
- सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास पाटील
- पोलिस उपनिरीक्षक संतोष मासाळ
- पोलिस शिपाई स्वप्निल निकम
- पोलिस शिपाई राजू शिंदे
- पोलिस शिपाई अमित लाडे
- पोलिस शिपाई सुमित पोळ