नाशिकच्या साहित्य संमेलनगीतात भूमिपुत्र असलेल्या सावरकरांचाच उल्लेख नाही!

नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये नाशिकचे भूमिपुत्र आणि मराठी साहित्यात आपल्या प्रतिभेच्या तेजाने तळपणाऱ्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचा उल्लेख नसल्याने सावरकरप्रेमींमध्ये नाराजीचा सूर आहे. नाशिक हेच स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्याने नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या गीतात सावरकरांचा स्पष्ट नामोल्लेख नेमका टाळला गेल्याने एकीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे तर दुसरीकडे या भूमिपुत्राचे नाव कसे वगळले गेले, असा सवाल उपस्थितीत केला जात आहे.

सावरकरांची प्रतिभा नजरेआड

सागरा प्राण तळमळला, जयोस्तुते अशा अजरामर काव्याला, मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या आणि सावरकरांच्या हिंदुत्ववादी भूमिकेचे संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांसह कारभाऱ्यांना वावडे असावे का? असे असले तरी साहित्याच्या काव्य, निबंध, नाटक, कांदबरी अशा कित्येक क्षेत्रांत मराठीचा अटकेपार ध्वज रोवणाऱ्या सावरकरांची प्रतिभा नजरेआड करून कसे चालेल, असाही प्रश्न यानंतर केला जात आहे. इतकेच नाही तर मुंबईत झालेल्या २३ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी स्वातंत्र्यवीर, नाशिकचे भूमिपुत्र, साहित्यिक सावरकर विराजमान होते, याचा विसर पडणं हेही विशेषच…

सावरकरांच्या नावाचा उल्लेख टाळल्याने चर्चा

नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य समंलेनाची अतिशय उत्साहात आणि जोरात तयारी सुरू आहे. पालकमंत्री छगन भुजबळ याच्या हस्ते सोमवारी संमेलन गीताचे अनावरण करण्यात आले. सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी भगूर, नाशिक येथे झाला. त्यांनी जवळपास पन्नासच्यावर पुस्तके लिहिली. त्यात १८५७ चे स्वातंत्र्यसमर, संगीत उत्तरक्रिया, काळे पाणी, गांधीगोंधळ, जोसेफ मॅझिनी, महाकाव्य कमला, महाकाव्य गोमांतक, माझी जन्मठेप, मोपल्यांचे बंड , शत्रूच्या शिबिरात, संन्यस्त खड्ग, बोधिवृक्ष, सावरकरांच्या कविता, क्ष –किरणें अशा अनेक पुस्तकांचा समावेश आहे. मात्र, असे असूनही सावरकरांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख साहित्य संमेलन गीतात नाही. गीतकार मिलिंद गांधी यांनी हे गीत रचले आहे. नाशिकचा सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वाचा इतिहास आणि आढावा या गीतातून घेतला आहे. संजय गीते यांनी हे गीत स्वरबद्ध केले आहे. नाशिकमधील इतर सर्वच साहित्यिकांचा नावासह उल्लेख आला आहे. मात्र, सावरकरांच्या नावाचा उल्लेख टाळल्याची चर्चा आहे.

असे आहे संमेलन गीत…

अनंत आमुची ध्येयासक्त अक्षरशक्ती
अक्षरभक्ती गोदाकाठी मायमराठी
ग्यानपर्वणी साहित्याची आली गोदाकाठी
अभिमानाने गर्जा आता जयजय माय मराठी

रामकथेचा पट उलगडला इथल्या मातीवरती
ध्यानाने सोपान गाठता मुक्त होय निवृत्ती
गडकिल्ले हे शिवरायांना सदैव वंदन करती
स्वातंत्र्याचे सूर्य उगवले अनंत क्षितीजावरती

मराठीस या अभिजाताचा लावू तिलक ललाटी
अभिमानाने गर्जा आता जयजय माय मराठी

गोविंदांची कवणे करती पूजन स्वातंत्र्याचे
ज्ञानपीठ कवितेचे ठरले रम्य गाव कुसुमांचे
वसंत फुलता नाटक झाले भूषण महाराष्ट्राचे
फटकारे वामनदादा अन् बाबूराव आबांचे

पुस्तकयात्रा संस्कृतीची रसिकांच्या ये भेटी
अभिमानाने गर्जा आता जयजय माय मराठी

गोदागौरव राज कवींचे स्मृतीचित्र लक्ष्मीचे
श्रीपादांनी बीज रुजवले इथे साम्यवादाचे
जलसे भीमरावांचे ठरले वादळ नवक्रांतीचे
रंग बहरले आदमबाबा जोयांच्या शायरीचे
मुक्त शाहिरी प्रतापजींची अजून येते ओठी
नाशिक तू एक सुंदर कविता आहे गोदाकाठी

गीत बहरले योगेशाचे गाणे गोपाळाचे
लावणीस लावण्य लाभले पंढरीच्या शब्दांचे
काव्य बहरले अरुणचे अन् किशोर आनंदाचे
दार उघडले मुरलीच्या शोधाने इतिहासाचे
परंपरा ही साहित्याची या नाशिकला मोठी
अभिमानाने गर्जा आता जयजय माय मराठी

चित्रमहर्षी सूरतपस्वी वैभव नटश्रेष्ठांचे
जनस्थान हे कर्मवीरांचे लोकहितवादाचे
उद्योगाचे पर्यटनाचे शहर कला क्रीडाचे
भुजाभुजातील समता करते स्वागत शब्दप्रभूंचे
जयंत आले हसरे तारे घेऊन भेटींसाठी
अभिमानाने गर्जा आता जयजय माय मराठी

ग्यानपर्वणी साहित्याची आली गोदाकाठी
अभिमानाने गर्जा आता जयजय माय मराठी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here