न्यायालय परिसरातून पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेलेला बँक दरोडा आणि खुनातील आरोपी अनिल दुबेला त्याच्या साथीदारासह वसई गुन्हे शाखेने नालासोपारा येथून अटक करून पळून जाण्यासाठी वापरलेली मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे.
अनिल दुबे याने जुलै २०२१ मध्ये विरार येथील आयसीआयसीआय बँकेत दरोडा आणि महिला व्यवस्थापक योगिता वर्तक -चौधरी हिची हत्या करून महिला कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक यांच्यावर प्राणघातक हल्ला करून बँकेची ३ कोटींची रक्कम लुटली होती. या दरोड्याप्रकरणी अनिल दुबेला अटक करण्यात आली होती व तो सध्या ठाणे कारागृहात होता. शुक्रवारी अनिल दुबे याला वसई न्यायालयात आणण्यात आले होते, त्या ठिकाणी त्याने नैसर्गिक विधीचे निमित्त करून पोलिसांना गुंगारा देत पळून गेला होता.
(हेही वाचा शिवरायांवरील बेगडी प्रेम दाखवू नका, महाराजांचे नाव घेणे बंद करा! उदयनराजे यांनी मांडल्या भावना)
मोटरसायकलवरून पळून गेला
त्याला पळून जाण्यास कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या चांद शेख याने मदत केली होती, चांद शेख हा न्यायालयाच्या बाहेर मोटारसायकलवर दुबेची वाट पहात होता व ठरल्याप्रमाणे दुबे हा पोलिसांच्या हातून निसटून चांद शेख याच्या मोटरसायकलवरून पळून गेला होता. दरम्यान अनिल दुबेच्या शोधासाठी वसई पोलीस गुन्हे शाखा त्याचा शोध घेत होते. अनिल दुबे आणि चांद शेख हा नालासोपारा येथील बंजारा बस्ती या ठिकाणी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळताच सोमवारी पहाटे वसई गुन्हे शाखेने अनिल दुबे आणि चांद शेख या दोघांच्या मुसक्या आवळल्या व त्याला वसई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community