राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांची चौकशी ईडीने सुरू केली आहे. अनिल परब यांच्या घरी आणि त्यांच्याशी संबंधित एकूण सात ठिकाणी ही छापेमारी टाकण्यात आली. यातच वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणाच्या संबंधित कागदपत्रे आता ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ उपक्रमाचे जाहिरात हक्कांचे कंत्राट वादाच्या भोवऱ्यात!)
साई रिसॉर्ट संबंधित कागदपत्रे ईडीच्या ताब्यात
मुरूड येथील वादग्रस्त साई रिसॉर्टवर धाड टाकल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुरूड ग्रामपंचायतीमधून रिसॉर्ट संबंधित कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतली आहेत. किरीट सोमय्या यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत साई रिसॉर्टच्या संदर्भात कागदपत्रे सादर केली होती. या सर्व कागदपत्रांच्या प्रती अधिकृतपणे ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे खोटे असून आपण केंद्रीय तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे अनिल परब यांनी म्हटले आहे.
या 7 जागांवर छापेमारी सुरु
- अजिंक्यतारा- अनिल परबांचे मंत्रालयाजवळील शासकीय निवासस्थान
- मोनार्क इमारत- अनिल परब यांचे वांद्रे पूर्वमधील खासगी निवासस्थान
- अनिल परबांशी संबंधित चेंबूरच्या बांधकाम व्यावसायिकाच्या घरी ईडीचे छापे
- दापोलीमधील साई रिसोर्ट परबांना विकणा-या साठेंच्या घरीदेखील छापेमारी सुरु
- दापोलीमधील साई रिसोर्ट येथेही छापेमारी सुरु
- विभास साठे यांच्या कोथरुडच्या घरीदेखील ईडीची छापेमारी