दुधापेक्षा शेण आणि गोमुत्राला प्राधान्य द्या!

राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. त्यावेळी राज्यात गोसेवा आयोगाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली. देशी गोवंशाचे जतन आणि निर्मिती व्हावी यासाठी या आयोगाच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहे. मात्र जोवर सरकार या कामाला दुधापेक्षा गायीचे शेण आणि गोमुत्राला अधिक महत्त्व देत नाही तोवर याचा फायदा होणार नाही. सरकारने शेतकऱ्यांना गोमूत्र आणि शेणाचा चांगला मोबदला दिला तर खऱ्या अर्थाने विकास होईल. कारण गोमुत्रापासून अनेक औषधी पदार्थ बनतात. तसेच शेणाच्या माध्यमातून वेगवेगळी खते तयार करून त्याचा सेंद्रिय शेतीसाठी उपयोग होत आहे.

म्हणून देशी गोवंश नष्ट होतोय

गोशाळांना चांगले नंदी आणून द्यावेत. तसेच चांगल्या वातावरणाला पूरक असे गोठे सरकारने गोरक्षकांना उपलब्ध करून द्यावेत. गोरक्षकांना गायींसाठी चांगला पोषक आहार पुरवला पाहिजे, ज्यामुळे गोरक्षकांना त्याचा चांगला फायदा होईल. गायीच्या दुधापेक्षा शेण आणि गोमूत्र देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आज दुधाला प्राधान्य दिले गेल्याने कुणीही पशुपालन करत नाही. भारतीय गायी जास्तीच्या प्रमाणात दूध देत नाही, त्यामुळे विदेशी मूळ असलेली जनावरे पाळण्यात येत आहेत. ज्याला जर्सी ब्रीड म्हणून ओळखले जातात. त्यामुळे देशी गोवंश नष्ट होऊ लागला आहे.

गोवंश संभाळणाऱ्यांना सरकारी मदतीची गरज

आपल्याच देशातील देशी जातीचे चांगले नंदी आणून त्यांच्यावर संशोधन करून त्याचा उपयोग करून देशी गोवंशांची संख्या वाढवण्याची गरज आहे. असे नंदी शेतकऱ्यांना दिले तर चांगले दूध देणाऱ्या गायी जन्माला येतील आणि शेतकरी त्या गायीचे संगोपन करतील. या विषयाकडे शंभर टक्के लक्ष दिले गेले पाहिजे. निव्वळ गायी सांभाळा म्हणून काही होत नाही. गोवंशांचा सांभाळ करणाऱ्यांना पूरक वातावरण मिळाले पाहिजे, ते वातावरण मिळत नाही, त्यामुळे शेवटी तो शेतकरी हतबल होतो आणि तो गोवंश सांभाळण्याचा मार्ग सोडतो. त्याचा परिणाम म्हणून त्या गायींकडे कसायाकडे जाण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. आम्ही १८ वर्षे गोशाळा सांभाळतो, पण आम्ही कधी वैरण किंवा अन्य कारणासाठी मदत मागितली नाही. आम्ही इथे गायी सांभाळतो म्हणून लोक आमच्याकडे गायी आणून देतात, पण वैरण कुणी देत नाही. त्यासाठी सुविधाही देत नाही. सरकारही यासाठी काही करत नाही. वैरण, गोठे, चांगले पाणी इत्यादी सुविधांची गरज असते. गायींसाठी आम्ही कितीही कष्ट उचलायला तयार आहोत, पण सरकारने तसे सहकार्य करायला हवे, तरच गोसंवर्धन चांगले होईल. त्याचा फायदा म्हणून देश गोवंश जतन आणि त्याची वाढ होईल.

विकासकामांपेक्षा गोवंश रक्षणाला प्राधान्य द्या

त्याचबरोबर रासायनिक खतांच्या माध्यमातून आपला देशाचा जो पैसा देशाबाहेर जात आहे, तो देशी गोवंशाचे जतन आणि संवर्धन केल्याने थांबेल. येणाऱ्या पिढीला रोगराई होणार नाही असे अन्नधान्य पिकेल. चांगले दूध देणाऱ्या गायीची उत्पत्ती होऊन येणारी पिढी धष्टपुष्ट होईल, निरोगी राहील. रस्ते, गटारे यासाठीची कामे थोडी उशिरा झाली तरी चालतील, पण देशी गोवंशाच्या रक्षणासाठी प्राधान्याने काम केले पाहिजे. गाय नसेल तर सृष्टीचक्र चालणार नाही, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. ९०-९५ वर्षांची माणसे आम्ही पहिली आहेत, ज्यांना चष्मा नाही, केस पांढरे झाले नाहीत, कारण त्यांना तसे देशी गायींचे तूप, दही मिळत होते, आता जे दही, तूप मिळत आहे, ते भेसळयुक्त असते जे आरोग्यासाठी अपायकारक ठरत आहे. त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने पाहायला पाहिजे तरच समाज आपोआप गायीच्या संवर्धनाकडे वळेल. शेवटी गोपालक कितीही बलवान असला तरी त्याला मर्यादा येतात. त्यासाठी सरकारने पुढाकार घ्यायला पाहिजे.

गायसोबत गोपालकही वाचावा

आजही मोठ्या प्रमाणात गोवंश सांभाळणाऱ्या गोपालकांना वैरण जमवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुष्काळ आला होता तेव्हा रेल्वेने पाणी पुरवले होते, तसे गायीवर आपत्ती येते तेव्हा आपण गांगरून जातो. पर्याय सुचत नाही. अशा वेळी सरकारने आमच्या पाठीशी राहिले पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. गाय हा अत्यंत महत्त्वाचा पशु आहे. ज्याच्यावर किडे, जीव, जंतू, पतंग, वनस्पती या सर्वांचे पोषण होत असते. सृष्टीच्या संतुलनामध्ये गायीचा मोठा वाटा आहे. आम्ही गायीच्या गोमुत्राच्या माध्यमातून अनेक औषधे बनवली आहेत, ज्याचा कोरोना काळात फायदा झाला आहे, त्याचा परिणाम आला आहे. आम्ही शेणावर प्रक्रिया करून खतही बनवतो. समाजातून समजते सरकार आम्हाला योगदान देते, पण हे योगदान जर आम्हाला खूप कष्ट घेऊन मिळत असेल तर काय उपयोग? सृष्टीचक्राचे संतुलन रहावे म्हणून आम्ही हे काम करत असतो. मधमाशी देखील स्त्री केशर आणि पुरुष केशर स्थलांतरित करत असते, जर मधमाशी संपली तर सृष्टीचक्राचे काय होईल? मग गाय तर त्याच्यापेक्षाही महत्त्वाचा घटक आहे. ज्वारी, बाजरी, गहू, मका तिच्यामुळेच पिकते, तिचे दही, दूध, तूप, लोणी पुष्टिवर्धक आहे, त्यामुळे गाय हा सृष्टिचक्रासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे गाय आणि गोपालक हा वाचला पाहिजे. सरकारने याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.

रवी महाराज (लेखक प्रसिद्ध कीर्तनकार आणि वटेश्वर गोशाळा, समर्पण गोशाळा यांचे संचालक आहेत.)

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here