मुंबई – बंगळुरू महामार्गावरील नवले पुल परिसरात अपघातांची मालिका थांबायचे काही नाव घेताना दिसत नाही. सातत्याने नवले पुलावर एकामागून एक अपघाताचे सत्र सुरू आहे. आज बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एका बोलेरो पिकअपच्या (एम एच ०९ एफ.एल ६३२९) चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून महामार्गावर पलटी झाले. यामध्ये एकूण ८ प्रवासी होते. यातील चार जण जखमी झाले आहेत. मात्र ट्रकने धडक दिल्यानंतर ट्रक चालक फरार असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – बहराइचमध्ये ट्रक-बसचा भीषण अपघात; 6 जणांचा जागीच मृत्यू, 15 जखमी)
हा अपघात नऱ्हे नवले पुलाजवळ असणाऱ्या भूमकर पुलाजवळ घडला आहे. तर या बोलेरो पिकअपला पाठीमागून ट्रकने धडक दिल्याने पिकअप पलटी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस तसेच हायवे पेट्रोलिंगचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचून अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या साहाय्याने बाजूला केले. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
या अपघातानंतर पीकअप वाहनचालकाने असे सांगितले की, माझ्या वाहनाला पाठीमागून ट्रकने धडक दिली, त्यामुळे आमचे वाहन पलटी झाले. या परिसरात गेल्या आठवड्यात सात दिवसांत आठ अपघात झाले आहेत. वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात नागरिक संतप्त झाले आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होते आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथील असणारे बोलेरो पिकअप वाहनचालक लक्ष्मण कोकरे हे कोल्हापूरहून मुंबईकडे कांदे बटाटे आणण्यासाठी निघाले होते. चालकाच्या म्हणण्यानुसार माझ्या वाहनाला पाठीमागून ट्रकने धडक दिली त्यामुळे आमचे वाहन पलटी झाले.