कॅलिफोर्निया सागरी महामार्गाच्या धर्तीवर कोकण, गोव्यासाठी आणखी नवा रस्ता तयार केला जाणार आहे. या सागरी महामार्गाच्या धर्तीवर कोकणाच्या विकासासाठी प्रस्तावित केलेल्या रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डीपर्यंतच्या सागरी महामार्गाच्या अंतिम आखणीस सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर परवानगी दिली आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात या महामार्गास मान्यता देऊन तो रस्ते विकास महामंडळाकडे सोपविला होता. ४९८ कि.मी.चा असणाऱ्या या महामार्गाच्या बांधकामासाठी दहा हजार कोटींचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.
(हेही वाचा – कंगना, राणेंनंतर मोहित कंबोज BMC च्या निशाण्यावर; म्हणाले, “कुछ भी कर लो…”)
रेवस-रेड्डी महामार्गावरील कोळशी खाडीवर बांधणाऱ्या पुलासाठी १४८ कोटी ४३ लाख २८ हजरा रूपयांच्या खर्चासही मंजुरी मिळाली आहे. अखेर त्याच्या अंतिम आखणीस १६ मार्च रोजी मान्यता मिळाली असून तो चार पॅकेजमध्ये सात टप्प्यांत बांधण्यात येणार आहे. यानुसार काही ठिकाणी तो चौपदरी, तर काही ठिकाणी दुपदरी असणार आहे. यामुळे कोकण आणि गोवा आखणी एका नव्या मार्गाने जोडले जाणार आहे.
हे आहेत चार पॅकेज
- चिर्ले ते बाणकोट खाडी १४३.९६ किमी
- बाणकोट ते जयगड बंदर ११०.२४ किमी
- जयगड ते खाक्षीतिठा १२९३८ किमी
- खाक्षीतिठा ते रेड्डी ११४.७९ किमी
कोकणचा होणार कायापालट
- रेवस ते रेड्डी हा महामार्ग सागर किनाऱ्याजवळून जाणार असल्याने समुद्रकिनाऱ्यालगतच्या पर्यटनास चालना मिळणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे.
- या महामार्गामुळे कोकणातील कृषी, मत्स्य, फळ बागायती व्यवसाय यासारख्या उद्योगासही चालना मिळेल व कोकणातील हापूस, काजू, सुपारी, नारळ आदींना थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल.
- आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झाल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील,
- हा महामार्ग रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार असला तरी ठाणे, पालघर आणि मुंबईही त्यास जोडली जाणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांचेही गोव्यापर्यंत अंतर कमी होणार आहे.