लाचखोरी प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या सहाय्यक पोलिस आयुक्त सुजाता पाटील यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुजाता पाटील यांनी त्यांना लाचखोरीच्या प्रकरणात कसे फसवण्यात आले, त्यांच्या कुटुंबाला कसा त्रास दिला जात आहे, याबाबत पाटील यांनी आपली कैफियत मांडली आहे. त्याच बरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस आयुक्त, पोलिस महासंचालक यांनी ‘मला मृत्यु द्या’, अशी विनंती पाटील यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून खोटा गुन्हा दाखल
मेघवाडी विभागाच्या तत्कालीन सहाय्यक पोलिस आयुक्त असणाऱ्या सुजाता पाटील यांना ८ ऑक्टोबर २०२१ रोजी ४० हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करून अटक केली होती. दरम्यान पाटील यांना निलंबित करण्यात आले असून सध्या त्या जामिनावर असून निलंबनाच्या कालावधीत त्यांना नायगाव सशस्त्र विभागात पाठवण्यात आले आहे. माझ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खोटा गुन्हा दाखल करून माझी फसवणूक करण्यात आली असल्याचे विविध माध्यमातून पाटील यांनी सांगितले होते.
कारकीर्द संपवण्याचा डाव
त्यानंतर पाटील यांनी मागील अडीच महिन्यापासून राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहविभाग, पोलिस आयुक्त आणि पोलिस महासंचालक यांना पत्रव्यवहार करून माझ्यावर अन्याय झाला असून मला खोट्या प्रकरणात अडकवून माझे करियर संपवण्याचा प्रयत्न काही पोलिस अधिकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यांनी करीत असल्याची कैफियत मांडली असून मला न्याय देण्यात यावा, असे म्हटले होते.
(हेही वाचा विधान भवनात कच-याचा ढिग…)
व्हिडिओ समाज माध्यमावर पोस्ट
मात्र अडीच महिने उलटूनही पाटील यांच्या अर्जाची कुठलीही दखल न घेतल्यामुळे अखेर निलंबित सहाय्यक पोलिस आयुक्त सुजाता पाटील यांनी त्यांचा एक नवीन व्हिडिओ समाज माध्यमावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत पाटील यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची कैफियत मांडली आहे, तसेच पाटील यांना कसे फसवण्यात आले, तसेच यादरम्यान त्यांच्यावर तसेच कुटुंबियांना कसे छळण्यात आले, याबाबत पाटील यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. कोर्ट कचेऱ्या करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही, मी कोर्ट कचेऱ्या नाही करू शकत, त्यापेक्षा मला तुमच्या हातून मरायला आवडेल, असे पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सहपोलिस आयुक्त, पोलिस महासंचालक यांना उद्देशून म्हटले आहे. मला सर्वांनी माफ करा, असे पाटील यांनी आपल्या व्हिडिओत म्हटले असून आपली कैफियत मांडली आहे.
Join Our WhatsApp Community