खंडणी विरोधी पथकाने उधळून लावला ‘या’ विकासकाच्या हत्येचा कट!

139

मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने मीरारोड येथील एका बड्या बांधकाम विकासकाचा हत्येचा मोठा कट उधळून लावला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीतील गँगस्टर जावेद चिकना याच्याकडून विकासकाच्या हत्येची सुपारी घेणाऱ्या छोटा राजन टोळीच्या एका माजी शूटरला खंडणी विरोधी पथकाने शस्त्रासह अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

आरिफ अराफत लोखंडवाला असे अटक करण्यात आलेल्या सुपारी किलरचे नाव असून पोलिसांना त्याच्याजवळून दोन अत्याधुनिक पिस्तूल, २८ जिवंत काडतुसे, विकासकाचा फोटो आणि पत्ता सापडला आहे. अटक करण्यात आलेला आरिफ आराफत लोखंडवाला हा थेट दाऊदचा साथीदार आणि १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेतील पाकिस्तानमध्ये असलेला आरोपी जावेद चिकना याच्या संपर्कात होता, अशी धक्कादायक माहिती चौकशीत समोर आली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कळविले असून पोलिसांनी त्याला पोलीस सुरक्षा पुरवल्याचे समजते.

(हेही वाचा – मध्य रेल्वेने ‘ही’ शक्कल लढवत केली तब्बल 87 कोटी रुपयांची बचत! )

कुख्यात गुन्हेगाराला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाने शनिवारी अरिफ अराफत लोखंडवाला या कुख्यात गुन्हेगाराला दोन पिस्तूल, अतिरिक्त मॅगझिन आणि २८ जिवंत काडतुसासह अटक केली. पोलिसांनी त्याच्यावर शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. त्याच्या झडतीदरम्यान पोलिसांना बिल्डरचे नाव, त्याचे फोटो, वर्णन, रंगाचे वर्णन असलेले दोन हाय-एंड कारचे दोन नोंदणी क्रमांक आणि कार्यालय तसेच त्याच्या निवासस्थानाचा पत्ता असलेली चिठ्ठी सापडली आहे.

जावेद चिकनाला आरोपी केले असून त्याला फरार ठरविले

धक्कादायक म्हणजे, आरोपी जावेद चिकना याच्याशी व्हॉट्सअॅप आणि इतर अॅप आधारित कॉल्सवरून बोलत होता आणि व्हॉट्सअॅप चॅट्सवरून सतत त्याच्या संपर्कात होता, असेही पोलिसांना आढळून आले आहे. “आतापर्यंत, आम्ही त्याच्यावर शस्त्रास्त्र कायद्यासाठी गुन्हा दाखल केला आहे, परंतु लवकरच पुरावे गोळा केल्यानंतर गुन्हेगारी कट आणि हत्येचा प्रयत्न हे कलम असे गुन्ह्यात वाढविण्यात येईल,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या गुन्ह्यात जावेद चिकनाला आरोपी केले असून त्याला फरार ठरविण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.