मुंबईत प्रत्येक फेरीवाल्याकडून दिवसाला शंभर ते पन्नास रुपयांचा हप्ता वसुली करणाऱ्या रॅकेटचा खंडणी विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने शनिवारी हप्ता वसुली करताना दादर येथून दोन जेष्ठ नागरिकांना तसेच मुंबईतील काळबादेवी येथून एकाला अशा एकूण तिघांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हप्ता वसुलीच्या रॅकेटमध्ये स्थानिक पोलीस स्थानिक राजकारणी आणि परिसरातील गुंड यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हप्ता गोळा करणारी टोळी
विजय नागवेकर (७१) आणि चंद्रकांत रत्नपारखी (६४) असे दादर येथून अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत, हे दोघे जमील शेख नावाच्या व्यक्तीसाठी वसुली करीत असल्याची माहिती समोर येत आहे. या जमील शेखचा कसून शोध घेतला जात असून त्याला अटक केल्यानंतर हप्ता वसुलीचे रक्कम कुठपर्यंत पोहचवली जात होती हे उघड होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. काळबादेवी येथून फैजल शेख नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
संपूर्ण मुंबईत १५ ते २० लाखापेक्षा फेरीवाले व्यवसाय करतात, एकट्या दादर आणि शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे १० ते १२ हजार फेरीवाले (हॉकर्स) फेरीचा व्यवसाय करतात. दररोज शेकडो कोटी रुपयांची उलाढाल या ठिकाणी होत असते, या फेरीवाल्यांवर कारवाई होऊ नये म्हणून प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली फेरीवाल्यांकडून स्थानिक गुंड, राजकीय नेते, पोलीस, महानगरपालिका त्याचबरोबर काही समाजसेवेच्या नावाखाली वावरणाऱ्या कथित समाजसेवक यांच्याकडून दररोज हप्तावसुली केली जाते.
(हेही वाचा – …म्हणून बंगालच्या उपसागरातील वादळाला पडलं ‘असानी’ नाव!)
या हप्त्याची रक्कम गोळा करण्यासाठी स्थानिक गुंड टोळ्यांची मदत घेतली जात असून या गुंड टोळ्यांचे माणसे दादर, शिवाजी पार्क परिसरातील एका फेरीवाल्यांकडून दररोज १०० ते ५० रुपयांची हप्ता म्हणून वसुली करतात. जो फेरीवाला हप्ता देण्यास मनाई करतो त्याला त्या ठिकाणी व्यवसाय करून दिला जात नाही. दादर आणि शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत या फेरीवाल्यांकडून वसुली करणाऱ्या वेगवेगळ्या टोळ्या असून ‘प्रोटेक्शन मनी’ या नावाखाली ही वसुली होत असते अशी माहिती स्थानिक फेरीवाल्यांकडून दिली गेली. पोलीस, नेते आणि महानगरपालिकेसाठी वसुली करणाऱ्या वेगळ्या टोळ्या आहेत. एका फेरीवाल्याला या सर्वांचे हप्ते मिळून दिवसाला ४०० ते ५०० रुपये वाटावे लागतात त्या वेळी याठिकाणी ते सुखाने व्यवसाय करू शकतात अशी माहिती काही फेरीवाल्यांनी दिली आहे.
पोलीस आयुक्तांचा कारवाईचा आदेश
मुंबईतील फेरीवाल्यांकडून प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली गुंड टोळ्या बळजबरी वसुली करीत असल्याच्या अनेक तक्रारी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे आल्यानंतर पांडे यांनी खंडणी विरोधी पथकाला हप्ते उकळणाऱ्या गुंडावर कारवाईचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण, उपनिरीक्षक सुशील वंजारी व थोरात यांच्या नेतृत्वाखाली खंडणी विरोधी सेलच्या पथकाने सापळा रचून फेरीवाल्यांकडून प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली हप्ता स्वीकारताना रत्नपारखी व नागवेकर यांना पकडले. त्याच बरोबर लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करणाऱ्या फैजल शेख याला शनिवारी अटक करण्यात आली आहे.
वरपर्यत पोहचवला जातो हप्ता
खंडणी विरोधी पथकाने अटक केलेले केवळ हप्ता गोळा करण्याचे काम करतात, हा सर्व हप्ता दररोजच्या दररोज त्यांच्या बॉसच्या हातात दिला जातो, त्यातील काही हिस्से केले जातात आणि ते हिस्से वरपर्यत पोहचवले जात असल्याचे चौकशीत समोर आले आहे. हे हिस्से कुठपर्यंत पोहचवले जातात त्याचा तपास सुरू असून त्यात कोणीही दोषी आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई करून त्यांना देखील अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांकडून दिली गेली आहे.
कारवाईनंतर हप्ते वसुली करणारे भूमिगत
खंडणी विरोधी पथकाच्या कारवाईनंतर मुंबईतील फेरीवाल्यांकडून बेकायदेशीर वसुली करणाऱ्या टोळ्या आणि या टोळ्यांचे म्होरके भूमिगत झाले आहेत. पोलिसांच्या कारवाईनंतर बेकायदेशीर वसुली तर बंद झाली मात्र फेरीवल्यावर मनपा आणि स्थानिक पोलिसांकडून कारवाई सुरू झाल्याची नाराजी अनेक फेरीवाल्यांनी व्यक्त केली आहे. आम्ही हप्ते देऊन सुखाने व्यवसाय करीत होतो, हप्ता बंद झाल्यामुळे आम्हाला कारवाईला समोरे जावे लागत असल्याचे फेरीवल्यांचे म्हणणे आहे.