मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेने आता चाचण्यांवर अधिक भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत आता मुंबईतील खाऊगल्ल्यांसह मार्केट, फेरीवाले, पर्यटनस्थळे, सरकारी कार्यालयांसह चौपाट्यांच्या ठिकाणी रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत. त्यामुळे मुंबईत दरदिवशी सुमारे ५० हजार अँटीजेन चाचण्या या सर्व ठिकाणांसह मॉल्स, लांब पल्ल्याची रेल्वे स्थानके आणि बस आगारांच्या ठिकाणी करण्याचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले आहे.
…नाहीतर कारवाई होणार
मुंबई महापालिकेच्यावतीने सार्वजनिक ठिकाणी कोरोना चाचणी करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी गर्दीच्या ठिकाणी रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. या अँटीजेन टेस्ट मॉल्स, रेल्वे टर्मिनस, एस.टी. आगार, खाऊ गल्ली, फेरीवाले, मार्केट, पर्यटन स्थळे, विविध सरकारी कार्यालयांमध्ये करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये मॉल्समध्ये अँटीजेन टेस्टसाठी नागरिकांकडून पैसे आकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर ही टेस्ट करण्यास नागरिकांनी नकार दिल्यास त्यांच्यावर अॅपिडेमिक अॅक्टनुसार कारवाई करण्याचेही निर्देश दिले आहेत. तर इतर गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी करण्यात येणाऱ्या अँटीजेन टेस्टसाठी महापालिकेच्यावतीने खर्च करण्यात येणार आहे. मात्र, या चाचणीमध्येही नागरिकांनी अडथळा आणल्यास अथवा चाचणी करण्यास नकार दिल्यास, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
(हेही वाचाः आयुक्त नक्की कोणाला घाबरतात? कोरोनाला की नगरसेवकांना?)
जवळपास ५० हजार चाचण्यांचे लक्ष्य
मुंबईत एकूण २७ मॉल्स असून त्याठिकाणी दरदिवशी १० हजार ८०० लोकांची अँटीजेन टेस्ट करण्याचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले आहे. तर ९ रेल्वे टर्मिनस व ४ एस.टी. बस आगारांमध्ये प्रत्येकी १ हजार प्रवाशांची चाचणी करण्यात येणार आहे. तर २४ विभाग कार्यालयांमधील मार्केट, खाऊगल्ली, फेरीवाले, चौपाटी तसेच पर्यटन स्थळे आदी ठिकाणी सरासरी १ हजार लोकांची अशाप्रकारे दिवसाला २४ हजार लोकांची अँटीजेन टेस्ट करण्याचे निर्धारित करण्यात आले आहेत. त्यामुळे दिवसाला ४७ हजार ८०० लोकांची चाचणी करण्याचे निर्देश सर्व विभागीय सहाय्यक आयुक्तांनी दिले असून, याचा दैनंदिन अहवाल अतिरिक्त आयुक्त पश्चिम उपनगरे यांना सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
मुंबईतील कोणत्या मॉल्समध्ये होणार तपासणी
सी आर-२ मॉल, सोबो सेंटर मॉल, क्रिस्टल शॉपिंग मॉल, रिलायन्स मॉल, सिमलिम मॉल, फिनिक्स मॉल, ऍट्रीया मॉल, स्टार मॉल, नक्षत्र मॉल, ग्लोबस मॉल, सिटी मॉल, इन्फिनिटी मॉल, प्राईम मॉल, ऑबेरॉय मॉल, इन्फीनिटी मॉल, ग्रोवेल्स मॉल, रघुलीला मॉल, मोक्ष मॉल, कुर्ला फिनिक्स मॉल, मार्केट सिटी मॉल, के स्टार मॉल, आर सिटी मॉल, प्लॅटिनम मॉल, एस. मॉल, निलयोग मॉल, ड्रिम मॉल, आर. सिटी मॉल.
(हेही वाचाः आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण! ट्वीट करत दिली माहिती)
रेल्वे टर्मिनस
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल, दादर पश्चिम व मध्य रेल्वे, वांद्रे रेल्वे टर्मिनस, अंधेरी, बोरीवली, कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस.
एस.टी. बस आगार
मुंबई सेंट्रल, परेल, बोरीवली, कुर्ला.
Join Our WhatsApp Community