मनसुख हिरेन प्रकरण: मुंबई गुन्हे शाखेचा अधिकारी एटीएसच्या ताब्यात!

शुक्रवारी सचिन वाझे यांच्या जामीन अर्जवर सुनावणी होणार आहे त्यावर एटीएस आपले म्हणणे कोर्टात मांडणार आहे. वाझे यांचा ताबा मिळवण्यासाठी एटीएस न्यायालयाकडून आरोपीचे प्रॉडक्शन वॉरंट घेणार आहे.

94

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करणारे राज्याच्या एटीएस पथकाच्या हाती मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आल्याचा भक्कम पुरावा लागला आहे. गुरुवारी एटीएसच्या पथकाने मुंबई गुन्हे शाखेच्या एका युनिट प्रमुखाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्या अधिकाऱ्याकडे चौकशी सुरू होती. दरम्यान एटीएसकडून सचिन वाझेंचा ताबा घेण्याचे प्रयत्न सुरू होते. शुक्रवारी सचिन वाझे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यावर एटीएस आपले म्हणणे कोर्टात मांडणार आहे. वाझे यांचा ताबा मिळवण्यासाठी एटीएस न्यायालयाकडून आरोपीचे प्रॉडक्शन वॉरंट घेणार आहे.

सचिन वाझे आपोआप निलंबित!

एखाद्या गुन्ह्यात अटक करण्यात आल्यानंतर, पोलिस कोठडीत २४ तास घालवणाऱ्या सरकारी नोकर किंवा अधिकारी यांना निलंबित करण्याची तरतूद आहे. या तरतुदीनुसार मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडल्या प्रकरणी एनआयएकडून अटक करण्यात आलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे हे दुसऱ्यांदा निलंबित होणारे अधिकारी असणार आहेत. ख्वाजा युनूस प्रकरणात १६ वर्षांपूर्वी निलंबित झालेले वाझे दुसऱ्यांदा निलंबित होतील. ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबित झालेले सचिन वाझे यांना तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पोलिस दलात घेण्यात आले होते. जून २०२० मध्ये वाझे यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर महिन्याभरातच गुन्हे शाखेत महत्वाची मानले जाणाऱ्या गुप्तवार्ता तपास पथकात(सीआययू) प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

(हेही वाचाः ‘या’ मुंबई पोलीस आयुक्तांची कारकीर्द ठरलेली वादग्रस्त!)

अवघ्या १० महिन्यांत पुन्हा निलंबित!

या दहा महिन्यात वाझे यांच्याकडे मुंबईतील महत्वाचे गुन्हे तपासण्यासाठी देण्यात आले होते. त्यापैकी उद्योगपती मुकेश अंबानी प्रकरणाचा तपास देखील सीआययूकडे देण्यात आला होता. या गुन्ह्याचे तत्कालीन तपास अधिकारी म्हणून सचिन वाझे हे होते. मात्र काही दिवसांनी हा तपास एसीपी नितीन अलुकनुरे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. नंतर हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपासात या गुन्ह्याचे पहिले तपास अधिकारी म्हणून काम बघणारे सीआययूचे प्रभारी सचिन वाझे यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघडकीस आल्याने त्यांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली होती. केवळ दहा महिन्यांतच सचिन वाझे यांची कारकीर्द वादाच्या भोवऱ्यात अडकली आणि दहा महिन्यांतच वाझे यांना दुसऱ्यांदा निलंबनाला सामोरे जावे लागत आहे. सोमवारी त्यांच्या निलंबनाचे अधिकृत आदेश मुंबई पोलिस आयुक्तांना जारी करावे लागणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.