बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या अखत्यारित येणाऱ्या मुलुंडच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील बॅटमिंटन हॉलची जागा भाड्याने देण्यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये अवघ्या तीन संस्थांनी निविदा सादर केली आहे. परंतु निविदा भरणाऱ्या संस्थांपैंकी एकही संस्था बॅटमिंटनच्या खेळाच्या निगडीत नसून महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडून विचारणा झाल्यानंतर या क्रीडा संकुलातीलच तीन संस्थांना घाईघाईत निविदा भरण्यास भाग पाडल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या क्रीडा संकुलात खेळाडू घडवायचे आहेत की खेळाच्या व्यतिरिक्त या जागा अन्य वापराच्या संस्थांना देवून त्यांचे व्यावसायिकीकरण करायचे आहे असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
( हेही वाचा : जास्त काढा प्यायल्याचा परिणाम झाला भारी… गॅस्ट्रो, अल्सरचे रुग्ण डॉक्टरांच्या दारी )
भाडेतत्वावर देण्याचा निर्णय
बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठान दिवाळखोरीच्या मार्गावर असल्याने येथील प्रत्येक विभागाचे खासगीकरण करण्यास सुरुवात केली आहे. मुलुंडमधील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील बॅटमिंटन कोर्टची जागा कंत्राटदाराने स्वत: खर्चाने विकसीत करून सात वर्षे वापरण्याकरता भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी वर्षाला अंदाजित ९५ लाखांचे भाडे आकारण्यासाठी निविदा मागवली होती. या निविदेत २५ लाखांचे डिपॉझिट भरण्याची अट समाविष्ट होती. यासाठी अर्ज विक्री ५ एप्रिलपासून सुरुवात झाली होती. तर १९ एप्रिलपर्यंत निविदा अर्ज विक्री केली जाणार होती आणि यासाठी २० एप्रिलपर्यंत हे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख होती.
बॅटमिंटन या खेळाशी काहीही संबंध नाही
परंतु या निविदेमध्ये तीन संस्थांनी निविदा भरल्याची माहिती मिळत आहे. या तिन्ही संस्थांचा बॅटमिंटन या खेळाशी काहीही संबंध नसल्याचे बोलले जात आहे. तिन्ही संस्थांपैकी एका संस्था कॅटरिंगशी निगडीत, दुसऱ्या दोन संस्था या टर्फ बनवणे आणि जिमनॅस्टीकशी निगडीत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे महापालिकेला या क्रीडा संकुलातून बॅटमिंटनचे खेळाडू घडवायचे आहेत की फक्त बॅटमिंटनची जागा केवळ व्यावसायिकीकरणासाठी देऊन त्यातून खेळाडू ऐवजी पैसा कमवायचा आहे,असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रतिष्ठानचे विशेष कार्य अधिकारी देवेंद्र कुमार जैन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यामध्ये किती निविदा सादर झाल्या याबाबत आपल्याला कल्पना नाही. परंतु याबाबतचा पुढील निर्णय हा वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतरच केला जाईल. त्यामुळे तुर्तास याबाबतची पुढील कार्यवाही केली जाणार नाही.
Join Our WhatsApp Community