धारावी पाठोपाठ वरळी आणि मालाड मलजल प्रक्रिया केंद्राच्या प्रस्तावांना मंजुरी

146

मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामांपैंकी धारावी पाठोपाठ आता वरळी आणि मालाड प्रक्रिया केंद्राच्या प्रस्तावांनाही प्रशासकांनी मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे आता धारावीसह वरळी आणि मालाड मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामांना आता गती मिळणार आहे.

( हेही वाचा : पोलीस आयुक्तांच्या निर्देशानंतरही रेल्वे स्थानकांवरील फेरीवाल्यांचा विळखा आवळलेलाच)

महानगरपालिकेकडून मुंबई महानगरात एकूण ७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहेत. वरळीमध्ये (५०० दशलक्ष लीटर प्रतिदिन), वांद्रे येथे (३६० दशलक्ष् लीटर प्रतिदिन) मालाडमध्ये (४५४ दशलक्ष लीटर प्रतिदिन) घाटकोपरमध्ये (३३७ दशलक्ष लीटर प्रतिदिन) धारावीमध्ये (४१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन) भांडुपमध्ये (२१५ दशलक्ष लीटर प्रतिदिन) आणि वेसावे (वर्सोवा) येथे (१८० दशलक्ष लीटर प्रतिदिन) याप्रमाणे एकूण ७ केंद्र उभारणे नियोजित आहे. त्यासाठी सुमारे २६ हजार कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे. या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणीस असलेल्या प्रकरणात, मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित असताना २४ फेब्रुवारी २०२२ रोजी न्यायालयाने निर्देश दिले होते. या निर्देशानुसार महानगरपालिकेला या ७ केंद्रांसाठी निविदा प्रकाशित करणे, निविदा प्रक्रिया पूर्ण करणे तसेच निविदा प्रक्रियेबाबतची माहिती सर्वोच्च न्यायालयासमोर ४ मे २०२२ पूर्वी सादर करणे, असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करून पात्र निविदाकारांची माहिती न्यायालयाला सादर केल्यानंतर आता याबाबतच्या प्रस्तावांना मंजुरी दिली जात आहे.

तीन केंद्रांच्या प्रस्तावांना मंजुरी

मलनि:सारण प्रकल्प विभागाच्या माध्यमातून मागील शुक्रवारी धारावी मलजल प्रक्रिया केंद्राच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर उर्वरीत पैंकी मालाड आणि वरळी मलजल प्रक्रिया केंद्राच्या प्रस्तावांनाही प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी मंजुरी दिल्याची माहिती मिळत आहे. मालाड मलजल प्रक्रिया केंद्रासाठी सीसी लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली असून यासाठी सुमारे ६३०० कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. तर वरळी मलजल प्रक्रिया केंद्रासाठी सुएझ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व सुएझ इंटरनॅशनल ही कंपनी पात्र ठरल्याची माहिती मिळत आहे. या कंपनीला ५८०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण ७ केंद्रांपैकी धारावी,मालाड व वरळी या तीन केंद्रांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळालेली आहे. तर उर्वरीत वांद्रे, घाटकोपर, भांडुप व वेसावे या चार केंद्रांचे प्रस्तावही टप्प्याटप्याने प्रशासकांच्या मंजुरीसाठी पाठवले जाणार असल्याची माहिती मलनि:सारण प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.