मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या आणि राज्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दोनदा पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपांबाबतच्या रस्ते सिमेंटीकरणाच्या कामांच्या निविदा अंतिम होऊन पात्र कंत्राटदारांची निवड करण्यात आली. पश्चिम उपनगरांतील तीन परिमंडळांसाठी स्वतंत्र तीन कंत्राटदार आणि शहर व पूर्व उपनगरांमधील प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ९१० रस्ते आणि ८६ सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचे खराब झालेले भाग आदींची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेच्यावतीने पाच कंत्राटदारांची अंतिम निवड करण्यात आली आहे. या सिमेंट काँक्रिटच्या पाचही प्रस्तावांना प्रशासकांची मान्यता देऊन कार्यादेशही बजावण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई महापालिकेच्यावतीने नियोजित ३९७ किलोमीटर लांबीच्या रस्ते काँक्रिटीकरण कामांमध्ये निश्चित कार्यपद्धती व नियमानुसारच कार्यवाही करण्यात येत असून या प्रक्रियेमध्ये, निविदेतील निकषानुसारच सर्व कंत्राटदार पात्र ठरले असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. या कंत्राट कामांसंदर्भात शिवसेना नेते व माजी पालकमंत्री तथा आमदार आदित्य ठाकरे यांना दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन महापालिका प्रशासक इक्बाल सिंह चहल आणि राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली.
रस्ते कामांचा कालावधी ठरवताना काँक्रिट क्युरिंग टाइम व वाहतूक समन्वय यासह सर्व बाबी लक्षात घेऊनच तो ठरवण्यात आला आहे. त्यामुळे एकूणच नियोजित रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे, त्याची प्रशासकीय कार्यवाही, निविदा प्रक्रिया या सर्व बाबींमध्ये निकष पाळले जात आहेत, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात येत आहे.
महानगरपालिकेकडून हाती घेण्यात येणाऱ्या ३९७ किलोमीटर लांबीच्या रस्ते काँक्रिटीकरणामध्ये पश्चिम उपनगरांमधील ५१६ रस्ते, शहरांमधील २१२ रस्ते आणि ८५ तुटलेले सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे भाग तसेच पूर्व उपनगरांमधील १८२ रस्त्यांचा समावेश आहे. या पाचही कामांसाठी स्वतंत्र कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. या सर्व ३९७ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी विविध करांसह सुमारे ८३१९ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून यासर्व प्रस्तावांना प्रशासकांची मान्यता मिळाल्याची माहिती रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मंजुरी प्राप्त झाल्याने रस्ते कामांचे कार्यादेशही कंत्राटदारांना देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
शहर भागांच्या रस्ते सिमेंटीकरणाच्या कामांसाठी रोड वे सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड, पूर्व उपनगरांमधील रस्ते सिमेंटीकरणाच्या कामांसाठी ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड, तर पश्चिम उपनगरांमधील रस्ते कामांसाठी दिनेशचंद्र आर अग्रवाल इन्फ्राकॉन, मेघा इंजिनिअरिंग ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, एनसीसी लिमिटेड या कंपन्या पात्र ठरल्या आहे.
( हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा; कडक पोलीस बंदोबस्त )
रस्ते सिमेंटीकरणासाठी हाती घेण्यात येणारे रस्ते आणि निवड झालेले कंत्राट कंपन्या तसेच रक्कम
शहर भाग
परिमंडळ १ व २:
- सिमेंट काँक्रीट करण्यात येणारे रस्ते: २१२रस्ते आणि ८५ तुटलेले काँक्रीट रस्त्यांचा भाग
- कंत्राटदार: रोड वे सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड
- कंत्राट किंमत : १६८७ कोटी रुपये(विविध करांसह)
पूर्व उपनगरे
परिमंडळ ५ व ६:
- सिमेंट काँक्रीट करण्यात येणारे रस्ते: १८२रस्ते
- कंत्राटदार: ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड
- कंत्राट किंमत :११५८ कोटी रुपये (विविध करांसह)
पश्चिम उपनगरे
परिमंडळ ७ :
- सिमेंट काँक्रीट करण्यात येणारे रस्ते: १३७ रस्ते
- कंत्राटदार: दिनेशचंद्र आर अग्रवाल इन्फ्राकॉन
- कंत्राट किंमत : १५६७ कोटी (विविध करांसह)
परिमंडळ ४ :
- सिमेंट काँक्रीट करण्यात येणारे रस्ते: १८८ रस्ते
- कंत्राटदार: मेघा इंजिनिअरिंग ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड
- कंत्राट किंमत : २२३२ कोटी रुपये (विविध करांसह)