मुंबईतील समुद्रात क्रूझवरील ड्रग्सच्या पार्टीत एनसीबीच्या छापेमारीत आजवर १७ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानाचा मुलगा आर्यन खान यालाही अमली पदार्थ सेवन केलेल्या स्थितीत ताब्यात घेतले. आर्यन खानसह आठ जणांना किल्ला महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावताच आरोपीच्या वकिलांनी तात्काळ सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या जामीन अर्जावर शुक्रवारी ११ वाजता सुनावणी होणार असून तोपर्यंत आजची रात्र आर्यन आणि इतर आरोपींना एनसीबीच्या कोठडीत काढावी लागणार आहे.
मुंबई बंदरातून गोव्याकडे निघालेल्या कॉर्डिलिया क्रूझ या जहाजावर सुरू असलेल्या कथित रेव्ह पार्टी २ ऑक्टोबर रोजी एनसीबीने उधळून लावत ८ जणांना अटक केली होती. या मध्ये बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि दिल्लीची मॉडेल मुनमुन धामेचा यांचा समावेश होता. अटक करण्यात आलेल्या प्रत्येकाकडून एनसीबीने अमली पदार्थ जप्त केले होते. एनसीबीने आरोपींची ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी मागितली आहे. परंतु एनसीबीला तपासासाठी पुरेसा वेळ आणि संधी देण्यात आली म्हणून कोठडीत चौकशी करण्याची आवश्यक नाही, असे सांगत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
आतापर्यंत १७ जणांना अटक!
मुंबईतील समुद्रात क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीच्या छापेमारी प्रकरणात आतापर्यंत १७ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती एनसीबीने न्यायालयात दिली. एनसीबीकडून आणखी काही पुरावे देखील न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाशी संबंधित १७ वी अटक केली. मुंबईतील पवई येथून एका अचित कुमार नावाच्या व्यक्तीला एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. अचित कुमार याच्याकडून २.६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असल्याची माहिती एनसीबीने न्यायालयात दिली. तसेच अचित कुमार गांजा पुरवण्याचे काम करतो, असाही दावा एनसीबीने केला.
(हेही वाचा : भाजपातील ‘या’ नेत्यांची राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती!)
अचित कुमारच्या कोठडीत ९ ऑक्टोबरपर्यंत वाढ!
अचित कुमार हा आर्यन खान आणि अरबाज मर्चंट या दोघांना गांजा पुरवत होता. अचित कुमारकडून २.६ ग्रॅम गांजा देखील जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती एनसीबीच्या वकिलांनी न्यायालयात दिली. त्यामुळे आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना अचित कुमार गांजा पुरवत असल्याचे एनसीबीच्या चौकशीत उघड झाले आहे. अचित कुमार याची माहिती देखील आर्यन खान यानेच एनसीबीला चौकशी दरम्यान दिल्याचे एनसीबीच्या सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. अचित कुमार गांजा पुरवणाऱ्या नेटवर्कचा दुवा असल्याचे एनसीबीने न्यायालयात म्हटले आहे. अचित कुमारशी असलेल्या संपर्कामुळे आता आर्यन खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अचित कुमार याला ९ ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी सुनावली आहे.
Join Our WhatsApp Community