ठाण्यात सप्टेंबरमध्ये लष्कर भर्ती मेळावा, कोणाला करता येणार अर्ज

89

मुंबईच्या लष्करी भर्ती कार्यालयातर्फे लष्करातील भर्तीसाठी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात कौसा व्हॅली संकुलातील अब्दुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडीयम येथे 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2022 या कालावधीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील युवकांसाठी रोजगार संधी निर्माण करणे आणि त्याद्वारे त्यांना भारतीय लष्कराचा भाग होऊन मातृभूमीची सेवा करण्याची तसेच सन्माननीय जीवन जगण्याची संधी देणे हा या भर्ती मेळाव्याच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.

(हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे सरकारला धक्का, तीन अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती)

या पदांसाठी उमेदवारांची होणार निवड

  1. या मेळाव्यामध्ये अग्निवीर सामान्य सेवा,
  2. अग्निवीर तांत्रिक,
  3. अग्निवीर लिपिक/ भांडार व्यवस्थापक तांत्रिक,
  4. अग्निवीर कुशल कारागीर (दहावी उत्तीर्ण),
  5. अग्निवीर कुशल कारागीर (आठवी उत्तीर्ण) या पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल.

12HDGB

कोणाला करता येणार अर्ज

महाराष्ट्र राज्यातील, पुढील आठ जिल्ह्यांतील कायम निवासी असलेल्या उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येईल.

  • 1.मुंबई शहर,
  • 2.मुंबई उपनगर,
  • 3.नाशिक,
  • 4.रायगड,
  • 5.पालघर,
  • 6.ठाणे,
  • 7.नंदुरबार
  • 8.धुळे

असा करा अर्ज

इच्छुक उमेदवारांनी भारतीय लष्कराच्या www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन पद्धतीने यशस्वीपणे नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या इमेल आयडीवर प्रवेश पत्र पाठविण्यात येणार आहे. प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या तारखेनुसार जिल्हा आणि तहसील पातळीवर संभाव्य उमेदवारांची छाननी करण्यात येईल. बायोमेट्रिक पद्धतीने त्यांना सत्यापित केले जाईल आणि प्रत्यक्ष निवड चाचण्या होण्यापूर्वी त्यांना मेळाव्यासाठी दिलेले प्रवेशपत्र तपासण्यात येईल.

भर्तीसाठी पुढील तीन टप्प्यांमध्ये होणार चाचण्या

शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि सामायिक प्रवेश परीक्षा (लेखी परीक्षा – सीईई). शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नोव्हेंबर 2022 मध्ये होणारी लेखी परीक्षा द्यावी लागेल. अंतिम चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना देशसेवेसाठी अग्निवीर म्हणून भारतीय लष्करात भर्ती होण्याबाबतचे पत्र देण्यात येईल.

या भर्तीसाठी इंटरनेटवरून नोंदणी करताना योग्य प्रक्रियेचे कसोशीने पालन करण्याचे आवाहन उमेदवारांना करण्यात आले आहे. उमेदवारांनी त्यांचे तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि मेळाव्याच्या ठिकाणी येताना सर्व आवश्यक कागदपत्रे आणि मूळ प्रमाणपत्रे तसेच सर्व कागदपत्रांच्या प्रमाणित फोटोप्रती आणि अधिकृत सूचनेमध्ये दिलेल्या सूचनांनुसार रीतसर नोटरी केलेले अनिवार्य प्रतिज्ञापत्र सोबत आणावेत.

ही संपूर्ण भर्ती प्रक्रिया अत्यंत न्याय्य, पारदर्शक, मुक्त आणि स्वयंचलित पद्धतीने होत असून इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या मध्यस्थीला बळी पडू नये असे आवाहन लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. कोणत्याही उमेदवाराकडे अशा प्रकारे कोणी दलाल अथवा मध्यस्थ आला असेल तर ही घटना त्वरित लष्करी अधिकारी किंवा पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावी. यासंदर्भातील कोणत्याही चौकशीसाठी उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर लॉगीन करावे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.