रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांसाठी बेस्ट बस सुविधेसह चहा नाश्ताची व्यवस्था करा : मुख्यमंत्र्यांचे महापालिका आयुक्तांना निर्देश

151

मुंबईत अतिवृष्टीसह मुसळधार पावसात रेल्वेच्या २५ ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात आणि त्यामुळे रेल्वे लोकल सेवा खंडित होते. त्यामुळे रेल्वे मार्गावरील तुंबणाऱ्या पाण्यामुळे लोकल सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होतात, त्यामुळे अशा पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी महापालिकेच्या सहाय्य आयुक्तांना तैनात करून अडकलेल्या प्रवाशांना चहा पाणी  नाश्ताची सुविधा करून त्यांना बेस्ट बसची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांना दिले आहेत.

२५ ठिकाणी विशेष काळजी घेण्याचे निर्देश

मुंबईत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत विविध भागांमधील  पाणी साचलेल्या विविध ठिकाणांचा आढावा घेतला. यावेळी रेल्वेच्या मार्गावर २५ ठिकाणी पाणी तुंबले जात असल्याची माहिती महापालिका प्रशासनावतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. माहितीनंतर मुख्यमंत्र्यांनी रेल्वेच्या या २५ ठिकाणी विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना, मुख्यमंत्री शिंदे यांनी आपण महापालिका आयुक्तांना सूचना केल्या आहेत, ज्यामध्ये रेल्वे मार्गावरील ज्या २५ ठिकाणी जमा होऊन रेल्वे सेवा खंडित होते, त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. त्यांना अधिकचा त्रास होतो. त्यामुळे याठिकाणी यंत्रणा उभी करून सहायक आयुक्तांना तैनात केले जावे आणि प्रवाशांना चहा,पाणी नाश्ताची सुविधा उपलब्ध करून तसेच त्यांना बेस्ट बसची सुविधाही उपलब्ध करून दिली जावी,अशी सूचना केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. अडकलेल्या प्रवाशांचा अधिकचा खर्च होऊ नये. कोणताही प्रवाशी घरातून अधिक पैसे घेऊन बाहेर पडत नाही. त्यामुळे त्यांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी शाळांमध्ये तयारी केली जावी,अशीही सूचना शिंदे यांनी केली.

( हेही वाचा : NDRF आणि SDRF तैनात! अतिवृष्टीत मदत कार्यासाठी यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश)

मुंबईतील अनेक इमारती या अतिधोकादायक म्हणून सी वन तसेच सी टू म्हणून जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे या इमारतींना नोटीस देण्यात आल्या असून आता प्रत्येक अतिधोकादायक इमारतीत राहणाऱ्यांच्या जीवाचे मोल मोठे आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात पाऊस पडत असताना दुघर्टना होऊन कोणत्याही जिवितेचे तसेच मालमत्तेचे नुकसान टाळणे आवश्यक असून प्रत्येक नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. तसेच यासदंर्भात आणखी काही असेल तर त्याबाबतही चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.