गडचिरोली जिल्ह्यात यंदाच्या वर्षांत पुन्हा हत्तीचा कळप दिसून आला आहे. तब्ब्ल 35 हत्ती गडचिरोली जिल्ह्यात वावरत आहेत. दोन दिवसांपूर्वीच हत्तीचा कळप गडचिरोलीत दाखल झाला. हा नवा कळप असून किमान सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ मुक्काम करेल, असा अंदाज वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
35 हत्तींचा मुक्काम मोठ्या काळासाठी राहणार
छत्तीगढच्या अभयारण्यात अधिवास क्षेत्राला बाधा पोहोचत असल्याने हत्ती पुन्हा गडचिरोलीत मुक्काम हलवत असल्याचे निरीक्षण वन्यजीव अभ्यासकांनी केले आहे. गडचिरोली जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक उदय पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसनगाव परिसरात त्यांचा मुक्काम दिसून आला आहे. या भागात मुबलक प्रमाणात जलसाठा उपलब्ध असल्याने नव्याने आलेल्या 35 हत्तीचा मुक्काम मोठ्या काळासाठी राहील. वनविभाग खबरदारीचा उपाय म्हणून जनजागृती कार्यक्रमाला सुरुवात करत आहे, मात्र हत्तीमुळे पिकांचे किंवा इतर मानवी मालमत्तेचे होणारे नुकसान लक्षात घेत आर्थिक नुकसान भरपाई तातडीने द्यावी, अशी मागणी पटेल यांनी केली.
(हेही वाचा भारतीय नौदलाकडून आगळीवेगळी सलामी! शूरवीरांनी उरणच्या समुद्रात फडकवला तिरंगा)
नव्या अधिवासच्या शोधात
छत्तीसगढ येथील उदंती व्याघ्र प्रकल्प तसेच बावनपाडा वन्यजीव अभयारण येथे मोठया प्रमाणात खाणकाम सुरु आहे. त्यामुळे या भागातील हत्ती महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात नवा अधिवास शोधत आहेत. गडचिरोलीत त्यांना पुरेसे अन्न आहे. बांबूचे पीक या भागात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदाच्यावेळी हत्तीनी वैनगंगा नदी पार करत ब्रह्मपुरीत शिरकाव केला तर हत्ती विदर्भ सोडणार नाहीत, अशी खात्री पटेल यांनी व्यक्त केली.
हत्तीचा वावर असलेल्या क्षेत्रात आवश्यक काळजी घ्या
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 22 हत्तीचा कळप मुरूनगावात आढळून आला होता. त्यावेळी वनविभागाने विशेष टीम तैनात करून हत्तीची काळजी घेतली होती. आता लोकांनी हत्तीचा वावर असलेल्या क्षेत्रात विशेष काळजी घ्यावी, त्यांच्याजवळ जाऊ नये, असे आवाहन वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्टचे प्रफुल्ल बांभूरकर यांनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community