बेस्ट ऑनलाइन न्यूज पोर्टल पुरस्काराने ‘हिंदुस्थान पोस्ट’चा सन्मान

कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये अवघे जग ठप्प झाले होते. त्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने ‘हिंदुस्थान पोस्ट’ या न्यूज पोर्टलची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. अवघ्या दीड वर्षांच्या कालावधीत पोर्टलने लाखो लोकांपर्यंत पोहचण्याची किमया साध्य केली. त्याची ‘अर्थसंकेत’ या मासिकाने दखल घेतली आणि ‘हिंदुस्थान पोस्ट’ या न्यूज पोर्टलला शुक्रवार, २९ एप्रिल या दिवशी ‘डिजिटल इंडिया २०२२ – बेस्ट ऑनलाइन न्यूज पोर्टल’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या मादाम कामा सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा झाला.

हा पुरस्कार ‘हिंदुस्थान पोस्ट’ न्यूज पोर्टलच्या सल्लागार संपादिका मंजिरी मराठे आणि टेक्निकल विभागाचे प्रमुख प्रमोद गणेशे यांनी स्वीकारला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माहिती आणि जनसंपर्क विभागाचे माजी संचालक देवेंद्र भुजबळ, डीसीबी बँकेचे डिजिटल व टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख प्रसन्न लोहार, एमईपीएल समूहाचे सर्वेसर्वा सुधीर म्हात्रे, डिजिटल बिझनेस कोच जोतिराम सपकाळ, ‘अर्थसंकेत’चे संस्थापक डॉ. अमित बागवे व सह संस्थापक रचना बागवे आदी उपस्थित होते. मागील सहा वर्षांपासून ‘अर्थसंकेत’कडून उद्योन्मुख व्यावसायिकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे.

(हेही वाचा ‘अर्थसंकेत प्रस्तुत डिजिटल इंडिया २०२२’ पुरस्काराचे होणार वितरण)

‘हिंदुस्थान पोस्ट’ राष्ट्रहितासाठीच कार्यरत! – मंजिरी मराठे 

निष्पक्ष पत्रकारिता करणे या प्रमुख उद्देशासाठी ‘हिंदुस्थान पोस्ट’ सुरू करण्यात आले आहे. आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही, आम्ही केवळ हिंदुस्थानी आहोत म्हणून आमचे नाव हिंदुस्थान पोस्ट. असे ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या सल्लागार संपादिका मंजिरी मराठे यांनी आपल्या मनोगतात सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी नेहमी राष्ट्र हे सर्वप्रथम मानले. ‘हिंदुस्थान पोस्ट’चेही हेच उद्दिष्ट आहे. म्हणून आम्ही राष्ट्रहिताच्या बातम्या देत असतो, त्यासाठी काम करतो. कोरोनाच्या काळात जेव्हा सगळे जग थांबले होते, तेव्हा आमचे सर्व सहकारी रात्रं-दिवस जागून मेहनत करून हे न्यूज पोर्टल उभे करत होते. अवघ्या दीड वर्षांत न्यूज पोर्टल लाखो लोकांपर्यंत पोहचले, असे त्या म्हणाल्या. या पोर्टलचे संपादक स्वप्नील सावरकर यांचा डिजिटल क्षेत्रातील दांडगा अनुभव असल्यामुळे हे पोर्टल अल्पावधीत यशस्वी झाले. म्हणून या पुरस्काराचे श्रेय संपादक स्वप्नील सावरकर यांना जाते. आपण जे काम करतो ते लोकांपर्यंत पोहचते, याची पोचपावती या पुरस्काराच्या माध्यमातून मिळाली, आम्हाला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे, असेही मंजिरी मराठे म्हणाल्या.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here