आजवर वर्तमान पत्र आणि वृत्तवाहिन्या यांनाच शासकीय मान्यता मिळत आहेे, त्याअनुषंगाने त्यांना विविध सवलती दिल्या जातात, मात्र सध्याच्या डिजिटल युगात अनेक डिजिटल माध्यमे सक्षमपणे कार्यरत आहेत. त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शासनाची मान्यता मिळाली तर त्यांची ताकद आणखी वाढेल, शासकीय जाहिराती मिळाल्याने त्यांचा विकास होईल. त्यामुळे अशा प्रकारे विविध डिजिटल माध्यमांचे आता संघटन होणे गरजेचे आहे, असा विचार ‘अर्थसंकेत डिजिटल इंडिया २०२२’ पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे माहिती आणि जनसंपर्क विभागाचे माजी संचालक देवेंद्र भुजबळ यांनी मांडले. त्यावर उपस्थित सर्वांचे एकमत झाले.
शुक्रवार, २९ एप्रिल २०२२ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या मादाम कामा सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी डीसीबी बँकेचे डिजिटल व टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख प्रसन्न लोहार, एमईपीएल समूहाचे सर्वेसर्वा सुधीर म्हात्रे, डिजिटल बिझनेस कोच जोतिराम सपकाळ, ‘अर्थसंकेत’चे संस्थापक डॉ. अमित बागवे व सह संस्थापक रचना बागवे आदी उपस्थित होते. मागील सहा वर्षांपासून ‘अर्थसंकेत’कडून उद्योन्मुख व्यावसायिकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे.
(हेही वाचा ‘अर्थसंकेत प्रस्तुत डिजिटल इंडिया २०२२’ पुरस्काराचे होणार वितरण)
उत्तर प्रदेश हे पहिले सरकार आहे, ज्यांनी डिजिटल माध्यमांना शासकीय जाहिराती देण्यास सुरुवात केली आहे. तसे महाराष्ट्रातही व्हावे याकरता सर्व डिजिटल माध्यमांचे संघटन होणे आवश्यक आहे, असे देवेंद्र भुजबळ म्हणाले. त्यावेळी ‘अर्थसंकेत’चे संस्थापक डॉ. अमित बागवे यांनी अशा प्रकारचा विचार याआधी आम्ही मांडला असून त्यादृष्टीने आता प्रयत्न सुरु करण्यात येतील, असेही डॉ. बागवे म्हणाले. मराठी जणांना अर्थविश्व आणि उद्योग क्षेत्रात काय नवीन घडामोडी घडतात याविषयी माहिती देण्यासाठी मराठी भाषेत एकही नियतकालिक नाही, त्यामुळे अर्थसंकेत नावाचे मासिक प्रसिद्ध करण्यात आले आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे रॊजगार, व्यवसाय संपत चालले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत टिकून राहण्यासाठी नवे तंत्रज्ञान स्वीकारण्याची गरज आहे, असे डॉ. बागवे म्हणाले. तुमच्याकडे कोणत्याही विषयाचे ज्ञान तुम्ही सोशल मीडियाच्या व्यासपीठावर प्रसारित केले तरी तुम्ही पैसे कमवू शकता, असे जोतिराम सपकाळ म्हणाले.
कोणाचा पुरस्काराने केला गौरव?
- बेस्ट ऑनलाईन न्यूज पोर्टल ‘हिंदुस्थान पोस्ट’ न्यूज पोर्टल – सल्लागार संपादिका मंजिरी मराठे
- बेस्ट डिजिटल न्यूज चॅनेल, ‘कोकण नाऊ’ चॅनल – सावंत
- बेस्ट ऑनलाईन इनिशिएटिव्ह इन आंत्रप्रेनरशिप, ‘ऑनलाईन स्वराज्य’ – केतन गावंड
- बेस्ट आंत्रप्रेनअर युट्युब चॅनल, ‘प्रोग्रेसिव्ह इंडिया वेब टीव्ही’ – मनीष दळवी
- बेस्ट डिजिटल शेअर मार्केट अकॅडेमी, ‘शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडेमी’ – शंभूराज खामकर
- बेस्ट बिझनेस कोच पुरस्कार – दिनेश सिंघल
- बेस्ट क्रिएटिव्ह मार्केटिंग एजेन्सी, मैत्र एंटरटेनमेंट – विनय शिंदे
- बेस्ट डिजिटल न्यूजपेपर, समृद्ध व्यापार – दत्तात्रय परळकर
(हेही वाचा बेस्ट ऑनलाइन न्यूज पोर्टल पुरस्काराने ‘हिंदुस्थान पोस्ट’चा सन्मान)
Join Our WhatsApp Community