स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इस्रायल

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला अर्थात खंडेनवमीला स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारकात इस्त्रायलचे कॉन्सुल जनरल (महावाणिज्य दूत) कोबी शोशानी यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. यानिमित्त स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी लिहिलेला लेख आपण पुनर्प्रसिद्ध करत आहोत.

185
सावरकर आणि इस्रायल
सावरकर आणि इस्रायल

स्वातंत्र्यवीर सावरकर हे अद्वितीय राजनीतिज्ञ होते. द्रष्टे होते. काळाच्या खूपच पुढचं पहाणारे होते. त्यांनी स्वतःच म्हटलं होतं की, माझे विचार तुम्हाला ५० वर्षांनी पटतील. पण आपलं दुर्दैव असं की त्यांचे विचार पटायला आपल्याला ५० वर्षही पुरलेली नाहीत. त्यांचा एक विचार पटायला तर ९४ वर्ष जावी लागली तो इस्रायलबाबतचा. 

रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना सावरकरांनी १९२३ मध्ये लिहिलेल्या ‘हिंदुत्व’ या ग्रंथात स्वतंत्र ज्यू राज्याच्या निर्मितीला पाठिंबा दिला होता. सावरकर लिहितात, ” ज्यू लोकांची सुखस्वप्ने खरी झाली नि पॅलेस्टाइन हे ज्यू लोकांचे राष्ट्र म्हणून निर्माण झाले तर आम्हाला प्रत्यक्ष ज्यू लोकांइतकाच आनंद होईल”. युरोपमधून हाकलण्यात येत असलेल्या ज्यूंसंबंधी सहानुभूती व्यक्त करून सावरकर १९३८ मध्ये काढलेल्या पत्रकात लिहितात, “त्यांना भारतात निवासासाठी न आणता पॅलेस्टाईनमध्ये त्यांनी वस्ती करावी. कारण तीच त्यांची पितृभू(वडिलोपार्जित भूमी) आणि पुण्यभू(धर्माचा उगम झाला ती भूमी) आहे.” ज्यावेळी इस्रायलची निर्मिती झाली तेव्हा बहुसंख्य ज्यूंनी इस्रायलमध्ये स्थायिक होणं पसंत केलं तर अमेरिकेत स्थायिक असलेल्या ज्यूंनी इस्रायलच्या उभारणीसाठी आर्थिक योगदान दिलं.

इस्रायलच्या निर्मितीनंतर १९ डिसेंबर १९४७ ला केलेल्या ‘ऐतिहासिक निवेदनात’ सावरकर लिहितात, “जगातील बहुसंख्य प्रमुख देशांनी, पॅलेस्टाईनमध्ये स्वतंत्र ज्यू राज्य स्थापण्याचा ज्यू लोकांचा अधिकार मान्य केला आणि त्यासाठी शस्त्रास्त्र साहाय्यही देण्याचं वचन दिलं ही वार्ता वाचून मला आनंद झाला. ह्या प्रश्नी आपली भारतीय वृत्तपत्रं त्यांच्या मुस्लिमधार्जिण्या धोरणाला धरून चुकीची माहिती देत आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की, मुसलमानी धर्माच्या स्थापनेपूर्वी निदान 2000 वर्ष अब्राहम, मोझेस, डेव्हीड, सालोमन यांच्यासारखे अनेक राजे नि ऋषी यांनी त्या देशाला पितृभू नि पुण्यभू मानलं. अरबी मुसलमानांनी सिंधवर आक्रमण करण्यापूर्वी, प्राचीन इजिप्त आणि पर्शियावर स्वारी करून तिथली संस्कृती रानटी प्रवृत्तीनं नष्ट केली. त्याचप्रमाणे त्यांनी ज्यूंनाही मुळासकट नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण ही त्यांची राक्षसी महत्वाकांक्षा पूर्ण झाली नाही. अरबी मुसलमानांची पितृभूमी नि पुण्यभूमी आहे अरबस्तान, पॅलेस्टाईन नव्हे!! हा इतिहास आमच्या वृत्तपत्रांनी नि नेत्यांनी समजून घ्यावा.

ह्या प्रश्नी, संयुक्त राष्ट्रसंघातील भारतीय राज्यप्रतिनिधींनी ज्यू राज्य निर्मितीला केलेला विरोध दुःखदायक आहे. या संबंधीच्या भाषणात श्रीमती विजयालक्ष्मी म्हणाल्या, “स्वतंत्र ज्यू राज्य निर्माण करण्यास पाठिंबा देऊन आम्ही पॅलेस्टाईनच्या पाठीत सुरा खुपसण्याचं पाप करणार नाही.” हे त्यांचं वाक्य अनेक राष्ट्रांच्या प्रतिनिधींना नाटकी वाटून त्यांनी त्यांची टर उडवली. कारण, याच भारतानं स्वतःच्या अनेक वर्ष एक असलेल्या देशाच्या फाळणीला मान्यता देऊन तो फाळणीचा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा केला होता. यासंबंधी बोलताना नेहरूंनी जेव्हा सांगितलं की, आशियातील छोट्या इस्लामी देशांची सहानुभूती मिळवण्यासाठी आपण ज्यू राज्याला विरोध केला तेव्हा तर त्यांची बाजू अधिकच असमर्थनीय ठरली. कारण, यावेळी त्यांनी भारतातील आणि जगातील ज्यूंना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या बलवान देशांना काय वाटेल याचा विचार केला नाही. छोट्या, दुर्बल देशांची सहानुभूती मिळवण्यासाठी मोठ्या सबल देशांची सहानुभूती गमावण्याचं हे धोरण अयोग्य आहे, हास्यास्पद आहे. यावेळी त्यांनी हेही लक्षात ठेवायला हवं की, ही छोटी इस्लामी राज्य आणि चीनमध्येही इस्लामी राज्य निर्माण करण्याची मागणी करणारे हे सर्व इस्लामी गट भारतात इस्लामी राज्य स्थापन करणाऱ्या पापस्तानी गटालाच पाठिंबा देत आहेत. अशा परिस्थितीत भारतानं आफ्रिकेपासून मलेशियापर्यंत एक मुस्लीम आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इस्लामी गटाची शक्ती खच्ची करण्याचंच आंतरराष्ट्रीय धोरण अवलंबलं पाहिजे. ह्या आक्रमक इस्लामी शक्तीचा प्रतिकार करण्याचं कार्य समर्थ आणि स्वतंत्र ज्यू राज्य करू शकेल. ज्यू लोकांच्या मनात हिंदुजगतासंबंधी द्वेष नाही. भारतातील अल्पसंख्य ज्यूंविषयी संशय बाळगण्याचं कोणतंही कारण दिसत नाही. आजच्या काँग्रेसी नेत्यांचं धोरण कसंही असलं तरी भारतातील हिंदुसंघटनावादी पक्षानं, नैतिक आणि राजकीय धोरण म्हणूनही स्वतंत्र ज्यू राज्याला आपला संपूर्ण पाठिंबा देऊन त्याविषयी सदिच्छाही व्यक्त केली पाहिजे.”

१९५६ मध्ये जोधपूर इथल्या हिंदुमहासभेच्या अधिवेशनात सावरकरांनी इस्रायलबाबत अतिशय महत्वाचा विचार मांडला. “भारतानं इस्रायल सोडून जगातील बहुतेक राष्ट्रांना मान्यता दिली आहे. इस्रायलला मान्यता दिली तर ते कृत्य मुस्लिमविरोधी मानलं जाईल, ही भारताला भीती आहे. पण उद्या जर भारत पाकिस्तान यांच्यात युद्ध पेटलं, तर बहुतेक मुसलमान राष्ट्र आपल्याविरुद्ध पाकिस्तानच्या पाठीशी उभी राहतील आणि त्यांचा शत्रू असलेला इस्रायल आपला एकटा मित्र उरेल. त्यामुळे भारतानं इस्रायलला नि:संदिग्ध मान्यता द्यावी”. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र याच सावरकरांच्या विचारांनी आज इस्रायलशी आपले मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे.

#सावरकरी
सौजन्य : www.tarunbharat.org

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.