– सचिन धानजी
शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडले. मशाल चिन्ह असलेल्या उबाठा शिवसेनेचा दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात शिवतीर्थावर, तर धनुष्यबाण चिन्ह असलेल्या शिवसेनेचा दुसरा दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील आझाद मैदानात. खरं तर या. मेळाव्यात कुणाच्या सभेत अधिक गर्दी असेल याचीच चर्चा अधिक होती, कुणाचं भाषण ऐकाल असाच प्रश्न जो तो एकमेकाला करत होता, परंतु गर्दी ही सभा यशस्वी करू शकते, पण पक्षाला नाही. नाहीतर राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाने कधीच या राज्यावर राज्य केलं असतं. सभेत गर्दीचा उच्चांक मोडण्याची ताकद राज ठाकरे यांच्याकडे आहे. पण ही गर्दी मतांत परावर्तीत होतेय का? तर नाही! या सभेत उपस्थित राहणाऱ्या शिवसैनिकांच्या प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी प्रतिक्रिया जाणून घेत होत्या. त्यात शिवाजी पार्क मधील मेळाव्यातील महिला शिवसैनिक आम्ही चाळीस वर्षांपासून येत आहोत, आम्हाला कुणी इथं आणलं नाही, आम्ही भाडोत्री नाहीत असं सांगण्याचा प्रयत्न करत होत्या, तर आझाद मैदानातील मेळाव्यात सहभागी झालेल्या महिला शिवसैनिक या मुख्यमंत्री म्हणून शिंदे चांगले काम करत आहे, आमच्या घरांचा प्रश्न ते सोडवणार आहेत म्हणून आम्ही आल्याचे ते सांगत होते. दोन ठिकाणच्या दोन शिवसैनिकांमधील या वेगळ्या प्रतिक्रिया ऐकून एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण चिन्ह मिळालं असलं तरी हाडामासांचा शिवसैनिक मात्र या शिवसेनेत नसल्याचं चित्र दिसत आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पालन न करता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला हा पक्ष बांधल्याने अस्वस्थ झालेले नेते शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडले. ४० आमदार, १२ खासदार, माजी नगरसेवक आणि पदाधिकारी सुरुवातीला बाहेर पडल्यानंतर खरी शिवसेना म्हणून धनुष्यबाणाचे चिन्हही त्यांना दिले. त्यानंतर आता टप्प्या टप्प्याने शिवसेना नेते, उपनेते, माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, युवा सेनेचे पदाधिकारी हे शिवसेनेत येत आहेत. पण उबाठा शिवसेना सोडून येणाऱ्या या नेत्यांसोबत जनाधार कुठे आहे? जे शिवसेनेत एकटे प्रवेश करतात. ना त्यांच्यासोबत शाखाप्रमुख, ना महिला शाखा संघटक, गटप्रमुख ना शिवसैनिक. मग या एकेकट्या लोकांमुळे पक्ष मजबूत होणार आहे का?
आज अधिकृत शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळून वर्ष उजाडत आलं. नाही म्हटलं तरी राज्यातील ४० आमदार, १२ खासदार, मुंबईतील ३७ माजी नगरसेवक हे पक्षात आहेत. पक्षाने नेतेमंडळीही नियुक्त केले, विभागप्रमुख पासून शाखाप्रमुखांच्या नियुक्ती झाल्या. पण पक्षाचा मूळ कणा असलेला गटप्रमुख आणि शिवसैनिक कुठे आहे? जर शिवसैनिकच पक्षासोबत नसेल तर पक्ष वाढणार कसा? सत्तेत असलात म्हणून पक्ष वाढवता येतो हे केवळ तोंडाला चव यावी म्हणून जेवणासोबत लोणचं घेण्यासारखा प्रकार आहे. पण ज्याप्रकारे लोणचं खाऊन पोट भरता येत नाही त्याप्रमाणे सत्तेचा वापर करून पक्ष काढता येतो, पण तो टिकवता येत नाही हेही तेवढंच सत्य आहे. आज शिवसेनेची मुंबई असो वा ठाणे किंवा राज्यातील अन्य शहरांमधील संघटनात्मक बांधणीकडे दुर्लक्ष होत आहे, हे सत्य नाकारुन चालणार नाही.
शिवसेनेत एक शिस्त आहे. त्यांच्या पक्षाची बांधणी ही विभागप्रमुख, उपविभागप्रमुख,शाखाप्रमुख, महिला शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख अशा प्रकारे पदाधिकारी नेमून केलेली आहे. पण पुढे आता या दरम्यान त्यांनी अनेक पदे वाढवली आहे, ज्यात विभाग संघटक, विभाग समन्वयक, उपविभाग समन्वय, शाखा समन्वय, कार्यालयप्रमुख अशा पदांचा समावेश केला. त्यांच्या जोडीला युवा सेनेचीही टिम कामाला लावून शिवसेना पदाधिकाऱ्यांप्रमाणेच समांतर युवा सेनेची पदे निर्माण केली. या प्रत्येकाच्या नेमणुकांच्या शिफारशी करण्याचे अधिकार हे बहाल केले असून महत्त्वाची शाखा स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकांची शिफारस ही विभागप्रमुख स्तरावर आणि शाखाप्रमुख स्तरावर केली जाते. उदाहरणार्थ शाखाप्रमुखांची नेमणूक ही विभागप्रमुखांच्या पातळीवर तर गटप्रमुखांची नेमणूक ही शाखाप्रमुखांच्या पातळीवर अशाप्रकारे केली जाते ही आतापर्यंतची परंपरा आहे. पण ही परंपरा या शिवसेनेत सध्या दिसून येत नाही.
आज शिवसेनेत मुंबईतील नेमणूकाही ठाण्यातून होत आहेत. एखाद्या पदाधिकारी, माजी नगरसेवकाचा प्रवेश पक्षात होत असताना त्या विभागाच्या प्रमुखालाही त्याची कानोकान खबर नसते. जर अशाप्रकारे पक्षातील पदाधिकाऱ्यांनाच विश्वासात न घेता पक्ष काम करू लागला तर उबाठा शिवसेनेत आणि तुमच्यात फरक काय? किमान उबाठा शिवसेनेत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे विभागप्रमुखाला विचारात तरी घेतात. पक्षाच्या संघटनांत्मक बांधणीमध्ये आमदार, खासदार आणि नगरसेवकांचा योगदान नसून पक्षाचे नेते, सचिव, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख यांच्यासह गटप्रमुखांचे मोठे योगदान असते. पण खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा जेव्हा केला जातो, तेव्हा पक्ष अधिक मजबूतीने बांधण्याचा कधी विचारच होत नाही. आज उबाठा शिवसेना सोडून जे पदाधिकारी येत आहेत ते सत्तेच्या मोहाला आकर्षित होऊन येत आहे. मुळात त्यांना उबाठा शिवसेनेत असताना आपलं वलय निर्माण करता आलं नाही. त्यामुळे केवळ धनुष्यबाण चिन्हावर ते निवडून आले होते. पण आज हेच धनुष्यबाण चिन्ह आणि सत्ता असल्याने ज्यांना त्या पक्षात असुरक्षितता वाटते ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. जे पक्षात प्रवेश करत आहेत, त्या माजी नगरसेवकांची प्रतिक्रियाही बोलकी आहे. ते म्हणतात, निवडणूक होत नाही, त्यामुळे लोकांची कामे होत नाही. त्यामुळे जनतेची कामे करण्यासाठी सरकारकडून निधी मिळाला तर आम्ही काम करू शकतो, याचसाठी या पक्षात आलोय असं ते सांगतात. म्हणजे ही मंडळी केवळ निधीसाठी शिवसेनेत आले. पण शिवसेनेत आल्यानंतर किमान आपल्या मतदारसंघाची बांधणी शिवसैनिकांना सोबत घेऊन केली तरी पक्षाची बांधणी होऊ शकते. येणाऱ्या प्रत्येकाने पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी शाखाप्रमुखाशी समन्वय राखून काम केले पाहिजे. पण ते काम काही होताना दिसत नाही. कारण उबाठा शिवसेना सोडून या शिवसेनेत आलेले पदाधिकारी हे आपल्यासोबत कोणालाच घेऊन आले नाही किंबहुना कुणी आले नाही. मग जर तुम्ही हाडामांसाचे शिवसैनिक आसतात तर हे आव्हान स्वीकारुन आपल्या प्रभागापासून पक्षाची बांधणी करायला सुरुवात करायला काय हरकत आहे.
(हेही वाचा – Spy Ship Research Mission: चिनी हेरगिरी जहाज श्रीलंकेत दोन दिवस संशोधन करणार, भारताचा आक्षेप)
या पक्षात गेल्यानंतर विकास निधी मिळेल, कोणतेही काम केल्यास पक्षाकडून निधी मिळेल याच विचाराने जर ही मंडळी या शिवसेनेत आली असतील तर येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेत जेवढे लोकप्रतिनिधी आहेत, तो आकडाही त्यांना राखता येईल किंवा नाही याबाबत साशंकता आहे. बंडाचे निशाण उगारुन जेव्हा तुम्ही मूळ शिवसेनेवर दावा करण्याचे शिवधनुष्य हाती घेतलं, तेव्हा उबाठा शिवसेनेला टक्कर देण्याची ताकद निर्माण करणं हेही तुमचं तेवढंच काम आहे, नव्हेतर तर ती जबाबदारी आहे. कारण उबाठा शिवसेनेतून नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी बाहेर पडत असले तरी त्यांची संघटनात्मक बांधणी विस्कटली गेली नाही. ती पुन्हा तेवढीच मजबूत उभी आहे आणि कामही करत आहे. जणू काही घडलंच नाही या अविर्भावात उबाठा शिवसेना काम करत आहे. त्यामुळे त्यांना टक्कर द्यायची असेल तेवढ्याच सक्षमतेने पक्ष बांधणी करत आव्हान उभं करायला हवं, पण तसं होताना दिसत नाही.
आज शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांसाठी लाल कारपेट अंथरलं जातं. पक्षात प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकांची विकासकामे प्राधान्याने केली जातात, त्यांच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद केली जाते, मग तो महापालिकेचा असो वा डिपीडीसीचा असो. पण केवळ तिकीट मिळेल याच स्वार्थ भावनेने प्रवेश करणाऱ्यांचे हात ज्याप्रकारे पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा पक्षाला संघटनात्मक मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांचे हात आर्थिक मजबूत करण्याचे काम का केले जात नाही. एका बाजुला बाहेर येणाऱ्या नगरसेवकाला निधी मिळतो, पण त्याच शाखेतील शाखाप्रमुखाने विनामोबदला काम करायचे. त्यामुळे एकप्रकारे दुहीची बिजे या पक्षात आतापासून पेरली जावू लागली आहेत. त्यामुळे ज्या नगरसेवकाचा प्रवेश होईल त्या नगरसेवकाने शाखाप्रमुखाशी समन्वय राखून विभागातील कार्यक्रम व उपक्रम राबवायला हवे आणि जिथे नगरसेवक नाही तिथे शाखाप्रमुखाला आर्थिक मदत उपलब्ध करून दिली तरच ते विभागात काम करू शकतात. मुळात आज शाखा सुरु करणे आणि विभागातील मंडळांना हात वर करून मदत करण्या इतपत जर तो आर्थिक सक्षम नसेल तर पक्षाला तो तरी कसा मजबूत करेल आणि काय म्हणून आपल्या पक्षाकडे मतदारांचा कल ओढून घेईल.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि नेते छगन भुजबळ यांची एका दूरचित्रवाणीवर मेगा मुलाखत पाहिली होती आणि त्यात त्यांनी असं म्हटलं होतं, नेते जरी पक्ष सोडून गेले तरी कार्यकर्ते पक्षासोबतच राहतात. पक्ष सोडला तरी शिवसैनिक काही हलले नाहीत, हे त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर माझगावमधील शिवसैनिकांचा अनुभव सांगितला. याची आठवण एवढ्याच करता सांगतो, की नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी गेले तरी शिवसैनिक हा तिथेच राहतो. ज्या दिवशी गटप्रमुख आणि शिवसैनिक हा शिवसेनेत येईल तेव्हाच खऱ्या अर्थाने हाच खरा मूळ शिवसेना पक्ष असल्याचा दावा पक्का होईल. पक्षाचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे हे आज मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सत्तेचा वापर करून जर पक्ष मजबूत करता येत असेल तर नक्की करावा, त्यासाठी पक्षातील संघटनात्मक बांधणीचे अधिकार हे पक्षाच्या घटनेप्रमाणे विभागप्रमुख आणि शाखाप्रमुखांना विचारात घेऊनच केले तरच ही शिवसेना मोठी नाही. नाही तर शिवसेनेचा वेलू गगनावरी पोहोचण्यापूर्वी कधी कोसळून पडेल हेही कळणार नाही. कारण ज्या उबाठा शिवसेनेतील माजी नगरसेवकांना प्रवेश दिला जात आहे, त्यामागे आगामी महापालिका निवडणुकीत आपल्याला जास्त जागा मिळाव्यात म्हणून हा प्रयत्न आहे. पण असे माजी नगरसेवक फोडून त्या जागेवर दावेदारी करताना तिथे आपल्या पक्षाची ताकद तरी आहे का हेही तेवढंच जाणून घ्यायची गरज आहे. त्यामुळे जर आज अशा नगरसेवकांना पक्षात घेऊन काम केले जात असेल तर त्या-त्या विभागामध्ये भाजप आण शिवसेनेने हातात हात घालून काम करायला हवं. ज्या दिवशी हे चित्र प्रभागाप्रभागांमध्ये दिसेल त्याच दिवशी शिवसेना पक्षाला भाजपने स्वीकारलं हे स्पष्ट होईल, अन्यथा शिवसेना पक्षाचे उमेदवार कुठल्या कोपऱ्यात फेकले जातील हेही कळणार नाही. त्यामुळे भाजपवर विसंबून न राहता आपला पक्ष संघटनात्मक मजबूत करण्याची काळाची गरज आहे आणि ज्या दिवशी आपल्या सभेला स्वत:हून शिवसैनिक येतील तेव्हाच ही खरी आणि मूळ शिवसेना आहे, असे आम्ही मानू.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community