ललित पाटीलला ‘पी.एस.’कडून रसद?

चकमक फेम अधिका-याशी कनेक्शन; ससून रुग्णालयात करून दिली राजेशाही पाहुणचाराची सोय

174
ललित पाटीलला 'पी.एस.'कडून रसद?
ललित पाटीलला 'पी.एस.'कडून रसद?
  • सुहास शेलार 

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात दररोज नवनवे तपशील समोर येत असले, तरी १६ महिने ससून रुग्णालयात त्याचा राजेशाही पाहुणचार कुणी केला, हे गुपित अद्याप उघड झालेले नाही. यासंदर्भात ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या हाती एक्स्क्लूझिव्ह माहिती लागली असून, एका चकमक फेम माजी पोलीस अधिकाऱ्याचे नाव समोर आले आहे. ‘पी.एस.’ या टोपण नावाने तो पोलीस दलात ओळखला जातो. त्याने ससून रुग्णालयात ललित पाटीलच्या राजेशाही पाहुणचाराची सोय लावून दिल्याचे कळते.

ऑक्टोबर २०२० मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ललित पाटीलला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून तो तुरुंगात होता. जून महिन्यात त्याला टीबी आणि हर्नियाच्या उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तो पुन्हा तुरुंगात गेलाच नाही. तब्बल १६ महिने त्याने ससून रुग्णालयात राजेशाही पाहुणचार घेतला. त्यासाठी त्याला या ‘पी.एस.’ने मदत केली. ससून रुग्णालयातील डॉक्टर, पोलीस, सुरक्षा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठाली बक्षिसे देऊन ‘पी.एस.’ने सर्व यंत्रणा मॅनेज केल्या. त्या बदल्यात पाटीलने ‘पी.एस.’ला मोठी रक्कम दिली, अशी माहिती पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

मुंबईतील नामांकित उद्योगपतीशी संबंधित एका प्रकरणात या चकमक फेम माजी पोलीस अधिकाऱ्याला (पी.एस.) अटक झाली होती. सुरुवातीला त्याची रवानगी मुंबईतील आर्थर रोड कारागृहात करण्यात आली. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्याला पुण्यातील येरवडा कारागृहात पाठवण्यात आले. कारागृहात असताना पोटदुखीचा त्रास उद्भवल्याने त्याला उपचारांकरिता ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून ‘पी.एस.’ चार महिन्यांहून अधिक काळ ससून रुग्णालयात राहिला. चकमक फेम अधिकारी म्हणून देशभरात नाव असल्याने सुरक्षा रक्षक त्याला दचकून असायचे. याच भितीपोटी त्याची रुग्णालयात बडदास्त ठेवली जायची.

(हेही वाचा – High Alert in Mumbai : मुंबईत हायअलर्ट; केरळमधील बॉम्बस्फोटांनंतर का वाढवली छाबड हाउसची सुरक्षा ?)

अटकेत असलेल्या ‘पी.एस.’चा रुग्णालयातील तामझाम पाहून ललित पाटील प्रभावित झाला आणि त्याने त्याच्याशी सलगी करण्यास सुरुवात केली. पाटीलकडे बक्कळ पैसा असल्याचे ध्यानात येताच ‘पी.एस.’नेही त्याला जवळ केले. शिवाय पैशाच्या मोबदल्यात ससून रुग्णालयात राजेशाही पाहुणचाराची सोय करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार, सुरुवातीला या प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना मॅनेज करण्यात आले, त्यानंतर ससूनमधील डॉक्टर, कर्मचारी आणि सुरक्षा यंत्रणांनाही लक्ष्मीदर्शन घडविण्यात आले. ‘पी.एस.’चा रुग्णालयातील मुक्काम संपल्यानंतरही ललित पाटीलची बडदास्त ठेवली जायची. त्यामुळे पाटील बिनदिक्कतपणे येथून आपला ड्रग्जचा व्यवसाय चालवत होता.

‘पी.एस.’चे राजकीय कनेक्शन
– महाराष्ट्र पोलीस दलात चकमक फेम अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ‘पी.एस.’ने स्वेच्छानिवृत्ती घेऊन एका राजकीय पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. तो पराभूत झाला असला, तरी या पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी त्याचे घनिष्ठ संबंध होते. त्यामुळेच तुरुंगातही त्याची विशेष काळजी घेतली जायची.
– महत्त्वाचे म्हणजे ललित पाटीलही काही काळ या पक्षाशी संबंधित होता. ‘पी.एस.’ने पाटीलला ससून रुग्णालयात राजेशाही पाहुणचाराची सोय लावून दिली तेव्हा याच राजकीय पक्षाची राज्यात सत्ता होती.
– येत्या काळात ललित पाटील प्रकरणात अनेकांचे बुरखे फाटतील, असे विधान अलीकडेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यामुळे ‘पी.एस.’ कनेक्शन उघड होऊन तत्कालीन सरकारमधील काही नेत्यांची नावे ड्रग्ज प्रकरणाशी जोडली जातात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

कोण आहे ललित पाटील?
– ललित पाटील हा मूळचा नाशिकचा आहे. आई-वडील, भाऊ, पत्नी आणि दोन मुले, असा त्याचा परिवार आहे. ललित पाटीलची पहिली पत्नी त्याला सोडून गेली. त्यानंतर त्याने दुसरे लग्न केले. अपघातात दुसऱ्या पत्नीचेही निधन झाले. ललित पाटीलचा एक मुलगा आठवीत, तर मुलगी नववीत शिकते. ललित हा सुरुवातीला वाईन कंपनीत काम करायचा. त्यानंतर तीन ते चार वर्षे त्याने बोकड विक्रीचा व्यवसाय केला.
– पुढे छोटा राजनच्या गँगशी संबंधित गुंडांशी त्याची ओळख झाली. त्यांच्या एक गुप्त ट्रेनिंग कँपमध्ये तो सहभागी झाला. त्यात ड्रग्ज कसे ओळखायचे, त्याची तस्करी कशी करायची, याचे प्रशिक्षण त्याला देण्यात आले. २०२० मध्ये समीर वानखेडेंनी पालघरमध्ये ड्रग्ज रॅकेटवर छापा मारला होता. त्यावेळी छोटा राजनचे साथीदार अरविंद लोहारे आणि राकेश खानिवडेकर यांना अटक करण्यात आली होती. त्यांना जामीन मिळावा म्हणून ललित पाटीलने मदत केली होती. त्यानंतर ललित हा ड्रग्ज माफिया म्हणून उदयास आला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.