गडबडलेले ‘गांधी’

260

काँग्रेसचे ज्येष्ठ गुफरान आझम यांनी 2011 मध्ये एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत प्रचंड व्हायरल झाली होती. या मुलाखतीत काँग्रेस पक्षाचे भवितव्य काय असेल या चिंतेने व्याकुळ झालेले गुफरान आझम “आप राहुल को जो मर्जी बना दो, लेकिन राजनेता मत बनाओ” असे मिडीयाच्या माध्यमातून सोनिया गांधींना उद्देशून आवाहन करताना दिसले होते. भाजप आयटी सेल, राहुल गांधींना पप्पू ठरवत असल्याचे गुफरान यांना खूप जिव्हारी लागल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होते. गुफरान आझम 2015 मध्ये पैगंबरवासी झाले आणि ती जुनी मुलाखत हळूहळू सोशल मिडीयातून दिसेनाशी होऊ लागली. परंतु, राहुल आणि त्यांची चर्चा राजकारण आणि सोशल मिडीया दोन्ही ठिकाणी कायम आहे. अशातच गेल्या 25 मार्चपासून राहुल यांना सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेने (शिंदे गट) फैलावर घेतले आहे. गुजरातमधील सूरतच्या महानगर दंडाधिकारी कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर राहुल गांधींनी “माफी मागण्यासाठी मी सावरकर नव्हे गांधी आहो” असे म्हणत अनाठाई वाद ओढावून घेतला. राहुल गांधींनी यापूर्वी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अनेकदा अपमान केला आहे. परंतु, असे करणारे ते एकटे नाहीत. डावे, पुरोगामी आणि काँग्रेसचे नेते आळीपाळीने आणि वेळोवेळी सावरकरांचा अपमान करीत असतात. किंबहुना स्वतःचे पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी तथाकथित विचारवंत आणि सेक्युलर लोकांसाठी सावरकर हे सॉफ्ट टार्गेट बनले आहे असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.

एखाद्या माणसाचे नशीबच मोठे विलक्षण असते. त्याचे कर्तृत्त्व आणि विचार याची स्तुती होण्याऐवजी त्याच्या वाट्याला केवळ अवहेलना आणि अपमानच येतो. जिवंतपणी इतरांसाठी सोसलेले कष्ट, याचना याची दखल कुणी घेतच नाही. जगाचा निरोप घेतल्यानंतरही त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त होण्याऐवजी अपप्रचार केला जातो. ज्यांच्यासाठी या यातना सोसल्या तेच बेताल वागावेत, यासारखे दुसरे दुर्दैव नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीतही नेमके हेच घडले आणि घडते आहे. तात्यारावांनी ज्या देशासाठी स्वत:ला तेलाच्या घाण्याला जुंपून घेतले, त्याच देशातील नागरिकांमध्ये घृणित राजकारणातून अपसमज पसरवले जात आहेत. नवीन पिढीच्या बदललेल्या अभिरूचीमुळे वाचनाची गोडी राहिलेली नाही. त्यामुळे वर्तमानपत्रातील विश्लेषणातून येणारे काही चुकीचे संदर्भ, सोशल मीडियामधील वावड्या आणि वृत्त वाहिन्यांवरील दिशाहीन चर्चा यातून खरे सावरकर कोणते, त्यांचे नेमके कार्य आणि गांधी हत्येतील त्यांचा सहभाग यासंदर्भात नवीन पिढीमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. किंबहुना घृणित स्वार्थ आणि राजकारणातून बुद्धीपुरस्सरपणे हे पसरवले जात आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रखर देशभक्त, महान क्रांतिकारक, प्रतिभावंत महाकवी, तत्त्वज्ञ विचारवंत, विज्ञाननिष्ठ हिंदुत्त्ववादी, प्रेरक इतिहासकार, कर्ते समाजसुधारक आणि द्रष्टे राजकारणी होते. अष्टपैलू या शब्दाची निर्मिती सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला दृष्टिक्षेपात ठेवूनच झाली असावी, असे वाटण्याइतपत त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य उत्तुंग होते. त्यांच्या कार्याचा आलेख शब्दबद्ध करण्यासाठी शब्द तोकडे पडावे, इतकी विशाल उंची त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने गाठली होती. सूर्याने तेज, अग्निची धग, क्रांतीची प्रेरणा आणि प्रत्यक्ष बृहस्पतीने शिष्यत्त्व पत्करावे इतकी अफाट बुद्धिमत्ता एकाच व्यक्तीत असणे हे कुठल्याही चमत्काराहून कमी नाही. आपल्या इंग्लंडच्या वास्तव्यात त्यांनी केलेले क्रांतिकार्य, मार्सेलिसची जगप्रसिद्ध उडी, त्यांच्या कुटुंबाची झालेली वाताहत आणि या पार्श्वभूमीवर त्यांना झालेली 50 वर्षांची जन्मठेप ही नियतीच्या आसुडाची परिसीमाच म्हणावी लागेल. अशात त्यांची रवानगी अंदमानच्या नरकात झाली. दुसरा एखादा माणूस जगण्याची उर्मीच हरवून बसला असता. पण, तात्याराव सावरकर जगले, नुसतेच जगले नाही तर त्यांनी संघर्ष केला जुलमी इंग्रजांशी, त्यांच्या पुढ्यात आलेल्या परिस्थितीशी आणि नियतीशीदेखील. सावरकरांनी अंदमान वास्तव्यात झालेले शारीरिक व मानसिक अत्याचार सहन करून ‘कमला’ सारख्या महाकाव्याचे केलेले सृजन मानवी मनाच्या कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे. इंग्रजांसारख्या परकीय शासकांप्रमाणे किंबहुना त्यापेक्षा जास्त अवहेलना झालेले स्वतंत्र भारतातील ते एकमेव क्रांतिकारक असावेत. सावरकरांवर झालेल्या इंग्रजी अत्याचाराहून अधिक संतापजनक व्यवहार स्वतंत्र भारतातील राजकारण्यांनी त्यांच्याशी केला. सावरकरांवर होणाऱ्या आरोपांमध्ये तीन प्रमुख आरोप आहेत. 1) सावरकरांनी इंग्रजांची माफी मागून स्वत:ची सुटका करवून घेतली. 2) इंग्रजांच्या कैदेतून सुटका झाल्यानंतर त्यांनी कोणतेही देशकार्य केले नाही आणि तिसरा आक्षेप म्हणजे सावरकरांच्या प्रेरणेतूनच महात्मा गांधींची हत्या करण्यात आली. सावरकरांच्याबाबत वारंवार होणाऱ्या या अपप्रचारामुळे भूतकाळाचे संदर्भ माहीत नसलेली नवी पिढी आणि राहुल गांधींसारखे नेते संभ्रमीत होत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. सावरकरांवर कसलेही आरोप होत असले तरी, वस्तुस्थिती अतिशय भिन्न असल्याचे इतिहासाची पाने ओरडून सांगतात. फक्त ते वाचण्याची, ऐकण्याची आणि समजून घेण्याची मानसिकता असणे आवश्यक आहे.

सावरकरांच्या अंदमानातील वास्तव्यामुळे तेथील कैदी एक दिवस उठाव करतील या कल्पनेने इंग्रज सरकार पुरते हादरले होते. पण, ब्रिटिशांना कधीच सावरकरांना ताब्यात घेता आले नाही. कारण, ताबा शरीराचा नसून मनाचा घेतला जातो आणि सावरकरांच्या मनाला आपल्या प्रभावाखाली घेणे इंग्रजांना कधीच शक्य झाले नाही. दुसरीकडे सावरकरांचे सेल्यूलर जेलमध्ये विविध उपक्रम सुरूच होते. केवळ देशात गुप्तपणे पिस्तुले पाठवली या गुन्ह्यासाठी सावरकरांना 50 वर्षांची शिक्षा ठोठावणे योग्य नसल्याचा मुद्दा कोर हार्डी नावाच्या सदस्याने ब्रिटीश पार्लमेंटमध्ये उचलून धरला होता. तर अंदमानच्या कारागृहात कैद्यांमध्ये सावरकरांनी राष्ट्रप्रेमाचे बीजांकुर रोवले. त्यामुळे धास्तावलेल्या ब्रिटिशांनीच त्यांच्यापुढे सशर्त मुक्ततेचा प्रस्ताव ठेवला. राजकारणाच्या डावपेचात पारंगत असलेल्या सावरकरांसाठी आयतीच संधी चालून आली. बाहेर राहून देशासाठी जे करता येणार होते ते सावरकरांना तुरुंगात राहून कधीच शक्य झाले नसते. त्यामुळे अफगाणिस्थानातल्या पठाणांच्या विरोधात इंग्रजांना मदत करू, असे आश्वासन देत त्यांनी अंदमानमधून सुटका करून घेतली. साधारणपणे मे 1921 मध्ये बाबाराव व तात्याराव दोन्ही सावरकर बंधूंना मुंबईच्या तुरुंगात हलवण्यात आले. तेथून त्यांची रवानगी रत्नागिरीच्या कारागृहात करण्यात आली. सावरकर अंदमानातून सुटले पण तुरुंगातून सुटले नव्हते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यानंतर 6 जानेवारी 1924 साली त्यांना 5 वर्षांच्या स्थानबद्धतेच्या अटीवर तुरुंगातून मुक्त करण्यात आले. पण, त्यांच्या स्थानबद्धतेला १३ वर्षे उलटल्यावरही त्यांना मुक्त केले जात नव्हते. जमनादास मेहता यांना सरकारमध्ये मंत्रिपद चालून आले. त्यावेळी सावरकरांना मुक्त केले तरच आपण मंत्रिपद स्वीकारू असे जमनादास मेहता यांनी सरकारला कळवले. जनते पाठोपाठ जमनादासांच्या दडपणानंतर इंग्रज सरकारने 10 मे 1937 रोजी सावरकरांना मुक्त केले. अंदमानमधून सावरकर 1921 साली परतले असले तरी मुक्तीसाठी 1937 सालापर्यंत त्यांना वाट पाहावी लागली हे विसरून चालणार नाही.

सावरकर आणि इंग्रज यांच्यातील करारामध्ये गनिमी कावा होता. अशाच गनिमी काव्याचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनीही आपल्या राजकारणात पुरेपुर केल्याचे दिसून येते. आदिलशहाने बाजी घोरपडेची मदत घेऊन दगाबाजीने शहाजी राजांना अटक केली होती. त्यावेळी शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात आलेल्या शहाजहानचा मुलगा शहजादा मुराद याला पत्र धाडून विनवणी केली होती की, ‘मी आणि माझे वडील शहाजी राजे आपल्या दरबारात हजर होऊन आपल्याला कुर्निसात करायला तयार आहोत’’ शहाजहान शाहाजी राजांना ओळखून होता. कारण हा शाहाजाहन ज्यावेळी महाराष्ट्रावर 80 हजारांची फौज घेऊन आला होता, तेव्हा याच शहाजी राजांनी त्याला पराभूत केले होते. त्यामुळे शिवाजीचे पत्र मिळताच लगेचच शहजादा मुरादच्या हातून आदिलशाला पत्र गेले आणि त्याला शहाजी राजाला सोडावे लागले. ‘युद्ध आणि प्रेमात सारे काहीही क्षम्य असते’ अशी म्हण आहे. त्यानुसार विचारांचे युद्ध असलेल्या राजकीय संघर्षातही असे डावपेच खेळावेच लागतात. मुरादला पत्र पाठवून वडिलांची सुटका केली म्हणून शिवाजी काही मोगलांचे हस्तक ठरत नाहीत. हाच न्याय स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही लागू पडतो.

सावरकरांची इंग्रजांनी स्थानबद्धतेतून मुक्तता केल्यानंतर सावरकरांनी कुठलेही राष्ट्रीय कार्य केले नसल्याचा आरोप त्यांच्यावर होतो. परंतु, हा आक्षेप अर्थहिन असल्याचे इतिहास सांगतो. स्वातंत्र्यपूर्व काळात 19 जून 1940 रोजी नागपुरात फॉर्वर्ड ब्लॉक पक्षाचे राष्टीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनासाठी सुभाषचंद्र बोसही नागपुरात होते. त्यावेळी 20 जून रोजी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना भेटण्यासाठी गेले होते. परंतु, त्यावेळी डॉक्टर हेडगेवार मृत्यूशय्येवर असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नव्हती. तेव्हा सुभाषबाबूंना सावरकरांची भेट घेण्याचा सल्ला संघाकडून देण्यात आला. त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी लगेच 22 जून रोजी सावरकरांची भेट घेतली. ही भेट सुभाषबाबूंच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. या भेटीदरम्यान त्यांनी कोलकाता येथील हालवेलचा पुतळा उखडून फेकण्याची योजना सावरकरांना सांगितली. परंतु, छोटी-मोठी आंदोलने करण्याऐवजी मोठे कार्य करण्याचा सल्ला तात्यारावांनी बोस यांना दिला. तसेच रासबिहारी बोस यांचे पत्रही सुभाषबाबूंना दिले. त्यानंतर आझाद हिंद सेनेची सूत्रे स्वीकारून सुभाषबाबूंनी इंग्रजांविरुद्ध लढा बुलंद केला. तसेच सावरकर कैद असलेली अंदमान आणि निकोबार ही बेटे जिंकून आझाद हिंद सेनेने त्यांचे नामाभिधान स्वतंत्र आणि स्वराज असे केले होते. या संपूर्ण योजनेमागे सावरकर होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात. पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर – असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाज क्रांतिकारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर, अशा अनेक स्वरूपांत ते समाजासमोर आलेले दिसतात.हिंदू समाज संघटित करण्यासाठी सावरकरांनी जे काम रत्नागिरीत केले, ते अतुलनीय आहे. हिंदू समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य आणि हिंदूंचा धर्मभोळेपणाच जबाबदार आहे, हे सावरकरांनी ओळखले. त्यांनी असंख्य मंदिरे दलितांना उघडी करून दिली. रत्नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले, या मंदिरात वाल्मिकी समाजाचा पुजारी नेमून सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. त्यानंतर गांधी हत्येच्या षडयंत्रात सहभागी असल्याचे आरोप सावरकरांवर झाले. परंतु, प्रदीर्घ न्यायालयीन खटल्यानंतर त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यामुळे सावरकरांच्या प्रेरणेने गांधी हत्या झाली असे म्हणणारे न्यायालयाचा अवमान करीत असल्याचे स्पष्ट होते.

यासोबतच सावरकरांवर जातीयवादीपणाचे आरोप केले जातात. परंतु, सावरकरांनी ऑक्टोबर 1965 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘ऑर्गनायझर’ साप्ताहिकाच्या दिवाळी अंकात दिलेली जीवनातील अखेरची मुलाखत त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट करणारी ठरते. यात सावरकर म्हणतात की, ” My India would be democratic state in which people belonging to different religion section or races would be treated with perfect equality non would be allowed to dominate others none would be deprived his just and equal right of free citizenship so long as everyone discharged the common obligations which he owed to the state as a whole”

आयुष्याच्या संध्याकाळी पद, पैसा, प्रतिष्ठेच्या मोहाला तिलांजली देणारे स्पष्ट वक्ते, निस्पृह सावरकर यांनी मांडलेली मते खोटी मानावी, असे काहीच कारण नाही. त्यामुळे येनकेन प्रकारे सावरकरांवर होणारे आरोप हे सुडबुद्धी आणि राजकारणप्रेरित असल्याचे दिसून येते. आपला देश ज्या गांधींचा सन्मान करतो ते मोहनदास करमचंद उपाख्य महात्मा गांधी हे प्रणामी पंथांचे कायस्थ होते आणि सोनिया आणि स्व. राजीव गांधींचे सुपुत्र असलेले राहुल हे पारशी आहेत. त्यामुळे निवडणुकीत जानवे घालायचे आणि पुरोगामित्व दाखवण्यासाठी स्वतः पारशी असूनही गांधी म्हणून प्रोजेक्ट करायचे असा प्रकार राहुलच यांनी चालवला आहे. परंतु, हे करताना राहुल यांनी त्यांची आजी स्व. इंदिरा गांधी यांनी 1966 साली स्वातंत्र्यवीर सावरकरांवर जारी केलेले टपाल तिकीट आणि ते जारी करण्यामागचा कार्यकारण भाव लक्षात घ्यायला हवा होता. परंतु, दुर्दैवाने तसे झालेले दिसून येत नाही. उरफाटे सल्लागार, विषयाचे अल्प आकलन आणि वैचारिक गोंधळात अडकलेले राहुल नावाचेच ‘गांधी’ असले तरी गडबडलेले आहेत. त्यामुळेच शरद पवारांनी त्यांना सावरकरांचा मुद्दा सोडून देण्याचे आवाहन केले आहे. पवारांचे बोलणे राहुल यांनी कानावर घेतले असले तरी मनावर घेतात का…? या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देईल.

मनीष कुलकर्णी

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.