१० मार्च २०२२ रोजी निवडणूकींचे निकाल जाहीर झाले आणि कॉंग्रेस पक्षाची दयनीय अवस्था उघड्यावर पडली. बंगालच्या निवडणूकीचे निकाल जाहीर झाल्यावर कॉंग्रेसने आनंद व्यक्त केला होता. कारण भाजपाची सत्ता स्थापन होऊ शकली नाही. पण बंगालमध्ये कॉंग्रेसची जी परिस्थिती झाली त्यावर एकाही ज्येष्ठ व बड्या कॉंग्रेसीला बोलावेसे वाटले नाही आणि आत्मचिंतनही करावेसे वाटले नाही.
गांधी म्हणजे महात्मा गांधी नव्हे, तर…
कॉंग्रेस हा पक्ष महात्मा गांधींच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे, असं कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणतात. पण महात्मा गांधींच्या कोणत्या विचारांवर चालतो हे अजून त्यांनी ठरवलेलं दिसत नाही. महात्मा गांधी मौन धारण करायचे असं म्हणतात. मौनात शक्ती असते, तुम्ही शक्ती संचय करु शकता. मौन म्हणजे आत्मचिंतन असं सुद्धा म्हणता येईल. सध्या कॉंग्रेसमध्ये आत्मचिंतन हा प्रकारा कालबाह्य ठरलेला दिसतोय आणि गांधीचिंतन नवा प्रकार उदयाला आलेला दिसतो. गांधी म्हणजे महात्मा गांधी नव्हे, तर सोनियाबाई गांधींचं कुटुंब म्हणजे गांधी होय!
(हेही वाचा – निवडणुकीसाठी महापालिका सज्ज: अंतिम प्रभाग रचनेचा आराखडा आयोगाकडेच)
कॉंग्रेसला लागली उतरती कळा?
निवडणूक लागत असताना एका मराठी न्यूज चॅनलच्या चर्चेत गांधी परिवार आणि आता होणारा पराभव असा मुद्दा निघाल्यावर ज्येष्ठ पत्रकार व कॉंग्रेसचे प्रवक्ते कुमार केतकर यांच्या म्हणण्याचा रोख असा होता की सगळंच काही गांधी कुटुंबामुळे घडत नाही. हा पराभव केवळ गांधी कुटुंबामुळे झालेला नाही. मग तो कशामुळे झालाय याचं चिंतन अजून त्यांनी केलेलं नसावं. पण सोनियाबाईंकडे कॉंग्रेसची अंतर्गत सत्ता गेल्यानंतर मात्र कॉंग्रेसला उतरती कळा लागली आहे. आता पाच राज्यांचे निकाल म्हणजे या पक्षासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. पंजाबमध्ये सत्ता असतानाही केवळ १८ जागा मिळाल्या आहेत. ही खरंच निंदाजनक कामगिरी आहे. मूळ प्रश्न असा आहे की एखादा नेता चांगली कामगिरी करत नसेल तरी प्रत्येक वेळी त्यालाच का जबाबदारी दिली जाते? असं काय आहे त्याच्याकडे? राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा हे पूर्णपणे नापास झालेले आहेत. मग ते पंडित नेहरुंचे वंशज आहेत एवढ्यासाठीच त्यांना पुन्हा पुनः का आणलं जात आहे?
राजीनामा देणार कोणाला? निर्णय घेणारे हेच आहेत?
गांधी कुटुंब राजीनामा देण्याचं नाट्यही छान करतात. मुळात राजीनामा देणार कोणाला? निर्णय घेणारे हेच तिघे आहेत? म्हणजे सोनियाबाई सोनियाबाईंकडेच राजीनामा सोपवणार? राहुलजी राहुलजींकडेच राजीनामा सोपवणार? प्रियांकाताई प्रियांताईंनाच राजीनामा सोपवणार आहेत का? राजकारणी म्हणून राहुलजी आणि प्रियांकाजी पूर्णपणे नापास झालेले आहेत. हे कॉंग्रेसजन स्वतःचा वारसा गांधी-नेहरुंचा सांगतात. इतकी जुनी संघटना आहे असंही म्हणतात, मग या गांधी कुटुंबात ते का अडकले आहेत? पी. व्ही. नरसिंहराव यांचं शासन उत्तमच होतं की…
तर गांधीविरहित राजकारणाचा विचार
त्यामुळे कॉंग्रेसींना जर आपली इतकी जुनी संघटना वाचवायची असेल तर गांधीविरहित राजकारणाचा विचार करावा लागेल. इतकी वर्षे या कुटुंबाचा आसरा घेतल्यामुळे कदाचित हे कठीण होईल, बंडाळी माजेल, आपला नेता कोण हे निवडण्यात सुरुवातीला त्रास होईल. पण आपला एक योग्य नेता निवडून संघर्ष केला तर येणार्या १० वर्षात कॉंग्रेस पुन्हा तग धरु शकेल. मूळ प्रश्न असा आहे की गांधी कुटुंबाच्या आहारी गेलेल्या कॉंग्रेसला हे धाडस करता येईल का? तर माझ्यामते तरी उत्तर ’नाही’ असेच आहे. मग कॉंग्रेसचं काय होईल? एक दिवस असा येईल जेव्हा एकाही राज्यात कॉंग्रेसचा मुख्यमंत्री नसेल आणि लोकसभेतही नाचक्की व्हावी इतकी कमी मते मिळतील. त्यामुळे निवड आता कॉंग्रेसने करायची आहे. गांधी कुटुंब हवे आहे की स्वाभिमान?