सुदृढ मन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

94

आपण आज तंत्रज्ञानाच्या बळावर अनाकलनीय असे यश संपादन केले आहे. वैज्ञानिक क्रांतिने, तंत्रज्ञानातील क्रांतिने मानवाचे भौतिक जीवन अंतर बाह्य बदलून गेले आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. या विज्ञानाच्या, तंत्रज्ञानाच्या बळावर अनेक चांगल्या गोष्टी माणसाने संपादन केल्या आहेत. ही अभिमानास्पद गोष्ट आहे.

( हेही वाचा : विरोधीपक्षनेते अंबादास दानवे शिवसेनेच्या संपर्कात; संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट)

त्यात आता कृत्रिम बुद्धिमत्तेची (Artificial Intelligence)भर पडली आहे. या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बळावर प्रत्यक्ष अस्तित्वात नसलेली गोष्ट सुद्धा आपल्याला सहजपणे खरी आहे असे दाखवता येते. थोडक्यात काहीही घडलेले नसताना खूप काही घडले आहे असे छायाचित्राच्या किंवा चित्रीकरणाच्या माध्यमातून दाखवता येते. त्यामागे करमणुकीचा, मनोरंजनाचा दृष्टिकोन असेल तर फारसा फरक पडत नाही. पण या सर्व गोष्टी मागे विकृत मनोवृत्ती असेल तर मात्र मानवाचे समाज जीवन, राजकीय जीवन आणि व्यक्तिगत किंवा कौटुंबिक जीवन पूर्णपणे मातीत मिसळून जाईल.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि रशियाचे सर्वेसर्वा ब्लादिमीर पुतीन यांची काही छायाचित्रे नुकतीच सर्वत्र प्रसारित झाली आहेत. या छायाचित्रातून असे स्पष्ट दिसते की जगातल्या या दोन मोठ्या राष्ट्रांचे राज्यकर्ते स्वयंपाक घरात स्वयंपाक करताना दिसतात. समुद्रकिनाऱ्यावर लहान मुलांप्रमाणे बागडताना दिसतात. या छायाचित्रांमुळे या दोन महान नेत्यांच्या विषयी संशयाची पाल मनात चुकचुकू लागते. अशा प्रकारच्या विकृत छायाचित्रांची निर्मिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बळावर निर्माण करण्यात आली आहेत.‌

बराक ओबामा हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि जर्मनीच्या नेत्या ॲंगेना मर्केल या दोघांची समुद्रात जलक्रीडा करत असलेली छायाचित्रे प्रकाशित करण्यात आली आहेत. त्यांनी परस्परांना आलिंगन दिल्याचीही छायाचित्रे समाजमाध्यमावर अग्रेषित करण्यात आली आहेत. ही सर्व छायाचित्रे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बळावरच तयार करण्यात आलेली आहेत.‌ म्हणजेच ही सारी बनावट छायाचित्रे आहेत.

माणूस सुशिक्षित, सुविद्य आणि सुसंस्कृत असला पाहिजे. आपल्या कोणत्याही वर्तनाने कोणाचीही हानी होऊ नये याची जो काळजी घेतो तो सुसंस्कृत म्हणून ओळखला जातो. पण दुर्दैवाने आज सभ्य समाजात राहणाऱ्या अनेकांमध्ये सज्जनता, सुसंस्कृतपणा राहिलेला नाही. असे खेदाने म्हणावे लागते.

विज्ञानाने अनेकविध शोध लावले. मानवाचे भौतिक जीवन दृष्ट लागावी एवढे सुखासीन केले आहे. पण माणसाची मानसिक विकृती मात्र दिवसेंदिवस वाढत जाताना आढळते हीच चिंतेची बाब आहे.

जगातल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेत्यांची बनावट छायाचित्रे अशी विकृतपणे समाजमाध्यमावर प्रसारित केली जात असतील तर सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या लोकांची सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बळावर चारित्र्य हनन करणारी छायाचित्रे प्रसारित केली जाणार नाहीत याविषयी खात्री देता येत नाही.

एखाद्याचा बळी देण्यासाठी आता शस्त्राची आवश्यकता नाही. एखाद्याची बनावट अशी अश्लील छायाचित्रे प्रसारित करून कोणालाही कळणार नाही अशा प्रकारे बदला घेतला जाऊ शकतो.

माणसाने विज्ञानात प्रगती करत असताना मानवी मनाचा विकास आणि मानवी मनाची सुदृढता याकडे लक्ष दिले नाही. ही माणसाची सर्वात मोठी चूक आहे.‌ यासाठीच उत्तम संस्कार मनावर करणे किती आवश्यक आहे ते ध्यानात येते.

सुविद्य माणूस सुसंस्कारित असतोच असे नाही. याचा प्रत्यय आपल्याला आता वारंवार येऊ लागला आहे. श्रीमंत माणसाकडून पैसे उकळण्यासाठी या कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग केला जाणार नाही असे आपल्याला ठामपणे सांगता येत नाही. धनवानाच्या मुलाचे बनावट छायाचित्र तयार करून त्या मुलाचे आपण अपहरण केले आहे अशी बतावणी छायाचित्रासह त्या मुलाच्या पालकांपर्यंत पोहोचवता येईल. त्याचबरोबर दुसऱ्या कोणत्यातरी एका व्यक्तीचे काल्पनिक चित्र रेखाटून त्या माणसाने मुलाचे अपहरण केले आहे हे बनावट छायाचित्राद्वारे दाखवले जाईल. योगायोगाने त्याच चेहऱ्याची व्यक्ती अस्तित्वात असेल तर कोणताही अपराध केला नसताना त्या व्यक्तीवर अपहरणाचा आरोप केला जाईल.‌ ती व्यक्ती अकारण शिक्षेस पात्र ठरून शिक्षा भोगेल. अशा प्रकारे निरपराधी अपराधी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच काही काळासाठी तरी एखाद्याला बदनाम करण्याच्या हेतूने अशी बनावट छायाचित्रे प्रसारित केली जातील.‌ सत्य लोकांना समजेपर्यंत संबंधित व्यक्ती ही बदनामी सहन न झाल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने दगावू शकेल.

कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक दुधारी शस्त्र आहे. चांगल्या गोष्टींसाठी त्याचा उपयोग केला तर त्यात सर्वांचेच कल्याण आहे. अन्यथा विकृत मनोवृत्तीच्या माणसांमुळे किंवा सुदृढ मनाच्या अभावामुळे अकारण कोणाचाही जीव जाऊ शकतो. विज्ञानाने प्रगती केली, विकास केला. पण मानवाचा मनोविकास विज्ञानाला करता आला नाही. माणसाने स्वतःच्या मनाला सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. अशा परिस्थितीत वैज्ञानिक प्रगती तंत्र विज्ञानातील प्रगती माणसाचे जीवन उध्वस्त करू शकते.‌ म्हणून माणसाने आता अत्यंत सावधपणे जगणे नितांत आवश्यक आहे. त्याचबरोबर चटकन कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवणे हेच हिताचे ठरेल.‌ पालकांनी मुलांच्या हातामध्ये आधुनिक उपकरणे देण्यापूर्वी त्या मुलांची मने सुदृढ, निकोप ठेवण्यासाठी पराकाष्ठेचा प्रयत्न करणे नितांत आवश्यक आहे.‌ आपण ही काळजी घेतली नाही तर माणसाचे जीवन मातीमोल होण्यास वेळ लागणार नाही.

(लेखक व्याख्याते आहेत.)
९८३३१०६८१२

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.