पुणेकरांनो आता हे अति झालं बरं का; पुणे, तिथे चप्पल तुटेपर्यंत नाचणे

जगात सर्वात प्रसिद्ध असलेलं शहर म्हणजे पुणे आणि सर्वात प्रख्यात लोक म्हणजे पुणेकर असं पुणेकरांनाच वाटतं. पुण्यात समुद्र नाही म्हणून खाऊ गल्लीला पुण्यात चौपाटी म्हणतात. अशी खाऊ गल्ली मुंबईत गल्ली गल्लीत सापडते. पुणेकरांना पुण्याचा भलताच अभिमान दिसतो. पुणेकरांचं १ ते ४ झोपणं, पुणेरी पाट्या, खोचक बोलणं अशा अनेक गोष्टींमुळे पुणेकर प्रसिद्ध झाले आहेत. पुण्यात बाईक चालवताना हेल्मेट घालणं हे पाप असतं, असं पुणेकर मानतात आणि ट्रॅफिकमध्ये हॉर्न वाजवणं यासारखं पुण्यकर्म ते कोणतं, नाही का!

( हेही वाचा : कोकण रेल्वेची ‘तेजस एक्स्प्रेस’ १५ सप्टेंबरपासून विस्टाडोम कोचसह मडगावपर्यंत धावणार)

गणेश विसर्जनात पुणेकर तुफान नाचले

पुण्यातले लोक आता बडिशेप चहा सुद्धा प्यायला लागले आहेत. आता हा बडिशेप चहा काही दिवसात लोकप्रिय होईल. पाणीपुरीत वरण टाकून पिणारे काहीही पिऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल आज पुणेकरांची इतकी आठवण का काढताय. तर वाचकांनो, आता पुणे आणखी एका गोष्टीसाठी जगप्रसिद्ध होणार आहे. कोरोनाकाळामुळे आपल्याला आपले सण उत्सव साजरे करता आले नाही. याचं सर्वात जास्त दुःख पुणेकरांना झालं होतं. मग आता गणेशोत्सव थाटात आणि जल्लोषात साजरा करायचा अशी भीष्म प्रतिज्ञा पुणेकरांनी घेतली होती. मग गणेश विसर्जनात पुणेकर तुफान नाचले.

चपला आणि बुटांनी तब्बल सहा टेम्पो भरले

झालं असं की, गणेश विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रोड, केळकर रोड, कुमठेकर रोड, टिळक रोड, लाल बहादूर शास्त्री रोड, कर्वे रोड, जंगली महाराज रोड मार्गे निघाली त्या सगळ्या रस्त्यांवर मिरवणुकीनंतर ३२ टन कचरा जमा झाला. पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या १ हजार ३७ कर्मचाऱ्यांनी तीन तासांत पुणे परिसराची स्वच्छता केली. यात फक्त कचराच नाही तर पुणेकरांचं नाव ब्रह्मांडात प्रसिद्ध होईल अशी गोष्ट आढळली आहे. चपला आणि बुटांनी तब्बल सहा टेम्पो भरले होते.

तुम्हाला विश्वास बसत नसला तरी ही बातमी खरी आहे. म्हणजे पुणेकर इतके नाचले की चप्पल तुटली पण नाचायचं काय थांबले नाहीत. याला म्हणतात जल्लोष, याला म्हणतात उत्सव. थोडक्यात काय? तर पुणे तिथे काय उणे, आता तर चप्पल तुटेपर्यंत नाचणे…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here