कामधंदा नसल्यामुळे त्याने चक्क सुरू केली नोटांची छपाई

कर्नाटक राज्यात बोगस नोटांची छपाई करून मुंबईतील बाजारपेठेत त्या नोटा चालविणाऱ्या एका टोळीला दादर पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून पोलिसांनी १०० आणि २०० रुपयांच्या ६५ हजार किमतीच्या नोटांसह छपाईसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. अटक करण्यात आलेल्या चौकडीपैकी एक जण सिव्हिल इंजिनियर असून इतर तिघे मुंबईत लहान मोठ्या खाजगी कंपनीत नोकरीला होते.

किरण कांबळे हा मुख्य आरोपी

किरण कांबळे (२४), शिवकुमार, आकाश तडगवली आणि आनंद कुमार असे अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. सर्व आरोपी कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील एका खेड्यात राहणारे आहेत. किरण कांबळे हा मुख्य आरोपी असून तो सिव्हिल इंजिनियर आहे. दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश मुगुटराव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा प्रकटीकरण पथकाचे सपोनि. रामकृष्ण सांगडे यांच्या पथकाने गेल्या आठवड्यात दादर फुलबाजार येथून आनंद कुमार याला बोगस नोटांसह अटक केली होती. आनंद कुमार हा १०० आणि २०० रुपयांच्या बोगस नोटा घेऊन फुलबाजारात सुट्टे पैसे मागत असताना त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्या जवळून पोलिसांनी ४७ हजार रुपयांच्या १०० आणि २०० रुपयांच्या बोगस नोटा जप्त केल्या होत्या.

६५ हजार रुपयांच्या बोगस नोटा जप्त

चौकशीत त्याने या बनावट नोटा कर्नाटकातून किरण कांबळे हा पाठवत होता, अशी माहिती अटक आरोपीने दिली. सपोनि. रामकृष्ण सांगडे, पोह. राजेंद्र रावराणे संतोष पाटणे, ध्रुव कोलते, गणेश माने, महेश कोलते, अजित महाडिक या पथकाने कर्नाटक येथून इतर तिघांना अटक करून ६५ हजार रुपयांची बोगस नोटा आणि नोटा छापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. किरण कांबळे हा सिव्हिल इंजिनियर असून लॉकडाऊनच्या काळात कामधंदा मिळत नसल्यामुळे त्याने बोगस नोटा छापण्याची गोरखधंदा सुरू केला होता. त्याने २५ टक्के कमिशनवर या नोटा मुंबईत ओळखीच्या व्यक्तींना देऊन शहरातील मुख्य बाजारपेठेत वटवत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here