यंदा प्रथमच मानाच्या पालख्या समवेत नव्याने येणाऱ्या दिंड्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. नोंदणीकृत नसलेल्या दिंड्यांना सुविधा देणे अवघड होऊ शकते, त्यामुळे मानाच्या पालख्यांची संस्थांकडे दिंड्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शहर व परिसरात भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा आढावा घेण्यासाठी महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी मंदिर व परिसर, महाद्वार चौक, नदीपात्र, पत्रा शेड, ६५ एकरची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यानंतर पालकमंत्र्यांनी संपूर्ण पालखी मार्ग व तळाची पाहणी केल्यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर, पुणे आणि सातारा अशा तिन्ही जिल्ह्यातील पालखी मार्गावर चांगल्या व्यवस्थेचे नियोजन झाले असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
(हेही वाचा – आषाढी एकादशी २०२३: भाविकांच्या मदतीसाठी २५ हजार अधिकारी अन् कर्मचारी असणार तैनात)
वारी कालावधीत भाविकांना सुलभ दर्शन घडावे, यासाठी मंदिर समितीने आवश्यक नियोजन करावे. दर्शन रांग व दर्शन मंडपात स्वच्छता राखावी तसेच मॅटची व्यवस्था करावी. स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, असे सांगून विखे पाटील यांनी गर्दी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने पत्राशेडच्या ठिकाणी मोकळ्या जागेत मंडप उभा करावा, यामुळे वारकरी भाविकांबरोबरच अधिकारी, कर्मचारी, भोजन व्यवस्था देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सावली मिळेल, शौचालयाची वेळोवेळी स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी. तसेच त्याठिकाणी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना केल्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community