२ वर्षांनी दुमदुमणार विठुनामाचा जयघोष! असा असणार आषाढी पायी वारीचा सोहळा

163

अखंड सुरू असणाऱ्या आषाढी पायी वारीच्या सोहळ्यात कोरोना सारख्या महामारीमुळे खंड पडला होता. असे असले तरी मोजक्या वारकऱ्यांच्या संख्येत ही परंपरा कायम राखली गेली. मात्र यंदा वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांच्या संकटानंतर नियंत्रणात आलेल्या कोरोना रूग्ण संख्येमुळे पुन्हा एकदा जल्लोषात आषाढी पायी वारी होणार असून विठुनामाचा जयघोष आसमंतात दुमदुमताना दिसणार आहे.

(हेही वाचा -पुण्यात स्वदेशी पद्धतीने विकसित केलेली विशेष वाहने लष्करात दाखल)

कोरोना अटोक्यात आल्याने शासनाने सर्व कोरोनाचे निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे यंदा पायी वारी निघणार हे जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण असून वारकऱ्यांना विठूरायाच्या दर्शनासाठी आस लागली असून वारकरी त्याच्या भेटीसाठी आतूर झाले आहे. अशातच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी 21 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये एकादशीच्या आदल्या दिवशी झालेल्या बैठकीत पायी वारीचे वेळापत्रक सादर करण्यात आले.

आषाढी पायी वारीचा सोहळा जाहीर

  • 21 जून – संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं प्रस्थान
  • 22,23 जून – पुण्यात मुक्काम
  • 24,25 जून – सासवड
  • 26 जून – जेजुरी
  • 27 जून – वाल्हे
  • 28, 29 जून – लोणंद
  • 30 जून – तरडगाव
  • 1, 2 जुलै – फलटन
  • 3 जुलै – बरड
  • 4 जुलै – नातेपुते
  • 5 जुलै – माळशिरस
  • 6 जुलै – वेळापूर
  • 7 जुलै – भंडीशेगाव
  • 8 जुलै – वाखरी
  • 9 जुलै – पंढरपूर
  • 10 जुलै – आषाढी एकादशीचा महासोहळा

रिंगण सोहळा कुठे असणार?

श्री क्षेत्र पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आषाढी वारी पायी दिंडी पालखी सोहळा नियोजनाची बैठक झाली. पालखी सोहळ्याचं मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर आणि इसबावी येथे उभे रिंगण तर पुरंदावडे (सदशिवनगर), पानीव पाटी, ठाकुरबुवा आणि बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होणार असल्याचे सांगण्यात आले.

सोहळ्यात रथापुढे 27 तर रथामागे 251 दिंड्या असणार

समोर आलेल्या माहितीनुसार,  संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रथापुढे 27 तर रथामागे 251 दिंड्या नोंदणीकृत आहेत. तसेच नोंदणी नसलेल्या 125 ते 150 दिंड्या आहेत. सोहळ्यातील या दिंड्यांना वाहन पास दिले जाणार आहेत. वाहन पासाचा गैरवापर टाळण्यासाठी नोंदणीकृत दिंडी चालकाने 15 मेपर्यंत वाहनांचे नंबर, वाहन चालकाचे नाव आणि मोबाईल नंबर संस्थानकडे द्यावेत. यंदा माऊली सोबत सुमारे पाच लाख समाज राहिल. त्यादृष्टीने पालखी तळ, आरोग्य, पाणी, वीज, रस्ता आणि सुरक्षा याबाबत शासनाकडे योग्य तो पाठपुरावा केला जाईल, असं पालखी सोहळा प्रमुख ॲड . विकास ढगे पाटील यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.