-
ईश्वरी मुरुडकर
महाराष्ट्रात प्लास्टिकचा भस्मासुर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. प्लास्टिकमुळे होणाऱ्या धोक्याची समस्या फक्त महाराष्ट्रासमोरच नाही, तर संपूर्ण जगासमोर पडलेला हा यक्ष प्रश्न आहे. शासनाने प्लास्टिक बंदी जरी जाहीर केलेली असली, तरीही प्लास्टिकमुक्ती अजूनही झालेली नाही. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी प्लास्टिकमुक्तीचा विडा उचलणार्या मुलुंडच्या अस्मिता गोखले यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊया… (Zero Waste Management)
‘अथक फाउंडेशन’ने शोधला प्रभावी उपाय
प्लास्टिकचे विघटन व्हायला खूपच वर्षे लागतात. प्लास्टिकमधून सूर्यकिरण पुढे जात नाहीत. त्यामुळे त्याच्या खाली असलेला ओला कचराही तसाच राहतो. त्याचे अनेक डोंगर तयार झालेले आपण मुंबईत पहात आहोत. दैनंदिन जीवनात होणाऱ्या प्रदूषणाचा प्लास्टिक हा एक महत्त्वाचा आणि पोषक घटक ठरत आहे. प्लास्टिकच्या याच प्रश्नावर मुलुंडच्या ‘अथक फाउंडेशन’च्या प्रमुख अस्मिता गोखले यांनी हा कचरा नष्ट करण्यावर प्रभावी उपाय शोधला. पुणेस्थित (GDEPL) या कंपनीबरोबर काम करायला अस्मिता आणि अथक फाउंडेशनने सुरुवात केली. त्यांनी लोकांना ‘माझे प्लास्टिक माझी जबाबदारी’ असे पटवून देत प्लास्टिक कलेक्शन स्पॉटवर प्लास्टिक आणून द्यायला उद्युक्त केले. (Zero Waste Management)
प्लास्टिक आणि थर्माकोल यांसारख्या वर्षानुवर्षे विघटन न होणार्या कचऱ्यामुळे अनेक मैदाने, डंम्पिंग ग्राउंडमध्ये रूपांतरित होत असल्याची खंत अस्मिता गोखले यांना सतावत होती. यावर उपाय म्हणून ‘शून्य कचरा व्यवस्थापन’ हे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन अस्मिता गोखले यांच्या अथक फाऊंडेशन ने प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नका, यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करायला सर्वात केली. प्लास्टिक वापरावर संशोधन करतांना (GDEPL) या पुणेस्थित कंपनीत सुरुवातीला प्लास्टिक आणि थर्माकोलपासून प्राथमिक दर्जाचे क्रूड ऑईल बनवले जाते, याची माहिती मिळाली. आता त्या कंपनीत हाय स्पीड डिझेल, वीज निर्मिती, ओल्या कचऱ्यापासून चार (कोळशाचा पर्याय) आदी गोष्टी तयार केल्या जातात. या कंपनी समवेत, अस्मिता आणि अथक फाउंडेशनने सोसायटी, घरांमधून, शाळांमधून प्लास्टिक आणि थर्माकोल सह संपूर्ण कचरा व्यवस्थापन या विषयी माहिती द्यायला सुरुवात केली. त्याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात येऊ लागले. (Zero Waste Management)
समाजाचा व्यापक सहभाग
अस्मिता व अथक फाऊंडेशनला जवळपास २००-२५० सोसायटी, मुलुंडमधील शाळा तसेच मुंबईतील आजूबाजूच्या शहरांमधून, स्वतःच्या गाड्यांमधून, सोसायटीतर्फे टेम्पोमधून, एवढेच नाही तर रिक्षा-टॅक्सी यांच्या साहाय्याने प्लास्टिक थर्माकोल घेऊन येऊ लागले. अस्मिता गोखले सुरुवातीला स्वखर्चाने जवळपास ८ ते १० महिने पुण्याला प्लास्टिक, थर्माकोल पाठवत होते. त्यानंतर अथक फाऊंडेशन आयोजित ग्राहकपेठ, प्रदर्शन आणि विक्री या उपक्रमातून, फंड वाढवण्यामधुन आता हे जमा झालेले प्लास्टिक पुण्यात पाठवले जाते. गेले जवळपास ७ वर्ष हा उपक्रम न थकता चालू आहे. (Zero Waste Management)
लोकांचा विरोध
सुरुवातीला, या उपक्रमात अस्मिता आणि त्यांच्या गटाला लोकांच्या रोषाला आणि विरोधाला सामोरे जावे लागले. तरीही हार न मानता लोकांना विश्वास बसवा, यासाठी घन कचरा नष्ट करणारे मशीन त्यांनी केळकर महाविद्यालयाच्या कलेक्शन स्पॉटवर ठेवले. प्लास्टिक व थर्माकोल सह संपूर्ण घन कचरा नष्ट कसा केला जातो, सविस्तर माहिती देण्यात आली. (Zero Waste Management)
या मशीनचे फायदे
१. पोर्टेबल आहे.
२. घन कचरा जाळल्यानंतर निर्माण होणारा वायू हवेत तसाच सोडला जात नाही.
३. घन कचरा नष्ट झाल्यावर राहिलेल्या राखेचा वापर पेवर ब्लॉक, सिमेंट ब्लॉकसाठी करता येतो.
४. ओला कचरा नष्ट केल्यानंतर तयार होणाऱ्या उष्णतेचा वापर वीजनिर्मितीसाठी होऊ शकतो.
५. प्लास्टिक, थर्माकोल, डायपर, सॅनिटरी नॅपकिनसारखा सुका कचरा मशीनमध्ये पर्यावरण पूरक पद्धतीने नष्ट केला जातो.
६. १२०० डिग्रीत नष्ट केलेल्या कचर्याच्या उष्णतेपासून वीजनिर्मिती, ई-वाहने चार्ज करू शकतो.
७. ओला कचरा सुका करुन तो मशीनमध्ये नष्ट करून त्यापासून निर्माण होणारा स्टार्च हा भविष्यात कोळश्याला चांगला पर्याय होऊ शकतो. (Zero Waste Management)
‘झिरो प्लास्टिक मुंबई’चे ध्येय
डम्पिंग ग्राऊंड नको; म्हणून शून्य कचरा व्यवस्थापन हे ध्येय अस्मिता आणि त्यांच्या अथक फाऊंडेशनने समोर ठेवले आहे. डम्पिंग ग्राऊंड कायमचे नष्ट करून त्याचे एक चांगले क्रीडा संकुल किंवा तक्षशीलासारखी लायब्ररी उभी रहावी, असा अस्मिता गोखले यांचा मानस आहे. ‘माझे प्लास्टिक माझी जबाबदारी’ या घोषवाक्याखाली प्लास्टिक, थर्माकोल गोळा करून त्यांच्याकडे जमा करण्याचे आवाहन त्या करतात. ‘झिरो प्लास्टिक मुलुंड’ हे अस्मिता गोखले यांचे ध्येय असून ‘झिरो प्लास्टिक मुंबई’ व्हावी यासाठी त्यांचे काम जोमाने सुरू आहे. (Zero Waste Management)
(हेही वाचा – Simcard New Rule : सिमकार्ड चे नवीन नियम १ डिसेंबर पासून लागू , जाणून घ्या अन्यथा जाल तुरुंगात)
अस्मिता गोखले यांना मिळालेले पुरस्कार
१. भारतीय स्त्री जीवन विकास परिषद पुरस्कृत ‘बकुळाबाई देवकुळे सामाजिक कार्य पुरस्कार २०१९’.
२. समर्थ भारत व्यासपीठतर्फे सामाजिक कार्याबद्दल ‘ती पुरस्कार २०२०’.
३. ‘उद्योगिनी पुरस्कार’, सामाजिक सेवा पुरस्कार (मुलुंड)
४. लोकमत पुरस्कार ‘वुमन अचिवर्स पुरस्कार’ २०२१.
५. रोटरीचे ‘कम्युनिटी केअर एक्सलन्स पुरस्कार’ बाय रोटरी क्लब ऑफ मुंबई मुलुंड साऊथ २०२३.
६. मानवसृष्टी कडून ‘वुमन अचिवर्स पुरस्कार २०२३’.
‘प्लास्टिकमुक्त मुंबई’ करण्याचा वसा घेतलेल्या अस्मिता गोखले आणि त्यांच्या अथक फाऊंडेशन यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. त्यांचा हाच वसा पुढे चालवूया, मुंबईला प्लास्टिकमुक्त करूया ! (Zero Waste Management)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community