आसाममध्ये पुराचा कहर, 7 लाखांहून अधिकांना फटका

107

आसाममध्ये आलेल्या भयानक पुराचा फटका राज्यातल्या 22 जिल्ह्यांमधीलल 7 लाखाहून अधिक नागरिकांना बसला आहे. या पुरामुळे रविवारी दोन मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत पूर आणि भूस्खलनात एकूण 24 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पुराच्या पाण्याचा मोठा फटका

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दैनिक पूर अहवालानुसार, नागाव जिल्ह्यातील कांपूर महसूल क्षेत्रात चार लोक पाण्यात बुडाले आहेत. पुरामुळे होजई जिल्ह्यातील दुबोका येथे एका व्यक्तीचा आणि कचार जिल्ह्यातील सिलचरमध्ये एका मुलाचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. आसाममध्ये यावर्षी पूर आणि भूस्खलनामुळे मृतांची संख्या 24 झाल्याचे प्राधिकरणाने सांगितले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पुरामुळे 7 लाख 19 हजार 540 लोक बाधित झाले आहेत. नागाव जिल्ह्याला पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला असून तेथील 3.46 लाख लोक संकटात आहेत. यानंतर कचरमध्ये 2.29 लाख आणि होजईमध्ये 58 हजारांहून अधिक लोक बाधित झाले आहेत.

(हेही वाचा- पुण्यातही ‘ज्ञानवापी?’; मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्याचा मनसेचा दावा)

प्रशासनाकडून 152 मदत वितरण केंद्रे स्थापन

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातील 269 छावण्यांमध्ये 91 हजार 518 बाधित लोक राहत आहेत. प्रशासनाने 152 मदत वितरण केंद्रेही स्थापन केली आहेत. आत्तापर्यंत भारतीय लष्कर, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि स्वयंसेवकांच्या मदतीने एकूण 26 हजार 236 अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात आली आहे.

भारतीय हवाई दलाचे मदतकार्य सुरुच

आसाममध्ये भारतीय हवाई दलाचे मदतकार्य सुरुच आहे. भारतीय हवाई दलाने दोन एमआय-17 हेलिकॉप्टर, एक चिनूक हेलिकॉप्टर आणि एक एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर आपल्या एएन-32 विमानांसह मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात केले आहेत. पुराच्या काळात 15 मे पासून आतापर्यंत हवाई दलाने 454 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. या लोकांमध्ये 119 प्रवाशांचाही समावेश आहे. हे प्रवासी दामी हासाओ जिल्ह्यातील डितोकचारा रेल्वे स्टेशनवर अडकले होते. हवाई दलाच्या ध्रुव हेलिकॉप्टरने रेल्वे ट्रॅकवर लँडिंग करत या लोकांची सुटका केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.