साता-यातील ठोसेघर जंगलात जाऊन भेकराची शिकार करणा-या तीन शिका-यांना सातारा वनविभागाच्या वनाधिका-यांनी मोठ्या शिताफीने मांस आणि साहित्यासकट रंगेहाथ पकडले. या शिकारीत आसाम रायफल्समधील मिलिटरी मॅन युवराज निमन याला वनाधिका-यांनी अटक केली असून आठवड्याभरात निमन यांनी दोन साथीदारांसह भेकर आणि चौशिंग्याची शिकार केली असल्याचे तपासात उघडकीस आले. सोमवारी शिकार केलेल्या भेकरचे मांस साता-यातील एका नामांकित व्यक्तीला तिघे देणार होते. परंतु त्या अगोदरच तिन्ही शिका-यांना त्यांच्या घरात घुसून वनाधिका-यांनी आपल्या ताब्यात घेतले. तिघेही स-हाईत शिकारी असून त्यांच्याविरोधात वनविभागाने शिकारीप्रकरणी वनगुन्हा नोंदवला आहे. तिन्ही शिका-यांनी या अगोदर केलेल्या शिकारीचे पुरावेही वनाधिका-यांना मिळाले आहे.
सोमवारी भेकरची शिकार केल्याची वनाधिका-यांना मिळाली टीप
ठोसेघर येथील जंगलात शिकार झाल्याची गुप्त माहिती वनाधिका-यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनाधिका-यांच्या टीमने सातारा येथील माची पेठ येथील युवराज निमन यांच्या घरी छापा मारला. निमन यांच्या घरात वनाधिका-यांना भेकरासह चौशिंगा या वन्यप्राण्याचे मुंडके मिळाले. भेकराचे ताजे मटण तसेच पायाचे खूरही वनाधिका-यांना सापडले. वनाधिका-यांनी चौकशीला सुरुवात करताच निमन यांनी भेकर तसेच आठवड्याभरापूर्वी चौशिंग्याची शिकार केल्याची कबुली दिली. निमन यांनी दिलेल्या कबुलीत दोन्ही शिकारीत नारायण सिताराम बेडेकर आणि विठ्ठल किसन बेडेकर या दोन बंधूचेही नाव उघडकीस आले. दोघांनाही वनाधिका-यांना त्यांच्या ठोसेघर येथील राहत्या घरातून उचलले. नारायण यांच्याकडे भेकराच्या शिकारीसाठी वापरलेली सिंगल बोअर बंदुक तसेच मांसही सापडले. आपल्याजवळील भेकराचे मटण रात्री साता-यातील एका नामांकित व्यक्तीला ते देणार होते.
सोमवारच्या शिकारीचा घटनाक्रम
- सोमवारी सकाळी साडेसात वाजता ठोसेघर येथील जंगलात भेकराची शिकार. शिकारीसाठी सिंगल बोअर बंदुकीचा वापर.
- भेकर चेटकीच्या ओढ्यात सोलून मिलिटरी मॅन युवराज निमन तसेच बेडेकर बंधूंनी मांस कापले व वाटे केले. कातडे सोलून ओढ्यात लपवले.
- भेकराचे मुंडके आणि काही मटण युवराज निमन यांनी घरी आणले
- काही मांसाचा वाटा विठ्ठल बेडेकर तर मांसाचा बराच भाग नारायण बेडेकर यांनी स्वतःजवळ ठेवला.
- नारायण बेडेकरने सर्व मटण घरामागील एका खोलीतील शेणीच्या खाली पिशवीत मटण लपवून ठेवले होते.
वनाधिका-यांनी जप्त केलेले शिकारीचे साहित्य –
दोन बंदुका – एअर गन आणि सिंगल बोअर बंदूक, जिवंत काडतुसे, भेकर सोलल्याचा चाकू, कोयता
वन्यप्राण्यांचे जप्त केलेले अवयव –
भेकराचे मांस, कातडे, पायाचे खूर, भेकर आणि चौसिंग्याचे मुंडके
कारवाईचे पथक –
सातारा वनविभाग (प्रादेशिक)चे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत साता-याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले, वनक्षेत्रपाल डॉ निवृत्ती चव्हा, वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे, वनपाल दीपक गायकवाड , खुशाल पावरा व वनरक्षक विक्रम निकम, राज मोसलगी, अशोक मप, मारुती माने, साधना राठोड, अश्विनी नरळे, पोलिस कॉन्सेबल राजेश वीरकर, सुहास पवार, सुरेश गबाले, दिनेश नेहेरकर, पवन शिरतोडे या सर्वांनी सहभाग घेतला.
Join Our WhatsApp Community