मंगळवार, १४ जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेच्या रात्री आकाशात आपणा सर्वांस ‘सुपरमून‘ दर्शन देणार आहे, असे खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर अंतरावर असतो. जर पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर तो आकाराने १४ टक्के मोठा व तीस टक्के जास्त तेजस्वी दिसतो. अशा चंद्राला ‘सुपरमून‘ म्हणतात.
पावसाळ्यामुळे आकाश अभ्राच्छादित असण्याची शक्यता
मंगळवार, १४ जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ५७ हजार ४३४ कि.मीटर अंतरावर पृथ्वीजवळ येणार आहे. त्या दिवशी सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी चंद्र पूर्वेला उगवेल. रात्रभर आपणास सुपरमूनचे दर्शन देऊन तो सकाळी ६ वाजून २९ मिनिटांनी पश्चिमेस मावळेल. यानंतर या वर्षातील शेवटचे सुपरमून दर्शन आषाढ पौर्णिमेच्या रात्री बुधवार, १३ जुलै २०२२ आपणांस होणार आहे. परंतु त्यावेळी पावसाळ्यामुळे आकाश अभ्राच्छादित असण्याची शक्यता असल्याचेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.