मुंबईत काही महत्वाच्या रस्त्यांवर महापालिकेच्यावतीने यांत्रिक झाडूने साफसफाई केली जात असून या यांत्रिक झाडूच्या सफाईला नगरसेवकांचा तीव्र विरोध असताना पुढील दोन वर्षांसाठी सुमारे ३४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे यासाठी स्वतंत्र कंत्राट एकाच कंपनीला देण्यात आले. नगरसेवकांची मुदत संपुष्टात येताच या यांत्रिक झाडूचे कंत्राट एकाच कंपनीला देऊन ३४ कोटी रुपयांची खैरात केली जात आहे. स्थायी समितीच्या बैठकीत हे तिन्ही प्रस्ताव राखून ठेवले असून आता प्रशासक आता यावर निर्णय घेणार आहेत.
उपनगरांमधील काही रस्त्यांची साफसफाई यांत्रिक झाडूने
मुंबई महापालिकेच्यावतीने सुमारे १९०० चौरस किलोमीटरच्या रस्त्यांची सफाई केली जात आहे. रस्त्यांची दैनंदिन झाडलोट करणे त्यांची स्वच्छता ही महापालिकेच्या सफाई कामगारांमार्फत राखली जाते. तसेच शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांमधील काही रस्त्यांची साफसफाई ही यांत्रिक झाडूच्या सहाय्याने केली जाते. यामध्ये वांद्रे -कुर्ला कॉम्प्लेक्स, सांताक्रुझ- चेंबूर जोडरस्ता,पूवमुक्त मार्ग, पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग आदींची सफाई यांत्रिक झाडूच्या सहाय्याने केली जात आहे.
( हेही वाचा : तिसरे अपत्य: १७ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना महापालिकेतील नोकरीचे दरवाजे बंद! )
विशेष म्हणजे यापूर्वी पश्चिम उपनगरासाठी राम एस.के रिलायबल, शहरातसाठी राम लक्ष्य रक्षित आणि पूर्व उपनगरासाठी राम लक्ष एस.के या कंपनीला पाच वर्षांचे काम देण्यात आले होते. पाच वर्षांसाठी सुमारे २५ ते २८ कोटी रुपयांचे प्रत्येकी काम देण्यात आले होते. परंतु दोन वर्षांकरता मागवलेल्या निविदांमध्ये निविदा स्वीकारुनही यातील भागीदार कंपन्यांनी निविदा भरल्या नाहीत, तर राम इंजिनिअरींग ही कंपनी प्रतिसादात्मक ठरूनही त्यांना काम मिळाले नाही. त्यामुळे यांत्रिक झाडूचे काम संगनमत करून मिळवले गेले असल्याची बाब यावरून निदर्शनास येत आहे. स्थायी समितीत हा प्रस्ताव मंजूर केला नसला तरी प्रशासक आता यावर काय निर्णय घेतात यावर सर्वांचे लक्ष आहे.
शहर विभाग :
- एकूण कंत्राट किंमत : ११.४८ कोटी रुपये
- कंत्राट कंपनी : एस. के. ग्रुप ऑफ कंपनीज
पूर्व उपनगरे :
- एकूण कंत्राट किंमत : ११. ४८ कोटी रुपये
- कंत्राट कंपनी : एस.के. ग्रुप ऑफ कंपनीज
- कोणते रस्ते : वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, सांताक्रुझ चेंबूर जोडरस्ता,पूवमुक्त मार्ग, पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग
पश्चिम विभाग
- एकूण कंत्राट किंमत : ११.५० कोटी रुपये
- कंत्राट कंपनी : एस. के. ग्रुप ऑफ कंपनीज