वीरपत्नी यशोदा गणेश सावरकर यांची ५ फेब्रुवारी रोजी १०४ वी पुण्यतिथी आहे. बाबाराव आणि विनायक सावरकर ‘अभिनव भारत’ स्वातंत्र्याच्या ध्येयाचा प्रचार करत असताना विनायक सावरकर हे घरीसुद्धा त्यांच्या येसूवहिनींकडून स्वातंत्र्याचा प्रचार करणाऱ्या कविता पाठ करून घेत असत. येसूवहिनींना काव्याची व गायनाची आवड होती. बाबाराव आणि विनायक यांनी येसूवाहिनींना त्यांच्या आप्तेष्ट व मैत्रिणींना एकत्र करून, क्रांतिकारकांना साहाय्य करण्याच्या हेतूने तसेच स्वातंत्र्याचे व स्वदेशीच्या चळवळीचे महत्व याचा स्त्रियांमध्ये प्रचार करण्यासाठी एक नवी संस्था स्थापण्यास प्रवृत्त केले.
याप्रमाणे येसूवहिनींनी ‘आत्मनिष्ठ युवती समाज’ ही संस्था १९०५ मध्ये स्थापन केली. विनायक येसूवहिनींना त्यांनी रचलेल्या देशभक्तिपर कवितांचा अर्थ सांगत व त्या कविता ‘आत्मनिष्ठ युवती समाज’ या संस्थेच्या साप्ताहिक बैठकीत म्हणण्यास सांगत. ही साप्ताहिक बैठक दर शुक्रवारी भरत असे. ‘आत्मनिष्ठ युवती समाज’ ही संस्था ‘अभिनव भारत’ या गुप्त संघटनेशी संलग्न होती. क्रांतिकार्यामध्ये भाग घेणाऱ्या मित्रमंडळींच्या कुटुंबातील व अन्य महिलांमध्ये स्वदेशीचा तसेच क्रांतिकार्यात पुरुषांना प्रोत्साहन देण्याचा प्रचार करण्याचा हेतू या स्त्री संघटनेचा असे.
अशा साप्ताहिक बैठकीत येसूवहिनी देशभक्तिपर गीतांचे सामुदायिक गायन करवून घेत. या बैठकांमध्ये येसूवहिनी देशभक्तीपर ‘केसरी’तील ब्रिटिशांच्या अन्याय्य राजवटीविरुद्धचे लेख वाचून दाखवीत. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रचार ‘केसरी’तून धाडसाने होत असे. त्याचा ‘आत्मनिष्ठ युवती समाज’ संस्थेतील महिलांवर अत्यंत स्फूर्तिदायक परिणाम होई. बंगालची फाळणी झाली असल्याने महाराष्ट्रातही लोकक्षोभ झाला होता. स्त्रियांमध्ये राष्ट्रीय वृत्ती निर्मिण्यासाठी व स्वातंत्र्य चळवळीचे महत्त्व, तसेच राजकीय परिस्थितीचे ज्ञान करून देण्यासाठी ‘आत्मनिष्ठ युवती समाज’ ही संस्था कार्यरत होती.
Join Our WhatsApp Community